तळेगाव दाभाडे : मावळला २०१९ मध्ये असं बेणं लाभलं, ज्याने मावळची संस्कृतीच बिघडवून टाकली. मुले घाटाखाली जाऊन पार्ट्या, व्यसने करू लागली. महिला अत्याचार वाढले. दिवसाढवळ्या गोळीबार झाले. एकंदरीत मावळला बदनाम करण्याचे काम गेल्या पाच वर्षात झाले. त्यामुळे खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका. आमदारांनी तालुक्याचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांची खोटी शपथ घेतली. हा माणूस देवाला जुमानत नसेल तर तुमची काय गत ?, अशी सडेतोड टीका अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी केली.
पवन मावळातील परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी, थूगाव, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, वारू, ब्राम्हणोली, ठाकूरसाई, तिकोना पेठ आदी गावांना भेट देत येत्या २० तारखेला पिपाणी चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहत औक्षण केले. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, ग्रामस्थ, तरुण, तरुणी, वारकरी संप्रदाय, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूसाहेब भेगडे म्हणाले, विद्यमान आमदारशेळके यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. जनतेने त्यांचे खरे व खोटे रुप पाहिलेले असून, जनतेला आता सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. जे विश्वासघात करतात, अशा मंडळीच्या पाठीमागे जनता उभी राहत नाही. आमदार सुनील शेळके नेहमी टिमकी वाजवतात की, मतदारसंघात विकास झाला, चार हजार कोटीचा निधी आणला; मग महिलांना साड्या, पैसे वाटप, विमान प्रवास असे उद्योग का करावे लागतात? पैसे वाटणारे कार्यकर्ते नेमके कोण आहेत, हे तपासले तरी सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
आमदारांना सत्तेची व पैशाची मस्ती असून, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही, तर विश्वासघाताचे व्हीजन आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकीत सावध रहावे, असे आवाहनही बापूसाहेब भेगडे यांनी केले.