किशोरकुमार यांच्या वैविध्यपूर्ण गीतांच्या मैफलीत श्रोते तल्लीन
पिंपरी :चित्रपटसृष्टीतील प्रतिभाशाली गायक किशोरकुमार यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘ओ माझी रे…’ या किशोरकुमार यांनी गायलेल्या गीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीत श्रोते तल्लीन झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक अभिवादन मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक प्रवीण कुदळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, राजेंद्र पगारे, परमेश्वर घाटगे, विलास खरे, राजेंद्र लढ्ढा, नितीन नखाते, नरेंद्र मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
अतिथीगायक किशोरभक्त तुषार पिंगळे यांच्या सहभागासह विनायक कदम, सुजाता माळवे, नंदकुमार कांबळे, उज्ज्वला वानखेडे, शैलेश घावटे, डॉ. सायली बांबुरडे, अरुण सरमाने, दैवशाला घाडगे, विजय संबारे, अनिल जंगम, विजय सहारे, डॉ. किशोर वराडे, डॉ. अविनाश मंचरकर या गायक कलाकारांनी किशोरकुमार यांच्या कृष्णधवल चित्रपटांपासून त्यांच्या सुवर्णकाळातील चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गीताच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या गीतनिर्मितीचा तपशील आणि संबंधित चित्रपटातील दृश्य प्रदर्शित करण्यात येत असल्याने चोखंदळ रसिकांना आणि सिनेअभ्यासकांना स्मरणरंजनाच्या निखळ आनंदाची अनुभूती मिळाली.
किशोरकुमार यांच्या गायकीतील आर्तता, अवखळपणा, चिरतारुण्य, याॅडलिंगची चमत्कृती, भावुकता, आनंद अन् शाश्वतता अशा संमिश्र भावभावनांनी ओथंबलेल्या “ओ माझी रे…” , “ओ हंसिनी मेरी हंसिनी…” , “कोरा कागज था…” , “सलाम – ए – इश्क…” , “देखा एक ख्वाब तो…” , “तू कितने बरस की…” अशा एकल, युगुल आणि द्वंद्व गीतांना रसिकांनी उत्तम दाद दिली. “निले निले अंबर पर…” या मूळ किशोरकुमार यांच्या आवाजातील गीताचे सुजाता माळवे या ज्येष्ठ गायिकेने समरसून केलेले सादरीकरण, “मैं हुं झूम झूम झुमरू…” मधील यॉडलिंगची तुषार पिंगळे यांनी दाखविलेली कमाल अशा विविध वैशिष्ट्यांमुळे रंगतदार झालेल्या मैफलीचा समारोप “एक चतुर नार…” या सार्वकालिक धमाल गीताचे शैलेश घावटे यांच्या दमदार सादरीकरणाने करण्यात आले. विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सानिका कांबळे, अरुण सरमाने आणि डॉ. किशोर वराडे यांनी निवेदन केले.
- तळेगाव चाकण रस्त्यावर अवेळी धावणा-या कंटेनरला लगाम कधी?
- बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये’स्पेस ऑन व्हील्स’ हा अनोखा उपक्रम
- पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण – दादा वेदक
- संस्कार प्रतिष्ठानच्या यशात मानाचा तुरा