अंधार अंधश्रद्धेचा, प्रकाश जीवनविद्येचा
भूत आणि भूतबाधा
फार पुरातन काळापासून ‘भूत आणि भूतबाधा’ या संबंधी |लोकांत विविध प्रकारच्या कल्पना प्रचलित झालेल्या दिसतात.अशा प्रकारच्या कल्पना मुळात निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या काळी विजेचे दिवे नव्हते,इतकेच नव्हे तर मेणबत्त्या किंवा कंदील यांचाही प्रकाश नव्हता.
आकाशातील ताऱ्यांचा अल्प प्रकाश व चंद्र प्रकाश एवढाच प्रकाश त्यावेळच्या लोकांना उपलब्ध होता.अमावस्येच्या दिवशी तोही प्रकाश नसे.घनदाट काळोख दाट जंगल,जंगलातील प्राण्यांचे निर्माण होणारे भेसूर आवाज,चंद्राचा अपुरा प्रकाश,जमिनीवर पडलेल्या मोठमोठ्या सावल्या,वाऱ्यामुळे होणारी झाडांची हालचाल, सळसळ व त्यामुळे होणारे आवाज, या सर्व गोष्टींच्या मिलनातून माणसाच्या अंतःकरणात भीतीचा प्रचंड भयगंड निर्माण झाला व याच भीतीच्या भावनेला पुढे फाटे फुटून त्यातून ‘भूत’ ही कल्पना निर्माण झाली भूत आणि भूतबाधा या संबंधी समाजामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
यापैकी बऱ्याचशा गोष्टी अतिरंजित,तिखट मसाला लावून रंगवून सांगितलेल्या, ऐकलेल्या व वाचलेल्या असतात. भूत आणि भूतबाधा हे प्रकार म्हणजे दुर्बल (Weak mind) मनाचे परिणाम असतात.’भीती’ या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे ‘भूत’ हा शब्द होय.भीती प्रथम उठते मनात व नंतर ती भूत होऊन बसते मानेवर देव प्रत्यक्षात निर्गुण,निराकार व अव्यक्त असून सुद्धा देव या तत्त्वाचे लोकांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे (Personification) म्हणजे व्यक्तिकरण केले,इतकेच नव्हे तर त्याचे मुर्तिकरण व चित्रिकरण सुद्धा केले.
त्याप्रमाणे ‘भीती’ या भावनेचे सुद्धा ‘भूत’ या सदराखाली व्यक्तिकरण म्हणजेच (Personification) झालेले दिसून येते.व त्यानुसार काही लोकांनी कल्पना करून घेऊन भुताचे पाय उलटे असतात,रंग काळा असतो, चेहरा भेसूर असतो वगैरे भयंकर समजुती समाजात प्रसृत केल्या.भूत दिसण्याचे प्रकार साधारणपणे काळोखात, झाडाझुडपात,स्मशानात किंवा ओसाड वाड्यात झाल्याचे दिसून येते.लख्ख प्रकाशात भूत दिसले असे कधीच घडले नाही.तथाकथित भुता-खेतांचे किंवा त्यांच्या संदर्भात जे प्रयोग दाखविले जातात ते प्रकार सुद्धा काळोखातच दाखविले जातात.याचा सरळ अर्थ असा,भूत हा प्रकार शुद्ध थोतांड असून भीतीच्या प्रबळ भावनेमुळे काळोखात कल्पित झालेल्या ‘भूत’ या कल्पनेतून निर्माण झालेला तो आभास होय.
