पिंपरी : रुद्रंग, निगडी, पुणे या संस्थेच्या वतीने ‘समजत नाही ते समजून घेऊ’ या उपक्रमांतर्गत सुरेश कोकीळ लिखित ‘कुब्जा’ आणि ‘क्षमा केली म्हण ना…!’ या दोन एकांकिकांचे अभिवाचन करण्यात आले.
पैस रंगमंच, थिएटर वर्कशॉप कंपनी, प्रीमियर प्लाझा, पुणे – मुंबई हमरस्ता, चिंचवड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोकीळ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पागनीस, दिग्दर्शक प्रभाकर पवार, रुद्रंगचे संस्थापक – अध्यक्ष रमेश वाकनीस, ज्येष्ठ लेखिका माधुरी ओक, प्रदीप गांधलीकर, नंदकुमार कांबळे, सुहास घुमरे, संगीतकार नंदीन सरीन, रंगकर्मी अशोक अडावदकर आणि थिएटर वर्कशॉप कंपनीचे नाट्यशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.
नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश वाकनीस यांनी प्रास्ताविकातून, “मराठी साहित्यात दुर्बोध म्हणून दुर्लक्षित करण्यात आलेल्या साहित्यकृतींचे अभिवाचन, रसग्रहण आणि चर्चात्मक ऊहापोह करून त्यातील सौंदर्य रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे!” अशी माहिती दिली.
अभिवाचन उपक्रमांतर्गत प्रथम ‘कुब्जा’ या एकांकिकेचे उज्ज्वला केळकर आणि सागर यादव यांनी अप्रतिम अभिवाचन केले. विशुद्ध प्रेमाऐवजी कुरूप वासनेच्या आवर्तात सापडलेल्या अभिनेत्रीच्या अतृप्त प्रेमाचा आर्तस्वर उज्ज्वला केळकर यांनी आपल्या वाचिक अभिनयातून अधोरेखित करीत श्रोत्यांना अंतर्मुख केले.
शशीधर बडवे, किशोरी सरीन, रमेश वाकनीस, कविता देशमुख, अरुणा वाकनीस यांचा वाचकस्वर लाभलेली ‘क्षमा केली म्हण ना…!’ ही एकांकिका वरकरणी तारुण्याच्या उंबरठ्यावरील विद्यार्थिनीचे प्रथितयश साहित्यिक, प्राध्यापक बुधादित्य देशमुख यांच्याप्रति असलेल्या अनिवार आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधाचे चित्रण करीत असली तरी बुद्धी आणि प्रतिभा यांचा मनोज्ञ अनुबंध अभिवाचनातून उलगडत गेला.
साहित्यकृतीचा लाक्षणिक अर्थ कसा असतो याची मंत्रमुग्ध करणारी अनुभूती श्रोत्यांना मिळाली. रमेश यशवंत यांनी दिग्दर्शित केलेल्या या दोन्ही एकांकिकांना नंदकुमार कांबळे यांनी पार्श्वसंगीत दिले होते.
अभिवाचनानंतर प्रकाश पागनीस यांनी ‘कुब्जा’चे रसग्रहण करताना, “कुरुपतेतही सौंदर्य असते अन् ते पाहण्याची दृष्टी साहित्य वाचनातून मिळते!” असे मत व्यक्त केले; तर प्रभाकर पवार यांनी ‘क्षमा केली म्हण ना…!’ वर भाष्य करताना, “प्रतिभेने बुद्धीकडे क्षमायाचना केली आहे की बुद्धीने प्रतिभेकडे, असे द्वंद्व वाचकाच्या मनात निर्माण करून कोकीळ यांनी या एकांकिकेच्या माध्यमातून बौद्धिक उच्चांक गाठला आहे!” असे गौरवोद्गार काढले.
सुरेश कोकीळ यांनी विख्यात अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चरित्रावरून ‘कुब्जा’ची प्रेरणा मिळाली, असे नमूद करीत, “आपल्या बाळांचे कौतुक ऐकण्याचा अवर्णनीय आनंद आज मी घेतला!” अशी कृतार्थ भावना व्यक्त केली. तिन्ही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रुद्रंगच्या अभिवाचन उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करून त्यातून विविध साहित्यकृतींचे नव्याने आकलन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मिता कुलकर्णी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. रमेश वाकनीस यांनी आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम