![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_24-02-27_08-00-45-2412183030217197994893-1024x540.jpg)
जुन्या नव्या मराठी आणि हिंदी गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी:
विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘तेरे मेरे मिलन की ये रैना…’ या सुमधुर जुन्या नव्या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या विनाशुल्क मैफलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर मिनी सभागृहात झालेल्या दृकश्राव्य कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, अंध संघटना कार्यकर्ते संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती; तसेच सर्व वयोगटातील रसिकांनी या मैफलीचा मनमुराद आनंद लुटला.
जुन्या पिढीतील हिंदी चित्रपट अभिनेता बलराज सहानी ते मराठीतील विनोदवीर भाऊ कदम यांनी पडद्यावर साकारलेली, महंमद रफी, लता मंगेशकर, किशोरकुमार, आशा भोसले, हेमंतकुमार यांच्यापासून ते अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांनी गायलेली तसेच शफाअत अनामत अली या काहीशा अप्रसिद्ध परंतु अभिजात शास्त्रीय संगीताच्या आवाजातील अनवट गाणेही या मैफलीत सादर करण्यात आले.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे, अश्फाक शेख, मीरा शिंदे, सुजाता माळवे, अरुण सरमाने, दैवशाला घाडगे, सतीश पेटारे, सुशील उपाध्ये, विजय सहारे, अनिल जंगम, डॉ. अजय राऊत, प्रा. अमिता जाधव, राजेंद्र देसाई, सुहास पालेकर, डॉ. चंद्रकांत हिवरकर शुभांगी पवार, भारती बाऊसकर, ज्योती मजिठीया या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलगीतांच्या माध्यमातून रसिकांना खिळवून ठेवले.
“चला जेजुरीला जाऊ…” मधील मराठमोळा नृत्याचा ठेका, “सवेरेवाली गाडीसे…” तील शम्मी कपूरचा खट्याळपणा, “जिंदगी के सफर में…” यामधील गंभीरता, “तुम्हे याद होगा…”तले स्मरणरंजन, “बांगो बांगो बांगो…”ची उडती चाल आणि “रजनीगंधा फुल तुम्हारे…”च्या शांतरसाची अनुभूती, “पन्ना की तमन्ना हैं…”मधला चिरतरुण देवानंद आणि मादक झीनत; तसेच “पग घुंगरू बांध के…” या एकेकाळच्या लोकप्रिय गीतांच्या माध्यमातून आबालवृद्ध श्रोत्यांना आपापल्या आवडीचा श्रवणानंद तसेच नेत्रसुखद आठवणींमध्ये आपले वय विसरायला भाग पाडले.
विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. शैलेश घावटे आणि सतीश धेंडे यांनी तांत्रिक साहाय्य केले. शिवाजी ताटे यांनी कराओके गायनासाठी साहाय्य केले. तुषार कदम आणि मनीष खंडागळे यांनी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी केली. अरुण सरमाने आणि सानिका कांबळे यांनी निवेदन केले. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवाचा समाजाला लाभ करून देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली मैफल रसिकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाली.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_24-02-24_11-36-13-3762647416139997940953-927x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-05-02_22-50-19-3287766899074009906127-682x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-08-01_08-46-55-0155475628773126897058-249x300.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_23-10-18_06-43-19-3434421201102128536515-1024x540.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/02/picsart_22-08-30_16-40-52-6186305501724883847928-1024x932.jpg)