भूतबाधा हा प्रकारही तसाच आहे.’भूत’ या कल्पनेचे संस्कार जसे जसे माणसावर होऊ लागतात,त्याप्रमाणे माणसाच्या मनात भुताची भीती निर्माण होऊन दिवसेंदिवस त्याचे मन अधिकाधिक दुर्बल (Weak Mind) बनत जाते.भीतीचे जबरदस्त संस्कार प्रथम बहिर्मनावर होऊन ते अंतर्मनात मूळ धरू लागतात. भीतीचा भयगंड अंतर्मनात दृढमूल झाल्यामुळे माणसाचे मन कमालीचे दुर्बल बनते.एकदा का मन दुर्बल बनले की,त्या दुर्बल मनाला काय दिसेल व काय दिसणार नाही हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही.एरव्ही निर्भय असणारा माणूस सुद्धा जर रात्रीच्या वेळी भूत व भूतबाधा,पिशाच्चबाधा या संबंधी गोष्टी ऐकून घरी परत आला की मग त्याला रात्रीच्या वेळी जवळच्या खोलीत सुद्धा जायला भीती वाटते,
इतका भीतीचा जबरदस्त परिणाम त्याच्या मनावर होतो.भुताबद्दलची भीती प्रथम मनात निर्माण होऊन नंतर त्याचे गंभीर व जबरदस्त परिणाम माणसाच्या मेंदूवर होतात व त्यातून अनेक दुष्परिणाम त्याला जीवनात भोगावे लागतात.काही संप्रदाय असे आहेत की,ह्या संप्रदायातील मंडळी कोठेही व केव्हाही एकत्र जमली की,त्यांच्या भूत आणि भूतबाधा,पिशाच्च आणि मांत्रिक, करणी करणे आणि मूठ मारणे, वगैरे संबंधीच्या गोष्टी सहज सुरू होतात.घरी दारी या लोकांचा विषय हा एकच असतो व ते एकमेकांना त्या संबंधी वाचलेल्या,ऐकलेल्या किंवा बोललेल्या गोष्टी रंगवून आणि फुलवून सांगत असतात.
त्यांच्या आजूबाजूला जी लहान किंवा तरुण मुले-मुली असतात, त्यांच्या मनावर या रंगवून सांगितलेल्या गोष्टींचे जबरदस्त भीतीचे संस्कार निर्माण होतात. त्याचे परिणाम असे होतात की,या मुलां-मुलींवर भीतीचा पगडा वाढत जातो,मन दुर्बल होऊ लागते व मेंदूवर अनिष्ट परिणाम घडून त्यातून पुढे त्यांना भूत,पिशाच्च,समंध वगैरे दिसू लागून भूतबाधा,पिशाच्चबाधा वगैरे गोष्टींना ते बळी पडतात.या संदर्भात अमेरिकन फिलॉसॉफर डॉ. मर्फी यांचे खालील वचन अभ्यासनीय आहे:
Any thought or action which is not harmonious whether through ignorance or design results in discord
*and limitation of all kinds. God has nothing to do with unhappy or chaotic conditions in the world.All these conditions are brought about by man’s negative and destructive thinking.It is therefore,silly to blame God for your troubles and sufferings.
भूत किंवा पिशाच्च पहाण्याचा, जी निर्भय वृत्तीची माणसे प्रयत्न करतात,त्यांना भगीरथ प्रयत्न करून सुद्धा भूत दिसत नाही. याच्या उलट भूत या कल्पनेचा भयगंड ज्यांच्या मनात निर्माण होतो,त्यांच्या भीतीग्रस्त दुर्बल मनाला भूत आणि पिशाच्च यांचे आभास केव्हांही आणि कोठेही होत असतात.दोन वर्षापूर्वी कोकणातील एका जंगलातून रात्रीच्या वेळी रिक्षातून जात असताना तो रिक्षावाला मला म्हणाला की,या जंगलात भूत-पिशाच्च आहे,असे लोक म्हणतात;पण या जंगलात तो कित्येक वेळा येऊन सुद्धा त्याला एकदाही भूत दिसले नाही.
