जनसामान्यांशी नाळ जोडून विकास कामात रमणारा युवा नेता: रोहीदास असवले
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:
नेतृत्व गुणांचा विकास चार भिंतीत होतो असे नाही.त्यासाठी मैदानावर उतरून लढावाच लागते. असेच मैदानात उतरून लढण्याचे बाळकडू टाकवे बुद्रुक येथील रोहीदास राघू असवले या  तरूणाला लाभले आहे.लढणे हे त्याच्या पाचवीला पुजेले आहे.
राजकीय आखाड्यात उतरण्यापूर्वी या पठ्ठ्याने लाल मातीच्या आखाड्यात चितपट कुस्त्यांचा डाव मारला आहे. अनेक आखाड्यात लालमाती अंगावर घेऊन नेटाने लढती केल्या आहे.पैलवानकीचा वारसा असलेला हा तरूण उच्चशिक्षित आहे,त्याचे पदवी पर्यत शिक्षण झाले आहे. शेतीशी नाळ जोडलेल्या या तरूण नेत्याचे बालपण गाई वासरे,शेती यात रमले. मातीशी घट्ट नाते असलेल्या या तरूणाने पुढे व्यवसायही मातीशी सबंधित निवडला जोपसला आणि त्यात करिअरही केले.
लाल मातीच्या आखाड्यात बाजी मारणारा हा तरूण राजकीय पटलावर लढतीचा सराव करतोय. यासाठीची त्याची तयारी काही वर्षापूर्वी सुरू झाली. आंदर मावळातील सर्वात मोठ्या टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतींचा सदस्य त्या नंतर उपसरपंच या पदाला या पठ्ठ्याने न्याय दिला. तसं तर त्यांच्या पाठीशी कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती. वडील राघू तान्हू असवले शेतकरी,भाजी पाला विक्री करायचे. त्याच जोडीला त्यांनी वीट भट्टी केली. कुटुंबाच्या संगोपनासाठी राबणारे राघूजी असवले भावा- बहिणीत रमायचे. कुटूंबाच्या आनंदासाठी,सुखा समाधानासाठी त्यांनी काबाडकष्ट केले.
त्यांना साथ सोबत दिली ती त्यांच्या अर्धांगिनी यमुनाबाई राघू असवले यांनी. मोहितेवाडीच्या घोंगे परिवारातील या माऊलींनी असवले परिवाराला उभे केले.त्यांची सुख दु:ख आपली मानली. त्यांना पाच भाऊ,दोन बहिणी .रोहीदास असवले यांना आई वडीलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आणि वाढवले. वडील पैलवान असल्याने पैलवानकीचा वारसा रोहीदास यांनी काही काळ जपला.पण सामाजिक कार्याचा ओढा त्यांना काही स्वस्थ बसू देईना म्हणून ते पुढे राजकारणात सक्रीय झाले आणि यशस्वी होत आहे.
रोहीदास असवले यांचे प्राथमिक शिक्षण टाकवे बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गावातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात झाले. आणि पदवी पर्यतचे शिक्षण तळेगाव दाभाडे शहरातील इंद्रायणी महाविद्यालयात झाले. एकीकडे शिक्षण सुरू असतानाच दहावी नंतर पारंपारीक व्यवसाय असलेल्या वीटभट्टी व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले. याच दरम्यान कोल्हापूरच्या तालमीत कुस्त्यांचे धडे गिरवून पुढे त्यांनी ग्रामीण भागातील आखाड्यात कुस्त्या मारल्या.
शिक्षणाबरोबर व्यवसाय आणि कुस्त्यांची आवड जोपासणारे रोहीदास असवले यांनी जीवाभावाचे मित्र मिळवले आणि ते टिकवले सुद्धा. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर रोहीदास असवले यांनी टाकवे बुद्रुक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून १७ वर्षे काम केले. या १७ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे सख्य वाढले. विशेषत: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. या प्रेमातूनच टाकवे बुद्रुक वडेश्वर जिल्हा परिषद गटातून अतिष परदेशी या सर्वसामान्य तरुणाला उमेदवारीची पहिली शिफारस रोहीदास यांनी केली. परिणामी परदेशी जिल्हा परिषदेत निवडून गेले. पुढे समाज कल्याण विभागाचे सभापती झाले.
१७ वर्षे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहाणाऱ्या रोहीदास असवले यांना पक्ष नेतृत्वाने काही कारणास्तव डावलण्याने त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेत भाजपाला आपले केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. आजमितीस भाजपाच्या सर्व गोटात असवले यांचा स्नेह उत्तम असून जनसंपर्क दांडगा आहे.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम यांच्याशी अन्य भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे.
भाजप मध्ये प्रवेश केलेल्या रोहिदास असवले यांच्या गळ्यात भाजपाने टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्ष पदाची माळ घातली. याच दरम्यान ते ग्रामपंचायतीत कार्यरत होते. राजकारणाला समाजकारणाची जोड देत रोहीदास असवले यांनी गावातील सर्वागीण विकासाची कास धरली. अनेक विकास कामांचा पाठपुरावा करीत कामे खेचून आणली. मग ती आमदार फंडातील असतील,जिल्हा परिषद,जिल्हा नियोजनची असतील किंवा ग्रामपंचायत पातळीवर असतील  या कामांमधून गावाच विकास झाला. रस्ते,बंदिस्त गटारे,पाणी पुरवठा योजना,शैक्षणिक इमारती,आरोग्य सुविधा,घरकूल योजना,स्मशानभूमी,स्मशानभूमी निवारा शेड अशी एक ना अनेक कामे आहे ज्या कामांसाठी रोहीदास असवले यांचा सिंहाचा वाटा आहे.
एका खाजगी कंपनीतील सामाजिक विकास निधीतून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक वास्तू मुळे कित्येक मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय झाली.तर जनावरांचा दवाखाना,सौर अभ्यासिका या सारख्या काही कामांना जागेची उपलब्धता न झाल्याने हा शासनाचा निधी परत गेल्याची खंत रोहीदास असवले यांनी बोलून दाखवली. गावपातळीवरील विकास कामे करतानाच त्यांनी ग्रामीण भागात प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले. सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले,या प्रत्येक उपक्रमात रोहीदास असवले यांनी वाटा उचला.मग ते काम शैक्षणिक असो की निसर्गाशी संबंधित त्यात रोहीदास यांचे नाव आघाडीवर असायचे.
बेलज गावातील वृक्षारोपण आजही त्याची साक्ष देताना दिसेल.रोहीदास यांनी ग्रामीण भागातील देवस्थान व मंदीरे यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. सेवा फाउंडेशनने शासनाच्या विरोधात टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पूल व कान्हे येथील उड्डाणपूल या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेतलेल्या अंदोलनात रोहीदास असवले आघाडीवर होते. त्याचे फलित आज आपणांस दिसतेय. इंद्रायणी नदीवर रिफलेक्टर लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता हे आवर्जून सांगावे लागेल. समाजाशी नाळ जोडलेल्या या तरूणाच्या आयुष्यात अनेक सुखाचे प्रसंग आले तसे दु:खाचे प्रसंग आले. मग ते कामगार नेते कै.हरिभाऊ राघू असवले,कै.साहेबराव राघू असवले या बंधूचे निधन असेल.
आज रोहीदास यांच्या पाठीशी भाऊ विट कारखानदार बाळासाहेब राघू असवले,पुतणे सोमनाथ,समीर,ऋतिक,गिरिश,पुतण्या पल्लवी,सोनया,जान्हवी, मुले रूद्रेश,व्यंकटेश खंबीर पणे उभे आहेत.
आगामी काळात समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन विकासाचा हा रथ ओढायचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या इच्छेला परमेश्वराने सुयश द्यावे ऐवढीच अपेक्षा करीत,टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व टाकवे बुद्रुक वडेश्वर जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत या लेखन प्रपंचाला पूर्णविराम.

error: Content is protected !!