सर्व श्रेष्ठ यज्ञ उपासनायज्ञ
यज्ञ’ या पारंपारिक संकल्पनेत प्रामुख्याने अग्निची पूजा आहे.दूध, तूप,तीळ,तांदूळ,नारळ वगैरे अनेक पदार्थांची अग्नीत आहुती देऊन व यज्ञ देवतेला प्रसन्न करून घेऊन यजमान,पुरोहिताच्या सहाय्याने स्वत:च्या मनोकामना पूर्ण करून घेतात.अश्वमेध यज्ञ,पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे यज्ञांचे अनेक प्रकार असतात.
हे सर्व यज्ञांचे प्रकार कष्टिक,खर्चिक व वेळकाढू स्वरुपाचे असतात. एवढा सर्व व्याप करून यज्ञ देवता प्रसन्न होतेच व यजमानाला फळ देतेच असे नाही.शिवाय यज्ञ करण्यात यजमानाकडून किंवा पुरोहितांकडून कांही चुका झाल्यास किंवा कांही दोष निर्माण झाल्यास यज्ञ देवता तुष्ट होण्याऐवजी रूष्ट होण्याचीच शक्यता अधिक असते. या यज्ञ प्रकारांत सोवळेओवळे कडक असते व यज्ञ करण्यासाठी कांही निर्बंध पाळावे लागतात. पूर्वीच्या काळात यज्ञदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बोकडाचा बळी देण्यात येत असे.
अर्वाचीन काळात सुद्धां कांही ठिकाणी कोंबड्यांचे व बोकडांचे बळी प्रथा आहे.थोडक्यात,हे सर्व यज्ञ विशिष्ट प्रकाराने,विशिष्ट पद्धतीने,विशिष्ट बंधनासहीत,विशिष्ट वर्गानेच करायचे असतात.परंतु जीवनविद्येचा उपासना यज्ञाचा प्रकार आगळा व वेगळा असा आहे. जीवनविद्येच्या या उपासना यज्ञाच्या प्रकारात होम-हवन नाही व दूध,तूप,तीळ,तांदूळ,नारळ वगैरे कसल्याही पदार्थांची आहुती दिली जात नाही.होम-हवन करून जो यज्ञ केला जातो त्याने जी वातावरण शुद्धी होते,
त्याच्यापेक्षा सहस्रपटीने अधिक वातावरण शुद्धी या उपासनायज्ञाने होते.या उपासनायज्ञाने वातावरण शुद्धी तर होतेच,पण तो करणाऱ्यांना अगणित पुण्याची प्राप्ती करून देते.शिवाय समाजातील सर्व स्तरांतील लोकांत ऐक्याची भावना दृढमूल करण्याचे व त्यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे महान तेजस्वी कार्य उपासना यज्ञाच्या द्वारा घडत असते.
या उपासना यज्ञात वेगळ्याच गोष्टींची आहुती दिली जाते.विषमता,अस्पृश्यता,जातिता, धर्मांधता व अंधश्रद्धा या अनिष्ट गोष्टींची आहुती,उपासना यज्ञात द्यावयाची असते.ही आहुती ज्या यज्ञ कुंडात दिली जाते तो यज्ञ कुंड म्हणजे ‘भगवन्नाम’ हा होय.तुकाराम महाराजांनी भगवन्नाम म्हणजे प्रत्यक्षात अग्निची ज्वाळा आहे असे म्हटले आहे.ते सांगतात,*
चाल केलासि मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ।*
*तुज पापची नाही ऐसे | नाम घेता जवळी वसे |*
*पंच पातकांच्या कोडी । नामे जळता न लगे घडी ।*
*तुका म्हणे काळा । रीघ नाही निघती ज्वाळा ।।*
*अशा या भगवन्नामाच्या यज्ञ कुंडात वरील सर्व अनिष्ट गोष्टींसकट सर्व पातकांची आहुती द्यावयाची असते.हा उपासना यज्ञ करावयास कसल्याही प्रकारचे सोवळे-ओवळे नाही व कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत.त्याचप्रमाणे हा उपासना यज्ञ करण्यासाठी कष्ट नाही व खर्च नाही आणि हा यज्ञ कमीत कमी अर्ध्या तासात करता येतो.ज्याला जेवढा वेळ उपलब्ध असेल, त्याप्रमाणे हा यज्ञ कमी जास्त वेळात करता येतो.या यज्ञात बळी द्यावयाचा असतो,तो ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या न्यायाने बोकडाचा नाही तर सर्व दुःखांचे व सर्व समस्यांचे मूळ जो अहंकार, त्या अहंकाराचाच बळी या उपासना यज्ञात द्यावयाचा असतो.या उपासना यज्ञाची यज्ञ देवता आहे प्रत्यक्ष भगवंत आणि उपासना यज्ञाच्या सेवेने तो प्रसन्न होऊन साधकावर कृपा करतो.उपासना या शब्दात उप आसन असा विग्रह आहे.उप म्हणजे जवळ व आसन म्हणजे बैठक असा त्याचा अर्थ आहे.याचाच भावार्थ असा की, साधकाने आपली बैठक देवाच्या अगदी जवळ आणून ठेवणे हा होय. साधकाची बैठक देवाच्या जवळ इतकी गेली पाहिजे की,देव आणि साधक ह्यांच्यामध्ये भेदच राहता कामा नये.देव आणि भक्त एकरूप होण्याची जी बैठक,त्याला उपासना असे म्हणतात आणि म्हणून उपासना यज्ञामध्ये आपली उपासना अशी झाली पाहिजे की आपण देवाच्या अगदी निकट, जवळ गेलो पाहिजे.
