वडगाव मावळ – तालुक्यातील बहुतांश प्रस्थापित पुढाऱ्यांनी एकत्र येऊन मला एकटं पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण मावळातील तमाम जनता माझ्या मागे आहे. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा मी जनतेला घेऊन लढतो, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दिले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्यासमोर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर पंचायत समिती समोर झालेल्या जाहीर सभेत शेळके बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, गणेश ढोरे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, भाजपचे माजी नगरसेवक देविदास कडू, सुरेश दाभाडे, बबन ओव्हाळ, आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात सुनील शेळके यांनी विरोधकांवर आक्रमक पद्धतीने हल्ला चढवला. काही पुढार्यांनी मला तालुक्यात एकटे पाडायचा प्रयत्न चालवला आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून एवढी मोठी जनता माझ्या पाठीशी जमा झाली आहे. व्यासपीठावरील ५० पुढारी म्हणजे मावळची जनता नाही. माझ्यावर टीका करणाऱ्या पुढार्यांच्या माता- भगिनी देखील माझ्याबरोबर आहेत. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो, असे आमदार शेळके यांनी विरोधकांना सुनावले.
*मतदार म्हणजे मेंढरं नव्हे – शेळके*
वडगावमधील बाबुराव वायकर, सुभाष जाधव, रुपेश म्हाळसकर या पुढार्यांसाठी मी सर्वतोपरी मदत केली, पण त्यांनी माझी साथ सोडली. प्रत्येक गावात जाऊन तेथील पुढार्यासाठी आपण काय काय केले, ते मी सांगणार आहे, असेही शेळके म्हणाले. ‘धनगर आपल्या बाजूला करा, मेंढरं आपोआप मागे येतात’, या माजी मंत्री मदन बाफना यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. पुढाऱ्यांच्या सांगण्यावर कोणाच्याही मागे जायला जनता म्हणजे मेंढरं नाही, अशी टिपणी त्यांनी केली. प्रेम असल्याशिवाय जनता कोणाच्याही मागे जात नाही, असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात आपण कोणालाही दुखावले नाही, कोणाला त्रास दिला नाही, कुणाची फसवणूक केली नाही, कोणाचा विश्वासघात केला नाही. तरीही एवढे पुढारी माझ्या विरोधात जायचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
*’वारकरी सांप्रदाय त्यांना धडा शिकवेल’*
निवडणुकीचे १५ दिवस मला जपा, मी तुमची पुढील पाच वर्षे काळजी घेईन, अशी ग्वाही शेळके यांनी मावळच्या जनतेला दिली. तालुक्याच्या विकासकामांबरोबर तुमचे दुःख, वेदना माझ्या खांद्यावर द्या. पुन्हा निवडून आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
कधीही घराबाहेर न पडलेल्या माता-भगिनींसाठी तीर्थयात्रा व सहली काढल्या तर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. वारकऱ्यांवर आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय वारकरी सांप्रदाय राहणार नाही. मला विरोध करणाऱ्यांनी कधी कुणासाठी एक रुपया देखील खर्च केलेला नाही. मी मात्र सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करतो. निवडून आल्यानंतर कधीही विमानाने प्रवास न केलेल्या माता-भगिनींना विमान प्रवासाचा आनंद देखील मी देणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*’सगळ्या भावक्या एकत्र केल्या’*
सुनील शेळके नको म्हणून पक्षीय मतभेद विसरून भेगडे यांनी भावकी एकत्र केली. माझे नाव सुनील भेगडे असते तर मी तर मग मी त्यांना चाललो असतो, अशी मुश्किल टिप्पणी शेळके यांनी केली. भेगडे एकत्र झाले म्हणून तालुक्यातील बाकी सगळ्या भावक्या पण एकत्र झाल्या आणि माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत, असे ते म्हणाले.
*सर्वपक्षीय नव्हे ‘सर्वपुढारीय’*
विरोधी उमेदवाराचा उल्लेख सर्वपक्षीय असा करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांनी महायुती म्हणून मला पाठिंबा दिला आहे. ते दावा करीत असलेल्या काँग्रेस पक्षानेही त्यांना अजून पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ते ‘सर्वपक्षीय’ नव्हे तर ‘सर्वपुढारीय’ नेते आहेत, अशी खिल्ली शेळके यांनी उडवली.
आपण कधीही पक्ष न पाहता सर्वांना शक्य ती मदत केली आहे. अगदी बापूअण्णा, बाळाभाऊ यांच्या पुतण्यांनाही कंत्राटे मिळवून दिली आहेत, असा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला. एवढं करूनही तुम्ही माझं घरदार संपवायला निघाला असाल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. मी मरणाला घाबरत नाही. पण मावळच्या मायबाप जनतेला त्रास देणे थांबवा. रात्री-अपरात्री लोकांच्या घरी जाऊन धमक्या देणे बंद करा, अन्यथा जनतेच्या मनातील राग उफाळून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
*शिवसेना महायुतीचा धर्म पाळणार – खासदार बारणे*
आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या गावागावात विकास पोहोचवण्याचे काम गेल्या पाच वर्षात केले आहे. आपण नेहमीच विकासाला साथ देतो. त्यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक महायुती धर्माचे पालन करतील व शेळके यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी यावेळी दिली.
सुनील शेळके यांनी तालुक्यातील गोरगरिबांसाठी सदैव मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता एकदिलाने शेळके यांचे काम करतील, असे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले.
दिवाळीतील भाऊबीजेचा दिवस असतानाही प्रचाराच्या शुभारंभासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले होते. आमदार शेळके यांच्यासह सर्व वक्त्यांनी उपस्थित भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन
- मावळात बैलगाडा मालकाचा खून