सारांश, भूत आणि भूतबाधा वगैरे प्रकार म्हणजे (Weak Mind) चे म्हणजेच दुर्बल मनाचे परिणाम होत.या संदर्भात आणखीन एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो तो हा की, भूत-पिशाच्चाकडून त्रास देण्याचे जे विविध प्रकार लोक सांगतात,ते सर्व प्रकार बहुतांशी हितसंबंधी लबाड लोकांनी निर्माण केलेले आभास असतात.उदाहरणार्थ – रात्रीच्या वेळेला दारावर थाप बसणे, घराच्या कौलांवर दगड पडणे,रात्रीच्या वेळी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत कोणीतरी जाण्याचा भास होणे वगैरे.वास्तविक,आपली इच्छित गोष्ट साध्य करून घेण्यासाठी धूर्त, लबाड लोकांनी हे सर्व प्रकार मुद्दाम घडवून आणलेले असतात.
कांही वर्षांपूर्वी गिरगांव येथील खोताच्या वाडीत एका रिकाम्या घरावर रोज रात्रीच्या वेळी दगडांचा वर्षाव होऊ लागला व तिथे कांही विलक्षण प्रकार घडू लागले.त्यामुळे त्या रिकाम्या घरात भूते वावरत आहेत अशा कल्पनेने त्या परिसरातील लोक भयभीत झाले.परिणामी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही फिरकेनासे झाले.अखेर हे प्रकरण पोलीसांकडे सोपविण्यात आले.भुतांच्या भीतीने त्या घरात कोणीही भाडेकरू येऊ नये व ते घर आपल्याला रहावयास मिळावे या हेतूने काही हितसंबंधी लोकांनी निर्माण केलेला तो प्रकार होता,
ही गोष्ट अधिक चौकशीअंती उघडकीस आली.भूत आणि भूतबाधा या संबंधी गांवागांवातून व खेडे गांवातून जे भीतीग्रस्त वातावरण असते,त्या मानाने शहरातून त्या प्रकारचे वातावरण दिसून येत नाही,याचे कारण उघडच आहे.खेडेगांवात झाडे-झुडपे अधिक व रात्रीच्या वेळी प्रकाशही कमीच.त्यात भरीसभर म्हणजे भूत आणि भूतबाधा या संबंधी खेडेगांवातील लोकांवर परंपरेने व पद्धतशीरपणे होत असलेले अनिष्ट संस्कार होय.या सर्वच गोष्टी भूत आणि भूतबाधा या संबंधी अनिष्ट वातावरण निर्मितीस पोषक ठरतात.याच्या उलट शहरात झाडे-झुडपे जवळ जवळ नाहीच व विजेच्या दिव्यांचा किंवा अन्य प्रकारच्या दिव्यांचा भरपूर प्रकाश असतो.
लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरांत सर्वच ठिकाणी माणसांची गर्दी झालेली असते. घरांची टंचाई सुद्धा वाढत्या प्रमाणावर आहे.साधे पोट भरण्यासाठी सुद्धा शहरातील लोकांना धडपड व संघर्ष करावा लागतो.ह्या सर्व वातावरणात शहरातील लोकांना भूत आणि भूतबाधा या संबंधी बोलायला किंवा विचार करावयाला वेळच नसतो.ह्या सर्व गोष्टींचा सुपरिणाम असा झालेला आहे की,शहरातील लोकांत भूत आणि भूतबाधा या संबंधी भीती जवळ जवळ नष्ट झालेली आहे.उलट शहरातील प्रकाशाचा झगमगाट,लोकांची व वाहनांची बेसुमार गर्दी व त्यामुळे निर्माण झालेला कलकलाट,यामुळे माणसांना भुतांची भीती वाटण्याऐवजी भुतानाच माणसांची भीती वाटून त्यांनी शहरातून पळ काढला.
पूर्वी स्मशानाचे नुसते नांव काढले किंवा स्मशानाच्या आसपास जाण्याचा प्रसंग आला तर लोक घाबरत असत,पण आज अशी परिस्थिती आहे की,घरांच्या वाढत्या टंचाईमुळे घर बांधायला स्मशानात जरी जागा मिळाली तरी तेथे सुद्धा टोलेजंग इमारती बांधण्यास लोक एका पायावर तयार होतील.
