मुंबई:
छत्रपती युवराज संभाजी महाराज यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही समर्थन करत आहोत,असा निर्वाळा मुंबई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला.
तळेकर यांनी छत्रपती युवराज संभाजी महाराज यांचे समर्थन करताना गतकाळातील गोष्टींना उजाळा दिला.
तळेकर म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनातील प्रसंगावर जर एखादा चित्रपट काढला तर तो बख्खळ पैसा मिळवून देतो. यातुनच पुन्हा नव्याने काही वर्षात तानाजी,बाजीप्रभु, यांचे बलिदानावर चित्रपट आले. हे चित्रपट टॅक्स फ्रि करावेत अशी सरकार कडे आम्ही मागणी ही केली होती.
कारण आम्ही बहुतांश डबेवाले हे मावळातून मुंबईला कामासाठी आलो आहोत. आम्ही मावळ मराठा आहोत.
एक काळ असा होता आमच्या हातात ढाल होती, तलवार होती आम्ही गड किल्ले चढत होतो गड जिंकत होतो.आता आमच्या हातात जेवणाचा डबा आहे व दादर आणि शिड्या चढून आम्ही तो डबा पोहचवतो आहे.
आमचे पुर्वज स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले, त्यांनी घरादाराची राखरांगोळी झाली, गावा वरून गाढवाचे नांगर फिरले तरी आमचे पूर्वज  डगमगले नाही. हा आमच्या पुर्वजांचा त्याग, पराक्रम चित्रपटांच्या माध्यमातुन प्रेक्षका समोर नव्याने येतो आहे, त्या बद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
परंतु असे करत असताना चित्रपटाला बाजारी स्वरूप येण्यासाठी त्यात बरेच बदल परस्पर केले जातात,  आणि हे बदल कोठे तरी आमच्या मनाला खटकतात ?
छत्रपती युवराज संभाजी महाराज यांनी या बाबत रोखठोक भूमिका घेतली आहे या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. “वेडात मराठी वीर दौडले सात” या चित्रपटातील योध्यांची वेषभुषा पाहीली तर ती वेशभुषा मावळी दिसत नाही ती अगदी सिंकदर राज्याच्या सैनिकांच्या वेशभुषे सारखी विदेशी दिसते आहे ? हा मावळ्यांचा अपमान आहे.
जर अशी अपमान जनक दृष्य चित्रपटांत फक्त गल्ला भरण्यासाठी टाकत असतील तर हे योग्य नाही याला नक्की विरोध केला पाहीजे.या बाबत सरकारने ही लक्ष घातले पाहीजे चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे पण ऐतिहासिक चित्रपट बनवताना भान ठेवणे ही गरजेचे आहे. केवळ गल्ला भरण्यासाठी इतिहासाची तोडमोड करू नये, असा सल्ला द्यायला  सुभाष तळेकर विसरले नाहीत.

error: Content is protected !!