मुंबई: लोणावळा खंडाळा शहराला पर्यटनातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकही याला अपवाद नाही.मात्र ऑनलाईन बुकींग करून प्रवासी मिळवणाऱ्या ओला उबेर मुळे स्थानिक रिक्षा चालकांच्या व्यवसायाला काहीसी खीळ बसली होती.या बाबत स्थानिक रिक्षाचालक मालकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रश्नी साकडे घातले होते.
या प्रश्नावर धडाकेबाज निर्णय घेत लोणावळा खंडाळयात ओला उबेरला बंदी घालण्यात आली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत लोणावळा खंडाळ्याच्या पर्यटकाला पोषक ठरतील असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा आदेशही देण्यात आले.
शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी लोणावळा शहरात झालेल्या संवाद बैठकीतील चर्चेनंतर पवार यांनी दिलेल्या शब्दानुसार आज मंगळवार दि.२० ऑगस्ट रोजी आपल्या लोणावळा शहरातील विविध समस्यांवरील आढावा बैठक मंत्रालयात संपन्न झाली.आज झालेल्या बैठकीत लोणावळा-खंडाळा शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.आमदार सुनिल शेळके यांची या बाबत भूमिका महत्वपूर्ण ठरली.
या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय याची माहिती देताना आमदार सुनिल शेळके म्हणाले,”
🔸 ऑनलाईन टॅक्सी (ओला/उबेर इ.) यांना लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करण्यास पुर्णपणे बंदी करण्यात आली. यामुळे शहरातील स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकांना नक्कीच दिलासा मिळणार असून अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे.
🔹शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाकरीता वित्त विभागाकडून सुमारे १५ कोटी निधी उपलब्ध करुन देणार असुन जोडरस्त्याचे काम देखील तातडीने करण्याबाबतचे निर्देश संबंधितांना दिले.
🔸लोणावळा-खंडाळा परिसरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात.या पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मध्यतंरी कारवाई करण्यात आली होती.या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर भुशी डॅम परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दादांनी दिले आहेत.
🔹इंदिरा वसाहतीकडे जाणारा रस्ता करण्यास पोलीस विभागाकडून परवानगी देऊन तात्काळ रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
🔸 शहरातील वाहतुक कोंडीची समस्या जाणून घेत जुना मुंबई-पुणे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी नगरपरिषदेकडुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔹 नगरपरिषद हद्दीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सा.बां.विभागाच्या मालकीच्या जागेत पाण्याच्या टाकीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
🔸लोणावळा नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरी उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे सादर केलेल्या प्रस्तावातील कागदपत्रांची पुढील आठ दिवसात छाननी करुन तात्काळ अनुकंपावरील बांधवांना नोकरीची संधी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दादांनी दिले असते.
🔹लोणावळा शहरातील सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए मार्फत एकूण ९ ठिकाणी STP प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेला आहे, त्या प्रस्तावास मंजुरी मिळणेसाठी संबंधितांना निर्देश दिले असुन सदर कामास गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
• या महत्वपूर्ण विषयांसोबत शहरातील विकासासंदर्भातील व स्थानिक अडचणींचा आढावा दादांनी घेतला असुन सदर प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनास कठोर निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीस लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका शादान चौधरी, मिलिंद भालेराव, विशाल मराठे, मुकेश परमार, जीवन गायकवाड,दिलीप गुप्ता, मंगेश आगरवाल, भरत हरपुडे, संदीप कोराड,वसंत काळोखे, दत्ता येवले, अमोल शेडगे, संजय मावकर, संजय सोनवणे, नंदकुमार चोरडिया, गणेश चव्हाण, रमेश म्हाळसकर, नितेश जाधव, योगेश गवळी, आनंद सदावर्ते यांसह इतर स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण, नियोजन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, सा.बां.विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, प्रधान सचिव नगरविकास विभाग, मा.सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांसह संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.