“As you think so you become” किंवा “जसे तुमचे विचार त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार” या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे तुम्ही जसे चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल.म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची सूचना करणे इष्ट वाटते.आपण जे ऐकतो, वाचतो,बोलतो आणि पाहतो त्या सर्वांचे आपल्या मनावर परिणाम होत असतात.इतकेच नव्हे तर त्याप्रमाणे आपल्या मनात विचार, कल्पना,भावना,वासना निर्माण होत असतात.
म्हणूनच “जसे आपले विचार त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार प्राप्त होतो’.
हा वर उल्लेखिलेला जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेऊन, भूत,पिशाच्च,समंध,ब्रह्मराक्षस या संबंधी किंवा करणी करणे,मूठ मारणे,भूतबाधा,पिशाच्चबाधा या संबंधी माणसांनी कांहीही वाचण्याचे,बोलण्याचे,पहाण्याचे व ऐकण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे. पुष्कळ लोकांना वरील विकृत विषयांसंबंधी बोलण्याची व ऐकण्याची फार आवड असते.
इतर कांही लोकांना घोळून घोळून वरील विकृत विषयासंबंधी चर्वितचर्वण करण्याची फार गोडी असते. दुसऱ्या कांही लोकांना वरील विकृत विषयांसंबंधीचे सिनेमे, नाटके पहाण्याची आवड असते, तर कांही लोकांना असल्या विकृत विषयांसंबंधी पुस्तके वाचण्याचा फार नाद असतो.या सर्व गोष्टी करणे म्हणजे प्रत्यक्षात वरील सर्व भयानक अनिष्ट गोष्टींना खास आग्रहाचे आमंत्रण देणे होय.
“जसे स्मरण तसे जीवन” व “आपण ज्याचे स्मरण करतो, त्याच्याशी आपण संबंध जोडतो” हे जीवनविद्येचे महत्त्वाचे सिद्धांत आहेत.या सिद्धांताप्रमाणे आपण जे ऐकतो,बोलतो,वाचतो व पहातो त्याप्रमाणे आपले स्मरण होत असते.या स्मरणाप्रमाणे विचार, विकार,कल्पना,भावना आकाराला येऊन त्यांच्या द्वारा अस्तित्वात नसलेल्या,पण कल्पनेने निर्माण केलेल्या भूत, पिशाच्च,समंध, ब्रह्मराक्षस अशा भयानक गोष्टींशी आपण संबंध जोडू लागतो.एकदा का असे संबंध जोडले गेले की मग त्यातून भूतबाधा,पिशाच्चबाधा, निरनिराळ्या प्रकारचे आभास वगैरे अनिष्ट गोष्टी जीवनात निर्माण होऊन माणसाचा सर्वनाश होतो.
तात्पर्य,भुतांचे चिंतन केले तर भूत व्हाल,रोगाचे चिंतन केले तर रोगी व्हाल व देवाचे चिंतन केले तर देव व्हाल,हे निश्चित.जीवनविद्येचा हा सिद्धांत नीट लक्षात घेऊन,देवाचे म्हणजे दिव्य स्वरूपाचे चिंतन करून व सुरेख,सुंदर विचारांनी मन सतत फुलवत ठेऊन ते मजबूत म्हणजे (Strong) करण्यातच माणसाचे खरे कल्याण असते. या संदर्भात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वचन लक्षणीय आहे-
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।*
*मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छा ते ।।*
*मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली ।।*
*मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची ।।*
*या संदर्भात जीवनविद्येचे खालील सिद्धांत चिंतनीय आहेत.*
*१) जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे अतुल सामर्थ्य चिंतनात आहे.*
२) Mind well, the builder of destiny is mind.*
सद्गुरू श्री वामनराव पै.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन