जीवनाकडे पाहण्याची नविन दृष्टी
ज्याला आपण ‘प्रगती’ असे म्हणतो ती प्रगती दोन प्रकारची असते. एकाला उत्कर्ष असे म्हणतात तर दुसऱ्याला उन्नती असे संबोधितात. आधिभौतिक प्रगती (Material Development) म्हणजे उत्कर्ष तर मानसिक-आध्यात्मिक प्रगती (Psycho – Spiritual Development) म्हणजे उन्नती.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने माणसाचा उत्कर्ष भन्नाट वेगाने होत आहे. असा हा उत्कर्ष होत असताना मानसिक उन्नतीकडे मात्र मानवाचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे.याचा दुष्परिणाम असा झाला की,एवढा मोठा उत्कर्ष साधून सुद्धां अखिल मानव जात सुख,शांती, समाधान यानाच हरवून बसली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे माणसाची हाव व धाव प्रचंड प्रमाणावर वाढतच राहिली. हाव आणि धाव या कात्रीत सापडलेल्या मानवजातीला तणावजन्य परिस्थितीला (Tension) सामोरे जावे लागत आहे. या तणावामुळे माणसाच्या शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होऊन त्याला सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगाने ग्रस्त व त्रस्त केले आहे.
हाव आणि धाव या चक्रात सापडून माणसे मनाचा समतोल बिघडवून चक्रम बनत आहेत.अशी ही चक्रम झालेली मनोरुग्ण माणसे जॉमेट्रिकल प्रपोरशनने (Geometrical proportion) वाढत जाऊन त्यांची संख्या मायक्रोस्कोपिक मेजॉरिटीत झालेली आहे.त्याच प्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आहारी जाऊन भौतिक उत्कर्ष साधित असताना मानसिक उन्नतीकडे माणसाचे पूर्ण दुर्लक्ष झाले.
परिणामी शहाणपणयुक्त माणसांची संख्या मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीमध्ये झालेली दिसून येते.रथाच्या दोन चाकांपैकी एक चाक जर नादुरुस्त झाले व त्या परिस्थितीत तो रथ चालवण्याचा प्रयत्न केला तर तो रथ पुढे-पुढे जाण्याऐवजी तो तिथल्या तिथे वर्तुळाकार फिरत राहील.त्याप्रमाणे उत्कर्ष आणि उन्नती ही मानवी जीवन रथाची दोन चाके असून त्यातले उन्नती हे चाक मोडकळलेल्या अवस्थेत असल्यामुळे मानवी जीवनरथ पुढे- पुढे जाण्याच्या ऐवजी तो जागच्या जागी गरगर फिरत आहे.
या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे व तो म्हणजे मानवजातीची मानसिक- आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी युद्ध पातळीवरून (on war footing) प्रयत्न करणे हा होय.
*सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!