पुणे:
पुण्यातील सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
त्यांची मागणी ऐकून घेऊन त्यांनी थेट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाच फोन लावला आणि प्रतिनिधींचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. सोरेन यांनी जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन या मागण्यांविषयी पुनर्विचार सुरू असल्याचे पवार यांना सांगितले.

झारखंडमधील जैन समाजाच्या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात सध्या वाद सुरू आहे. सकल जैन समाजाने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून, त्याविरोधात देशभर आंदोलन होत आहे. पुण्यातील सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांची त्यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी गुरुवारी दुपारी भेट घेतली.

या शिष्टमंडळात लक्ष्मीकांत खाबिया, अचल जैन, अभय छाजेड, मिलिंद फडे, हरीशभाई शाह, नितीन जैन, नीलेश शाह, भरत सुराणा, अरुण कटारिया, देवेंद्र बाकलीवाल, अक्षय जैन, पोपटशेठ ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुरेंद्र गांधी, ॲड. योगेश पांडे यांचा समावेश होता.

पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्यासमोरच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना फोन केला. त्यांच्यासमवेत चर्चा केली. महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही पवार यांनी फोन करून मागण्यांविषयी सांगितले. जैन समाजाच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे साेरेन यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!