वडगाव मावळ :
संतश्रेष्ठ तुकोबारायांची चिंतन भूमी असणा-या भंडारा डोंगरावर त्यांच्या आकाशा एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे सकल वारकरी सांप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर मंदिराचे बांधकामाने गती घेतली असून मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या अखंड हरीनाम सप्ताह  महोत्सवास देखील भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून आयोध्यानगरीतील श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान होत आहे ते चंद्रकांत सोमपूरा व निखील सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिरच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे. गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे.

मंदिराची लांबी १७९ फुट, उंची ८७ फुट व रुंदी १९३ फुट असून मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट ३४ फुट बाय ३४ फुट असून १३.५ बाय १३.५ फुट आकाराची एकूण ५ गर्भग्रहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांची मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे.

मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर ९०० वैष्णवांच्या प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे.

त्याचप्रमाणे, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य – दिव्य शिल्प साकारले जाणार आहे. हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर मंडळी, भाविक या कार्याला मदत करीत आहेत.

माघ शुद्ध दशमी व जगदगुरू तुकोबारायांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने गेली ७० वर्षांपासून सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास दि.२६ जानेवारी पासून सुरुवात झाली. पहाटे काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाली. यावेळी हभप शंकरमहाराज मराठे, हभप सुदाममहाराज भोसले बाबा, गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व करणारे हभप नानामहाराज तावरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव काशीद आदी उपस्थित होते.  प्रजासत्ताक दिनी यावर्षी या सोहळ्याची सुरुवात होत असल्याने ध्वजारोहणही करण्यात आले.

सकाळी  हभप नानामहाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकोबारायांच्या गाथेचे पारायण सुरु करण्यात आले. या पारायणासाठी सालाबादप्रमाणे कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेले हजारो भाविक सामील झाले आहेत. सायंकाळी ४.३० ते ६.३० या दरम्यान भागवताचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे पसायदानावर निरुपण झाले.

पहिल्या दिवशी हभप पोपटमहाराज कासारखेडेकर यांची कीर्तन सेवा झाली तर दुसऱ्या दिवशी हभप एकनाथ महाराज चत्तरशास्त्री यांची कीर्तन सेवा झाली. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी पूर्ण सप्ताहाच्या कालावधीमध्ये सकाळच्या न्याहारीसह दुपारी व रात्री असे दोन वेळा भव्य-दिव्य अशा भोजन मंडपात महाप्रसादाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.

error: Content is protected !!