कर्तृत्वाच्या जोरावर उभं राहिलेलं नव नेतृत्व: बाबाजीशेठ तुकाराम गायकवाड
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन
वाढदिवस विशेष:
कर्तृत्वाच्या जोरावर उभं राहिलेलं नव नेतृत्व अशी ओळख टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाबाजीशेठ तुकाराम गायकवाड यांनी उभी केली आहे.पारंपरिक शेती आणि दुग्ध व्यवसायला जोपासून त्यांनी अन्य व्यवसायात मारलेली मुसंडी निश्चितच कौतुकास्पद आहे.याच दरम्यान,जनसेवेचे व्रत जोपासत कर्तृत्वाच्या जोरावर उभं राहिलेलं नव नेतृत्व ही ओळख दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.
   ९ नोव्हेंबर १९८३ला टाकवे बुद्रुक येथील तुकाराम सखाराम गायकवाड व जिजाबाई तुकाराम गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी बाबाजी यांचा जन्म झाला.या काळात इतर कुटुंबाची परिस्थिती जशी होती तशीच परिस्थिती गायकवाड कुटुंबियांची होती. बाबाजी यांचे आजोबा सखाराम गायकवाड पारंपारिक पद्धतीने शेती करायचे.दावणीला गाई वासरे म्हशी आणि बैल जोडी बांधलेली असायची. त्यांच्या गळ्यातील घुंघरमाळाच्या आवाजाने घरात चैतन्य असायचे असायचे. शेतीला दूध धंद्याची जोड देत वडील नमस्कार तुकाराम सखाराम गायकवाड हे दुग्ध व्यवसाय सांभाळत होते.
बाबाजी यांचे  बालपण आनंदात गेले. आजी आजोबांच्या प्रेमात नातवंडांची बालपण सरत असेच बालपण बाबाजीशेठ यांचे सरले. आजोबांच्या सोबत बैलगाडीतून शेतावर जाण्या सारखे सुख नव्हते. किंबहुना त्यांना गाडीची आवड होतीच  मग ती बैलगाडी असो की कार गाडी. ही आवडच त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ ठरली.लहानपणीपासून शेतीची,बैलजोडी ची आवड होती.
टाकवे  बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी  शिक्षण झाले.तर माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. आठवी ते दहावी शिकत असताना वडिलांचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय असल्याने शाळा शिकत असताना त्यांनी आई-वडिलांना दुग्धव्यवसायात मदत करायला सुरुवात केला.उच्च माध्यमिक शिक्षण वडगाव येथील जुनियर कॉलेज येथे घेतले. येथे शिक्षण घेत असताना, विद्यार्थ्यांना वडगाव येथे चालत जावे लागत असून काही विद्यार्थी सायकलवर जायचे ही बाब लक्षात घेऊन वडिलांकडे प्रवासी वाहतूक करण्यासाठी जिभ गाडी घेण्याचा आग्रह केला. परंतु परिस्थिती जेमतेम असल्याने वडील टाळाटाळ करत होते.
  कालांतराने आजोबांच्या शब्दाला मान देत   वडिलांनी प्रवासी वाहतूक करणारी गाडी घेऊन दिली. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतून थोडे  पैसे मिळत असल्याने अधिक कष्ट करण्याची इच्छा होऊ लागली. या मिळालेल्या पैशातून नवीन काहीतरी चालू करावे अशा कल्पना मनात येऊ लागल्या. याच दरम्यान, टाकवे बुद्रुक येथे  औद्योगिक वसाहत सुरु झाली होती या परिसरात ट्रॅटर पॅक कंपनी, व्हारोक कंपनी,इंडूरन्स कंपनी, नुकत्याच सुरु झाल्या होत्या.
  मोठे बंधू दत्ता शेठ गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या कंपनीतून ट्रान्सपोर्ट सुरू केले. कालांतराने या ट्रान्सपोर्ट मधून चांगल्या प्रकारे पैसे परंतु येथील औद्योगिक वसाहतीत परराज्यातील कामगार काम करत असून स्थानिक कामगारांना कामावर प्राधान्य देत  नसल्याने यावेळी दत्ताशेठ गायकवाड यांनी स्थानिकांना काम मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत होते. त्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर वारंवार बैठक घेऊन शेकडो स्थानिक नागरिकांना  विविध कंपनीत काम मिळवून दिले.
   तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना कंपनी बेस वर कामाला लावून कायमस्वरूपी रुजू केले. या परिसरात दत्ता शेठ गायकवाड व बाबाजी गायकवाड या दोन्ही नावांची उद्योजक म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती. हे  दोन्ही भाऊ स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. दत्ता शेठ गायकवाड यांनी माथाडी कामगार संघटना उभारून त्यांनी स्थानिक  कामगारांना प्राधान्य देऊन शासकीय माथाडी बिल्ले वाटप केले. यासोबत त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरळीत चालला होता.
    ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २००५ साली बाबाजी गायकवाड यांची  सदस्य पदी निवडून येऊन आपल्या विविध विकास कामे  केली.२००७ साली टाकवे ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी कार्यभार सांभाळला . यावेळी बाबाजी गायकवाड यांनी परिसरातील विविध कंपन्या मधून, फुल उत्पादक कंपनी यांच्या मार्फत गावातील स्वागत कमान, बंदिस्त गटार, पिण्याच्या पाण्याची जॅक विल पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची टाकी उभारून,कॉंक्रीट रस्ते अशी कोट्यवधीची विकास कामे पूर्ण केली.
    उपसरपंच असताना नागरिकांच्या समस्याची कामे करण्याची आवड निर्माण होऊन सतत परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवताना आनंद मिळत असल्याने समाधान व्यक्त करत होते.  काही कालांतराने मोठे बंधू  दत्ताशेठ गायकवाड यांचे अल्पशा आजाराने २०११ मध्ये दुःख निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घरावर दुःखाचे सावट आले. या प्रसंगी माजी आमदार स्व. रघुनाथदादा सातकर यांनी आधार देत बाबाजी गायकवाड यांना मार्गदर्शन करत असे बाबाजी गायकवाड यांनीही आपले मोठे बंधू दत्ता शेठ गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपला व्यवसाय प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असून त्यांनी टाकवे  बुद्रुक येथे पेट्रोल पंप उभारला, असताना परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारणे व लोकांच्या समस्या सोडवणे अशी कामे अनेक वेळा केली काही कामांना यश आले तर काही कामांना अपयशी होऊन सुद्धा पुन्हा त्यांचा वारंवार पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत राहिले ते आजवर तसेच प्रयत्न सुरू आहेत.
    त्याचबरोबर बाबाजी गायकवाड आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील महिला भगिनींना कोल्हापुरचे महालक्ष्मीचे दर्शन, नाशिक त्रंबकेश्वर वनी, पंढरपूर यात्रा दर वर्षी काढत असतात.पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, कोरोनाच्या महामारी मध्ये परिसरातील  वाड्या-वस्त्या वरती मास,सॅनिटायझर, अन्नधान्य वाटप, आषाढी वारीत भाविकांना छत्री वाटप, रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप,गोरगरीब लोकांना ब्लॅंकेट वाटप, तसेच दिवाळी ला आदिवासी गरीब कुटूंबाला दिवाळीचा फराळ वाटप असे विविध उपक्रम वर्षभर चालूच असतात. सतत समाजासाठी काम करण्याची धडपड सुरूच आहे
     ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक २०१५  ते २०१७ साली. त्यांच्या मातोश्री जिजाबाई गायकवाड यांना सरपंच म्हणून  केले. असून त्यांनी ग्रामपंचायत चा  कार्यभार सांभाळला .तर वडील तुकाराम सखाराम गायकवाड यांनी मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष पदी असून संपूर्ण तालुक्यातील वारकरी देहू ते पंढरपूर पायी वारीत वारकऱ्यांचे  नियोजन करीत आहेत. अशा या शेतकरी, सांप्रदाय कुटुंबातील बाबाजी गायकवाड यांच्याकडे यशस्वी उद्योजक म्हणून पाहत आहे. यशस्वी उद्योजक ही बिरुदावली मिळवणारे बाबाजीशेठ राजकारणात देखील हुकमी एक्का आहे. त्यांच्या पाठीशी तरूण पिढीची मोठी शक्ती आहे. वडीलधारी मंडळींचा आणि मायमाऊल्यांचा आशीर्वाद आहे. दत्ताशेठ गायकवाड यांच्या अकाली जाण्याने बाबाजीशेठ कुटुंबाचा, नातेवाईकांचा आधार बनले.
     प्रत्येकाच्या सुख दु:खात सहभागी होऊन त्यांची सुख दु:ख वाटून घेऊ लागले. हा त्यांचा मूळ स्वभाव गावापुरता किंवा नातेवाईक यांच्या पुरता मर्यादित न राहता आंदर मावळ, नाणे मावळात सर्वदूर वर पोहचला आहे. त्यांच्या पाठीशी कामगारांची मोठी शक्ती उभी आहे. कुटुंबातील सर्वाच्या आशीर्वादानेच स्व कर्तृत्वाने उभं राहिलेलं बाबाजीशेठ गायकवाड यांचे नव नेतृत्वाकडून सर्वाना अपेक्षा आहे, या अपेक्षा फलश्रुती च्या वाटचाल करीत असल्याचा आम्हा मंडळींना नातेवाईक म्हणून आनंद आहेच. हा सगळा लेखन प्रपंच मांडण्याचे कारण, आज बाबाजीशेठ गायकवाड यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करताना गत काळ आठवला आणि उद्याचा भविष्य काळ ही डोळया समोरून तरळून जात आहे.
     आजच्या वाढदिवसानिमित्त बाबाजीशेठ यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा व्यक्त करीत, भविष्यातील स्वप्नांचा वेध घेण्यासाठी शुभेच्छा देऊन शब्दांना पूर्णविराम.
     (शब्दांकन-नामदेवराव नानाभाऊ शेलार, आदर्श सरपंच)

error: Content is protected !!