खरा धर्म मानव धर्म
‘धर्म’ आणि निसर्गनियम
‘धर्म’ या संकल्पनेमध्ये निसर्गनियमांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असून सुद्धा अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांनी निसर्गनियमांचा विचारच केलेला नाही असे दिसून येते.धर्म संकल्पनेमध्ये निसर्ग नियमांना महत्त्वाचे स्थान दिले गेले असते तर मानवजातीचा वेगळाच इतिहास पहावयास मिळाला असता.
अपवाद सोडल्यास प्रत्येक धर्मामध्ये एक विशिष्ट कल्पना ठाण मांडून बसलेली आहे.ती कल्पना म्हणजे “विशिष्ट परिस्थितीत परमेश्वर कृपा करतो किंवा कोप करतो, त्याचप्रमाणे धर्ममार्तंडांनी सांगितलेले विशिष्ट कर्मकांड केल्याने परमेश्वर कृपा करतो व ते कर्मकांड न केल्याने किंवा ते कर्मकांड करण्यात चूक झाल्याने परमेश्वराचा कोप होतो.”
जीवनविद्या सांगते,वरील कल्पना चुकीची तर आहेच पण मानवजातीच्या इतिहासाला अनिष्ट वळण लावण्याचे कार्य या चुकीच्या कल्पनेनेच केलेले आहे.या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे तो हा की,परमेश्वर हा कोणी लहरी सुलतान नाही की त्याला जशी लहर येईल त्याप्रमाणे तो अमक्यावर कृपा करील किंवा तमक्यावर कोप करील.म्हणून जीवनविद्येचा खालील सिद्धांत लक्षात घेणे आवश्यक आहे “परमेश्वर हा दयाळु किंवा निष्ठूर नसून तो कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही,तर स्वतः माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी किंवा दुष्कर्मांनी स्वत:वरच कृपा किंवा कोप करीत असतो.
परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा,मानवाला बुद्धीचे दिव्य वरदान दिलेले असून त्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्यही दिलेले आहे. कर्माचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत:-*
विचार करणे
इच्छा करणे
उच्चार करणे.
आचार करणे.
वरील चारही प्रकारात ‘करणे’ हा महत्त्वाचा भाग आहे.म्हणून जगातील प्रत्येक माणूस वरील चार प्रकारे कर्म करीत असतो.माणसाकडून घडणाऱ्या सर्व कर्मांचा निसर्गनियमांशी संबंध येतो.माणसाने कर्म केले की,ते कर्म निसर्गनियमांना गती देते व त्या गतीतून नियती निर्माण होऊन तीच माणसाच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरते.वस्तुस्थिती अशी आहे की, ज्याप्रमाणे परमेश्वर अनंत स्वरूप आहे.
त्याचप्रमाणे निसर्गनियम सुद्धा अनंत आहेत.फळांचा राजा आंबा,पक्षांचा राजा गरूड व पशूंचा राजा सिंह, त्याचप्रमाणे “क्रिया तशी प्रतिक्रिया” हा निसर्गनियम सर्व निसर्गनियमांचा राजा आहे.नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे ‘क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्गनियमाला दोन बाजू आहेत.
क्रिया तशी प्रतिक्रिया त्याच प्रमाणात (Action and reaction are equal and opposite)
क्रिया तशी प्रतिक्रिया सहस्त्रपटीने.(Action and reaction are multiplied and magnified)*
सर्वसाधारणपणे वरील पहिला नियम स्थूल गोष्टींना तर दुसरा नियम सूक्ष्म गोष्टींना लागू होतो. उदाहरणार्थ,भिंतीवर चेंडू आपटला की तोच चेंडू आपल्याकडे परत येतो.याच्या उलट जमिनीत बी पेरले तर त्याचा मोठा वृक्ष होऊन अनेक फळांचा आपल्याला लाभ होतो. माणसाकडून घडणाऱ्या कर्मांच्या बाबतीत असाच प्रकार घडत असतो.म्हणून जीवनविद्या सांगते की,’माणूस जे करतो तेच देवाजवळ मागतो.’ या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत चिंतनीय आहे.
“तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख-दुःख न चुकता बुमरँग होऊन सहस्त्रपटीने तुमच्याकडे परत येईल,हा निसर्गाचा अटळ नियम आहे. “
म्हणून कर्म काय करायचे हे माणसाने ठरवायचे व त्या कर्माचे फळ त्याला काय मिळायचे हे ठरविण्याचे कार्य निसर्गनियम करीत असतात,परमेश्वर नाही. शासनाचे नियम मोडले किंवा तोडले तर सामान्य लोकांना शिक्षा होते.परंतु जे ‘असामान्य’ लोक असतात ते मात्र कटकारस्थाने करून व शासनाच्या कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा चुकवितात. परंतु निसर्गनियमांच्या बाबतीत मात्र निसर्गाचे कायदे कोणालाही चुकविता येत नाहीत,मग तो राजा असो,रंक असो,मंत्री असो,संत्री असो,गरीब असो की श्रीमंत असो, अमक्या जातीचा असो की तमक्या जातीचा असो किंवा अमक्या धर्माचा असो की तमक्या धर्माचा असो.निसर्ग नियम कोणाच्याही बाबतीत आणि कुठल्याही परिस्थितीत अपवाद करीत नाहीत. माणसाकडून घडणारी वरील चार प्रकारची कर्मे म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराला अर्पण केलेला कर्माचा नैवेद्य होय.सत्कर्मांचा नैवेद्य अर्पण केला तर माणसाला सुख,शांती, समाधान व आनंद प्राप्त होतो, याच्या उलट दुष्कर्मांचा नैवेद्य अर्पण केला तर माणसाच्या वाट्याला दुःख,तडफड,तळमळ व आपत्ती – विपत्ती अशा अनिष्ट गोष्टी येतात. कायदा व सुव्यवस्था पहाण्याचे कार्य शासनाचे पोलीस करतात. त्याचप्रमाणे विश्वात सुव्यवस्था नांदण्यासाठी निसर्गदेवतेने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा निसर्गनियम केलेले आहेत.थोडक्यात,मानवी जीवनात निसर्गाचे नियम व माणसाकडून घडणारी कर्मे यांच्या संबंधातून माणसाची नियती निर्माण होऊन त्याच्या वाट्याला नशीब रूपाने सुख-दुःखाची फळे येतात.दुर्दैवाची गोष्ट अशी की, निसर्गनियमांचे मानवी जीवनात असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान,ना धर्माने लक्षात घेतले,ना धर्म मार्तंडांनी,ना राजकीय पुढाऱ्यांनी, ना समाज सुधारकांनी.यामुळेच इतिहासकालापासून ते आजतागायत मानवजातीच्या दुःखाची व हालअपेष्टांची परवड व फरफट चाललेली आहे,हे सत्य मानव जातीच्या लक्षात येईल तो दिन सुदिन.
सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन