टाकवे बुद्रुक:
आंदर मावळच्या चाळीस गावचे लळीत म्हणून ओळख असलेल्या टाकवे बुद्रुक गावची श्री. विठ्ठल रुख्मिणी देवाची यात्रा वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच (दि. २६) जानेवारीला संपन्न होत आहे. या दरम्यान होणाऱ्या यात्रा व सप्ताह याचे नियोजन करण्यासाठी यंदा विविध कमिट्यांची स्थापना करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे यात्रा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु यंदा कोरोनाचे सावट पुर्णपणे दुर झाल्याने यात्रा मोठ्या जोमाने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियोजन करण्यासाठी अधिक सोयीस्कर व्हावे, तसेच प्रत्येकाला यात्रा कमिटीत काम करण्याची संधी मिळावी या दृष्टीने विविध कमिट्यांची स्थापना करण्यात आली आहे.

सालाबादप्रमाणे मुख्य यात्रेच्या सात दिवस आगोदर सप्ताहाच्या आयोजनात दिग्गज प्रवचनकार व किर्तनकारांच्या उपस्थितीत सांप्रदायिक वातावरणात निर्मिती होणार असून यात्रेच्या पहिल्या दिवसापासून अनुक्रमे बळीराजाचा लाडका खेळ बैलगाडा शर्यत, लाल मातीतील नामवंत पैलवानांचा कुस्त्यांचा आखाडा, मनोरंजनासाठी भारुड व ऑर्केस्ट्रा असे भरगच्च कार्यक्रम यात्रेच्या कालावधीत ठेवण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांच्या दृष्टीने पुर्वनियोजन करण्यासाठी अंखड हरिनाम सप्ताह कमिटी, वर्गणी कमिटी, बैलगाडा कमिटी, कुस्ती अखाडा कमिटी, मनोरंजन कमिटी, अन्नदान कमिटी करण्यात आली आहे. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नारळ फोडून गावातील सर्व जेष्ठ, वडीलधारी मंडळी तसेच युवकांच्या उपस्थितीत यात्रेच्या पुर्वनियोजनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

error: Content is protected !!