सद्गुरू समज- गैरसमज
देवाचा साक्षात्कार
सद्गुरू संबंधी एक महत्वाचा गैरसमज समाजात दिसून येतो,तो असा की सद्गुरू मस्तकावर हात ठेवून देवाचा साक्षात्कार करून देतात.या आचरट कल्पनेच्या आहारी जाऊन अनेक भाविक सुशिक्षित लोक सुद्धां बुवाबाजीच्या जाळ्यात अडकून पूर्ण फसले जातात.
अशा तऱ्हेचा प्रकार असता तर ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज, रामकृष्ण परमहंस,रमण महर्षी वगैरे सत्पुरुषांनी आपल्या सर्व शिष्यांना किंवा भक्तांना ओळीने भोजनाच्या पंक्तीला बसवितात त्याप्रमाणे पंक्तीने बसवून प्रत्येकाच्या मस्तकावर हात ठेवून त्या सर्वांना देवाचा साक्षात्कार करून दिला असता.
मग ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहिण्याची किंवा ‘हांकारोनी सांगे तुका’ असा कंठशोष करून लोकांना उपदेश करण्याची संतांना काहीच आवश्यकता नव्हती म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,
ब्रह्म ज्ञान जरी होय उठा उठी।
तरि का हिपुटी वेदशास्त्रे ।।
ब्रह्म ज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी |
तेथे व्हावा पोटी अनुताप । ।
मस्तकावर हात ठेवून संकल्पसिद्धीच्या बळावर समाधीसारखी अवस्था कांही काळ प्राप्त करून देणे शक्य आहे,परंतु हा समाधी प्रकार वेगळा व भ्रममुक्त होऊन आत्मज्ञान प्राप्त होणे हा प्रकार वेगळा,याची साधकाला जाणीव असणे आवश्यक आहे. कोणीही कुठलीही विद्या कोणाच्याही मस्तकावर हात ठेवून प्रदान करू शकत नाही मग अध्यात्म विद्या जी सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ आहे.
ती मस्तकावर हात ठेवून कशी मिळेल? ‘मस्तकावर किंवा डोक्यावर हात ठेवणे’ ही केवळ सांकेतिक भाषा होय. त्याचा शब्दशः अर्थ घेणे अडाणीपणाचे लक्षण आहे.व्यवहारात सुद्धां आपण म्हणतो की,अमक्या अमक्या माणसाने तमक्या माणसाच्या डोक्यावरून चांगलाच हात फिरविला.याचा अर्थ असा नाही,की त्याच्या डोक्यावरून खरोखरीच हात फिरविला.भावार्थ एवढाच,की त्याने त्याला चांगलेच फसविले.
त्याचप्रमाणे सत् पुरुष शिष्याच्या मस्तकावर हात ठेवतात याचा अर्थ ते आपल्या सत् शिष्याला जवळ बसवून त्याला ‘राजविद्याराजगुह्य’ अशा अध्यात्म विद्येचा दिव्य बोध निरनिराळ्या अंगांनी देऊन दिव्य साधना शिकवितात.अशा प्रकारचे श्री सदगुरूचे शिकवणे व सत् साधकाचे शिकणे हे एक-दोन दिवसांचे काम नसते तर सद्गुरुंच्या सान्निध्यात व त्यांच्या दिव्य बोधाच्या नित्य स्मरणात हे शिकणे व शिकविणे,साधना परिपक्व होईपर्यंत चालूच ठेवावयाचे असते. साधे पदवीधर व्हावयाचे असेल तर बिगरीपासून डिग्रीपर्यंत शाळेत व कॉलेजात जाऊन पंधरा वर्षे म्हणजे पूर्ण एक तप (व त्यावर तीन वर्षे अधिक) पर्यंत शिकावे लागते.
मग सर्व विद्येत श्रेष्ठ अशी ही अध्यात्म विद्या काय मस्तकावर हात ठेऊन किंवा कोणाकडून तरी नुसता मंत्र, माळ किंवा नाम घेऊन प्राप्त होईल अशी आशा करणे खुळेपणाचे लक्षण नव्हे काय? म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
ते ज्ञान पै बरवे । जरि मनी आधी आणावे । तरि संता या भजावे । सर्वस्वेसी ।। ते ज्ञानाचा कुरूठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।। तनू मनू जीवे चरणाशी लागावे । अगर्वता करावे । दास्य सकळ ।। मग अपेक्षित जे आपुले । तेही सांगतील पुसिले ।। जेणे अंतःकरण बोधिले । संकल्पा न ये ।।
“God realisation is a process and not an event”.
*ईश्वर साक्षात्कार ही घटना नसून एक प्रक्रिया आहे असे श्री. गुरूदेव रानडे यांनी जे विधान केले आहे ते या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे.दगड फोडण्यासाठी जेव्हां दहावा घाव घातला गेला तेव्हा दगड फुटला.त्याच्या आधी जे नऊ घाव घातले ते वाया बोले असे नाही. किंबहुना आधी दगडावर नऊ घाव पडले म्हणूनच दहाव्या घावाला दगड फुटला.ईश्वर साक्षात्कारात तसाच प्रकार आहे.
*सतत केलेली साधना फळते तेव्हाच ईश्वर साक्षात्काराची सिद्धी प्रगट होते.
सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन