तळेगावात उद्यानाला गो. नी. दांडेकर यांचे नाव
तळेगाव स्टेशन :
गो.नी. दांडेकरांचे तळेगाव दाभाडे मध्ये उद्यान स्वरूपात स्मारक होईल, अशी अपेक्षा आम्ही कधीच केली नव्हती. तळेगावकरांचे गोनीदां अतूट नाते होते, हेच यातून दिसून येते. गोनीदां’चे विचार, त्यांची पुस्तके ज्यांना आवडतात, अशा ‘गोनीदां’ प्रेमींसाठी काय करता येईल का, यासाठी तळेगावकरांना साद घालते, अशा शब्दात गोनीदां’च्या कन्या वीणा देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ संगीत मैफिलीने तळेगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. तळेगाव शहराचे सांस्कृतिक वैभव वाढवण्यासाठी ज्या गो. नी. दांडेकर यांनी मोलाचा वाटा उचलला, त्या गोनीदां’च्या नावे आनंदनगर, तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेने भव्य उद्यान साकारले आहे. या उद्यानाचा नामकरण सोहळा जनसेवा विकास समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
  यावेळी गोनीदां’ची नात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. अनंत परांजपे, पं. सुरेश साखळकर, पं. किरण परळीकर, डॉ. शालिग्राम भंडारी, अभय लिमये,माजी नगराध्यक्षा  सुलोचनाताई आवारे, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,  जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, नगरसेवक  गणेश काकडे, निखिल भगत, रोहित लांघे, सुनील करांडे उपस्थित होते
          वीणा देव  म्हणाल्या,” गोनीदां यांनी आरोग्याच्या दृष्टीने चांगले वातावरण असलेल्या तळेगाव दाभाडे या गावात वास्तव्याचा निर्णय घेतला, ही एका दृष्टीने चांगली गोष्ट होती. मावळ पसिरातील ऐतिहासिक लेणी, संत तुकारामांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर, राजमाचीचा किल्ला, आळंदी अशा धार्मिक – सांस्कृतिक वातावरणांशी एकरूप होता यावे, यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे या गावाची निवड करून १९४८ मध्ये ते या गावात रहाण्यास आले.
           बहुधा सर्व लेखन त्यांनी तळेगावातच केले. महाराष्ट्रातील शेकडो गड किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या. कित्येक शिवभक्तांना, इतिहासप्रेमींना गडकिल्ल्यांच्या सफरी घडविल्या. त्यांच्याजवळ देण्यासारखे खूप काही होते. त्यांच्याकडे जीवनानुभव प्रचंड असल्याने तो अनुभव इतरांना सांगण्यासाठी त्यांनी माणसे जोडली. यातूनच त्यांनी मित्रही खूप जोडले होते.
            त्यांना माणसांची पारख होती. महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत, त्यांनी लेखकांवर प्रेम केले. तळेगावकरांनीही त्यांना खूप प्रेम दिले. म्हणून त्यांचे लेखन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही वीणा देव यांनी केले.
   अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, की गोनीदां हे निसर्गाशी तादात्म्य साधणारे व्यक्तिमत्व होते. तळेगाववर अतोनात प्रेम करणारे होते, याची आठवण यानिमित्ताने येते. माझ्या लहानपणी त्यांच्यासोबत केलेल्या गड किल्ल्यांच्या सफरी आजही स्मरणात आहेत. गडकिल्ले बघायचे कसे, हे त्यांनी खूप वेगळ्या अंदाजाने शिकविले होते.
   त्यामुळे या उद्यानात गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या तर आजच्या पिढीला गडकिल्ले समजतील, ही गोनीदां’ना खरी आदरांजली ठरेल.  डॉ. परांजपे म्हणाले, की गोनीदां आणि तळेगावकर हे अनोखे नाते होते. त्यामुळे त्यांच्या नावाने उद्यान होतेय, हे सुखावह आहे. तळेगावकरांच्या वैभवाला साजेसे हे उद्यान आहे. अनेक दिग्गज तळेगावमध्ये आले आणि इथल्या लोकांमध्ये मिसळले. गोनीदां यांनी लेखनासोबत इथल्या कलाकारांनाही पुढे आणण्याचे काम केले. त्यांचे सर्व साहित्य युवा पिढीसाठी प्रेरक आहे.
         पं. किरण परळीकर म्हणाले, की गोनीदां’चा खूप स्नेह लाभला, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्यांनी लिहिलेलं पहिले वाचणारा मी होतो. त्यांनी असंख्य लहान मुलांना ज्ञानेश्वरी व भगवद्गीता वाचायला शिकवली लहान मुलांना किल्ल्यावर नेले. किल्ल्यांप्रती प्रेम करायला शिकवले. तिथली माहिती दिली. त्यांना निसर्गाची प्रचंड आवड होती. त्यांना भेटल्याशिवाय एकही दिवस चैन पडत नव्हती. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी सोबत आहेत. ते इथेच आहेत याचा भास होतो.
        पं. साखवळकर म्हणाले, की मी पुण्यात स्थायिक होण्याला केवळ गोनीदां यांचे साहित्य कारणीभूत आहे. गगनाला गवसणी घालणारे हे व्यक्तिमत्व होते. लता मंगेशकर यांना भगवद्गीतेतील श्लोकचे उच्चार त्यांनी शिकवले, हे भूषणावह आहे. विशेष म्हणजे त्यांना सर्व बोलीभाषा अवगत होत्या. त्यांचे प्रचंड साहित्य मी वाचले आहे. त्यापैकी कर्णायण खूप आवडले. त्यांचे उद्यान रुपी स्मारक होणे, ही तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.
          अभय लिमये म्हणाले, की त्यांच्यातला नम्रता हा गुण घेण्यासारखा आहे. तसेच त्यांचा भावुकपणा विसरता आलेला नाही. सूत्रसंचालन विनया केसकर यांनी, तर आभार अच्युत मिलिंद यांनी मानले.
डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरेंच्या गायनाने तळेगावकर मंत्रमुग्ध झाले.
         गोनीदां’च्या नावाने साकारण्यात आलेल्या उद्यानाच्या नामकरण कार्यक्रमानंतर संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफिल अनुभवण्यासाठी  गुलाबी थंडीतही रसिकांनी गर्दी केली होती. ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’, ‘अगो बाई ढगोबाई’, ‘सरीवर सर’, ‘तूच चंद्रमा’, ‘गझल- तुज बघता सारा हिशोब चुकला होता’, ‘हा देही वणवा पिसाटला’, ‘सांग सख्या रे’, ‘गाडी सुटली रुमाल हलले’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी तुला’ अशा एकाहून एक सरस गीतांची मेजवानी त्यांनी दिली. रसिकांनीही टाळ्या, शिट्ट्यांची उत्स्फूर्त दाद दिली.

You missed

error: Content is protected !!