देव पहाया गेलो । तेथे देवची होऊनी ठेलो।*
तुका म्हणे धन्य झालो । आजी विठ्ठला भेटलो ।।*
याच्यामध्ये सुद्धां उपासनेचाच भाग आहे,हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.ह्याचाच गुह्यार्थ असा की, ‘जीव आणि देव एकच आहेत,ह्या भावात उपासना यज्ञ करायचा असतो.म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,*
धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार ।*
*देव आणि भक्त दुजा नाही विचार ।।*
ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हेच सांगतात,*
पै आपुलेनि भेदेविण । जाणिजे जे माझे एकपण |*
तयाचे नांव शरण मज येणे गा ।।*
थोडक्यात,देवाला शरण जाऊन हा उपासना यज्ञ प्रेमभावाने करायचा असतो.हा उपासना यज्ञ पूर्णपणे आगळा आणि वेगळा असा आहे.ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे,*
नाम जप यज्ञ तो परम | बाधू न शके स्नानादी कर्म।*
*नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे ||*
असा हा उपासना यज्ञ आहे.ह्या उपासना यज्ञामध्ये एकंदर नामस्मरणाचे किंवा ईश्वरभक्तीचे अकरा प्रकार आहेत आणि हे अकरा प्रकार नाम घोषाने सुरू होतात व नाम मौनाने त्यांची सांगता होते.म्हणून हे अकरा प्रकार कुठले?*
पहिला प्रकार म्हणजे विठ्ठल नामघोष,दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना आवाहन करणेतिसरा प्रकार ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे एक आवर्तन करणे.चौथा प्रकार म्हणजे नामसंकीर्तन करणे,पांचवा प्रकार म्हणजे नामजप यज्ञ करणे,देवाच्या नामाचा विशिष्ट चालीमध्ये जप करणे,नामजप झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान म्हणून मग आरती करणे.आरती म्हणजे आ + रती असा विग्रह होतो.म्हणजे आत्मस्वरुपाचे ठिकाणी रत होऊन आरती करणे.आरती झाल्यानंतर मग विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना म्हणणे.प्रार्थना झाल्यानंतर मग उपासना यज्ञात भाग घेणाऱ्यांना शंकर आशिर्वाद देतात, ‘शंकर म्हणतो तथास्तु’.त्याच्यानंतर शांतीपाठ म्हणून व नाममौन केल्यानंतर या उपासना यज्ञाची सांगता होते.असा हा उपासना यज्ञ वर म्हटल्याप्रमाणे आगळा आणि वेगळा आहे.इतर यज्ञांमध्ये नाहीत. अगदी सहजपणे हा उपासना यज्ञ केला जातो.हा उपासना यज्ञ अत्यंत प्रभावी असून त्याने माणसाचे कोटकल्याण होते,असा अनेक लोकांचा अनुभव आहे.हा उपासना यज्ञ कोणीही व केव्हाही करू शकतो.एक मनुष्य उपासना यज्ञ करू शकतो किंवा एक लाख माणसे एकत्र येऊन उपासना यज्ञ करू शकतात.उपासना कुठे करायची त्यालाही बंधन नाही. जिथे शक्य आहे,त्या ठिकाणी हा उपासना यज्ञ करता येतो.घरात, दारात,देवळात,हॉलमध्ये कुठेही हा उपासना यज्ञ करता येतो.ह्या उपासना यज्ञामध्ये एक लक्षात ठेवायचे की हा उपासना यज्ञ जो म्हटला जातो,त्याच्यामध्ये एक जग, एक मानवजात,एक देव,एक मानव धर्म,एक ताल,एक सूर,एक लय,एक भाव अशा तऱ्हेच्या एकत्वाच्या धारणेने हा उपासना यज्ञ करायचा असतो.या एकत्वाच्या धारणेमध्ये सर्व मंडळी उपासना यज्ञ करतात म्हणून यज्ञ देवता त्यांच्यावर प्रसन्न होते.यज्ञ देवता प्रसन्न झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागते.
*नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारीती।
नामस्मरणे पाविजती उत्तम पदे ।।
असे श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेले आहे,त्याचप्रमाणे या उपासना यज्ञाने सर्वांचे भले होते व कल्याण होते.समाजाला आज त्याची अत्यंत गरज आहे.आज समाज विघटीत होऊन अनिष्ट दिशेने चाललेला आहे म्हणून समाज आज एका उच्च ध्येयाखाली एकत्र येणे फार आवश्यक आहे. म्हणून या उपासना यज्ञाची जी पद्धती आहे,ती सर्वांना अत्यंत उपकारक आणि उपयुक्त असून या पद्धतीचा स्वीकार जर सर्वांनी केला तर समाजाचे,विश्वाचे भले होणार हे निश्चित,असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.
– सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन