![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-09-15_10-12-54-990-1024x585.jpg)
‘साठवणीतल्या आठवणी’ मधुर मुरांब्यासारख्या: पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी:
“परिपक्वतेचा मानदंड म्हणजे मधू जोशी होय! त्यांच्या ‘साठवणीतल्या आठवणी’ या खास ठेवणीतल्या मुरांब्यासारख्या मधुर आहेत!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी घारेशास्त्री सभागृह, श्रीधरनगर, चिंचवड येथे काढले.
संवेदना प्रकाशननिर्मित आणि सुमारे सहा दशके साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मधू जोशी लिखित ‘साठवणीतल्या आठवणी’ या विषयावरील ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा जोशी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच साहित्य, संगीत, नाट्य, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
भाऊसाहेब भोईर यांनी, “जोशीसर हे चिंचवडमधील सर्व क्षेत्रांचे कुलगुरू आहेत. त्यांना पाहून आम्ही घडत आहोत!” असे मत व्यक्त केले; तर उमा खापरे यांनी, “मधूकाकांनी मला वक्तृत्वाचे धडे दिले!” अशी कृतज्ञता व्यक्त केली. उद्धव भडसाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. नितीन हिरवे यांनी प्रास्ताविकातून, “ही पुस्तकनिर्मिती म्हणजे गुरुशिखरावरून आलेला आदेश आहे!” अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी मधू जोशी यांनी आपल्या हृद्य मनोगतातून आचार्य अत्रे ते अटलबिहारी वाजपेयी अशा अनेक दिग्गजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देताना, “जीवनातील विविध क्षेत्रांत आलेल्या अनुभवांना पुस्तकात शब्दरूप दिले आहे!” असे सांगितले. राजन लाखे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वास्तव, अनुभव अन् कल्पकता या तीन घटकांवर लेखक व्यक्त होत असतो. मधू जोशी यांची साहित्यनिर्मिती अनुभवांच्या अनुभूतींवर आधारित आहे!” असे विचार मांडले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वर्गीय संध्या जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश वाकनीस यांनी ‘साठवणीतल्या आठवणी’ मधील संपादित अंशांचे अभिवाचन केले; तर नंदू जेस्ते यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगितले. संवेदना आणि जोशी परिवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. संजय भंडारी यांनी आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-05-06_00-30-39-307-22-882x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-08-25_22-41-38-730-26-300x279.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-08-01_08-46-55-015-47-249x300.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_23-08-14_14-33-39-813-45-1024x761.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/09/Picsart_22-09-02_21-12-10-302-29-1024x932.jpg)