वडगाव मावळ :
कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना अशी ओळख असलेला मावळ फेस्टिव्हल सोहळा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २३ ते २५ डिसेंबरपर्यंत पुन्हा रंगणार असून, यामध्ये खेळ रंगला पैठणीचा, श्री शंभू शौर्यगाथा व जल्लोष २०२४ असे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संस्थापक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, अध्यक्ष किरण म्हाळसकर, कार्यक्रमप्रमुख पवन भंडारी यांनी दिली.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाने होणार आहे. यासाठी मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला तसेच आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या वेळी अभिनेत्री साक्षी गांधी उपस्थित राहणार आहे व बालगोपाळांसाठी फनफेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. २४) सायंकाळी ६ वाजता या सोहळ्याचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर, सोहळ्याचे निमंत्रक म्हणून माजी राज्यमंत्री संजय भेगडे उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना समाजभूषण, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर जीवनगौरव व हर्षदा गरुड यांना क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी गोपूजन, श्री शंभू शौर्यगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता प्रसिध्द गायिका वैशाली सामंत, राधा खुडे यांच्यासह नामवंत गायकांच्या उपस्थितीत जल्लोष २०२४ हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोहळ्याचे संयोजन पदाधिकारी सुरेश जांभुळकर, भूषण मुथा, शंकर भोंडवे, बंडोपंत धर्माधिकारी, नामदेव ढोरे, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, नितीन कुडे, रवींद्र काकडे, शामराव ढोरे, जितेंद्र कुडे, प्रमोद म्हाळसकर, सागर जाधव, महेंद्र म्हाळसकर, सलीम तांबोळी, बाळासाहेब भालेकर, विनायक भेगडे, शेखर वहिले, दत्तात्रय लंके हे आहेत.

You missed

error: Content is protected !!