मावळातील बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांचे मावळवासियांना आवाहन
तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी : मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आयोजित जाहीर सभेत मावळातील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी बापूसाहेब भेगडे यांना निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी मावळवासियांना आवाहन केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट)चे वरिष्ठ सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपा महिला आघाडीप्रमुख सायलीताई बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. रुपालीताई दाभाडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेला संबोधित करताना ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना म्हणाले, की मावळात गेल्या पाच वर्षात लबाडी आणि फक्त लबाडीच सुरू होती. आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले. त्यांचे व्यवसाय बंद पाडले, कामे काढून घेतली आणि फक्त कमिशन एजंटचे काम केले. त्यामुळे मावळची जनता यांच्या कारभाराला वैतागली असून, आता परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असेही बाफना यांनी सांगितले.
काँग्रेस नेते रामदास काकडे यांनी प्रखर शब्दात टीका करताना आमदार सुनील शेळके यांच्या कामाचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, मावळच्या जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. मात्र ,त्यावेळी यांच्यातला राक्षस ओळखण्यात जनता कमी पडली. तो पक्का सोंगाड्या आहे. आमदारांनी विकासाचे काम करायचे असते. यांना पाच वर्षात आमदारकी कळलीच नाही. एमआयडीसीमध्ये शासनाच्या माध्यमातून कामे करून तरुणांच्या हाताला काम द्यायला हवे होते. मात्र, तसे न करता गोरगरीब मुलांची कामे काढून घेतली आणि स्वतःची माणसे पोसली. शाळा कॉलेजची बांधकामे बंद केली. गेल्या पाच वर्षात मावळ तालुक्यातील तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात व्यसन, गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागली आहे. भ्रष्टाचाराने तर कळस गाठला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यामुळे मावळ विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही रामदास काकडे यांनी केले.
माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे म्हणाल्या की लोकप्रतिनिधी हा लोकांचा सेवक असतो. लोकांना त्रास देणारा नसतो. गेल्या पाच वर्षात कित्येक मुले व्यसनी बनली आहेत. त्यामुळे मुलांना जपा. आमदार शेळकेंच्या भूलथापांना बळी पडू नका.
रवींद्रअप्पा भेगडे यांनी सांगितले, की मावळची अस्मिता जपा. त्यासाठी बापूसाहेब भेगडे यांना विधानसभेवर पाठवायलाच हवे. गेल्या पाच वर्षात मावळमधील तरुणांना रोजगार मिळाला का ? टोलनाका बंद झाला का ? उलट गुंडगिरी वाढली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी उभे राहून आमदार शेळकेंची दादागिरी मोडून काढली पाहिजे. मावळची जनता मतदानातून शेळके यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
गणेश भेगडे आक्रमक भाषण करत म्हणाले, की आपण बाजीप्रभूची भूमिका मनापासून निभावतोय. त्यामुळेच आमदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी राजकीय कटुता विसरून आम्ही सारे पक्ष एक झालो आहोत. गतवेळी झालेली चूक सुधारायची असेल, तर अपक्ष बापूसाहेब भेगडे यांना संधी द्यायला हवी. मावळला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात हा संप्रदाय अधोगतीला चाललाय की काय, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. मी म्हणेल ती पूर्वदिशा ही, ही वृत्ती मोडीत काढण्याची वेळ आली आहे. आमदार शेळके यांनी राजकारणाचाही धंदा मांडून ठेवल्याचे दिसते. तरुणांना व्यसनाधीन बनविणे, हा काय रोजगार आहे का? असे सांगत भेगडे यांनी पुराव्यासह आमदार शेळकेंच्या कामाचा पर्दाफाश केला. तसेच मावळचा मुळशी पॅटर्न होऊ द्यायचा नाही, म्हणूनच या विधानसभा निवडणुकीत मावळ पॅटर्न राबवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे म्हणाले, की सध्या मावळ तालुक्यात ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यांना पायबंद घालण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे. सर्व विचार एकत्र करून मावळची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे. ज्या संस्कृती जडणघडणीत मावळ घडला, आज त्याच मावळातील तरुण सैरभैर झाला आहे. या तरुण वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आपण निष्ठेला जागणारा कार्यकर्ता आहे, जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक तरुण मोठ्या पदांवर गेलेले पाहायचे आहे. माझ्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जनतेने संधी दिल्यास तालुक्यातील मुली, महिलांचे पालकत्व स्वीकारणार आहे. शिक्षणाबाबत, अन्यायाबाबत काही तक्रार असेल तर आवाज द्या, आपण सदैव तत्पर असू, असे आश्वासनही बापूसाहेब भेगडे यांनी दिले.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, मावळ तालुका भाजप महिला आघाडीचे अध्यक्ष सायली बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. रूपालीताई दाभाडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, अमित गवारे, अमित घेनंद आदींनी आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
——————————————————-
चौकट :
मामा मला वाचवा : बाळाभाऊ भेगडेंची आमदार शेळकेंवर सडकून टीका :
माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी आपल्या स्टाईलमध्ये आमदार शेळकेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की आमदार सुनील शेळके हे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या उमेदवारीला इतके घाबरले आहेत, की दोन दिवस भाजप नेते आणि माझे दैवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तळ ठोकून होते. मला तिथून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला.. म्हणाले, बाळाभाऊ काय करताय ? मी म्हटलं साहेब ‘करेक्ट कार्यक्रम करतोय..’ यावर उपस्थितात प्रचंड हशा.’
सागर बंगल्यावर गेलो. दहाच मिनिटात आमदार शेळके माझ्या समोर येऊन ‘बाळाभाऊ कधी आलात, असं विचारताच ‘मी म्हटलं आताच आलोय’… म्हणाले मामा मला वाचवा.. मला म्हटले फडणवीसांसोबत दोघांचा फोटो घेऊ… मी म्हटलं एकट्याला घ्यायचे तेवढे फोटो घे साहेबांसोबत…’ आणि तिथून बाहेर पडलो. सांगायचं एवढंच आहे, की गद्दारी तुमच्या रक्तात आहे, आमच्यात नाही. आम्हाला मावळची संस्कृती जपायची आहे. आमदार शेळके शहाणे असाल, तर अजितदादांकडे जाऊन माघार घ्या आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा द्या, असे उपरोधिक आवाहनही बाळाभाऊ भेगडे यांनी आमदार शेळके यांना केले.
———————————————
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआय (आठवले) चा जाहीर पाठिंबा
भाजपचे नेते माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख यशवंत मोहोळ, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका आरपीआय (आठवले गट) मुख्य सचिव संतोष कदम, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन