अहमदाबाद:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १००  व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.
त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.
हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.
हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.
मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात.
अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.

You missed

error: Content is protected !!