मानवजातीच्या कल्याणासाठी धर्म ही संकल्पना मुळात निर्माण झाली. अखिल मानव जातीला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्यासाठी धर्माचे प्रयोजन असते. प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट परिस्थिती असलेली दिसून येते. धर्माच्या नांवाखाली अधर्म माजलेला असून धर्मांध झालेले धर्मवेडे जगात सर्वत्र तंटे-बखेडे दंगे-धोपे, युद्ध-लढाया करून मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडवून आणीत असतात.

“धर्म कशाशी खातात” हे जेथे धर्ममार्तंडांना कळत नाही तेथे त्यांच्या अज्ञानी अनुयायांना कसे कळणार? लोकांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन धर्मांध धर्ममार्तंड व स्वार्थांध राजकीय पुढारी स्वतःच्या पोळीवर मात्र तूप ओढून घेतात, ही मोठी खेदाची गोष्ट होय.

  *The essence of Religion is Wisdom.*

 *परमेश्वराचे निसर्गनियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे-वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म.*

  *अखिल मानवजातीसाठी धर्म एकच असतो, ज्याप्रमाणे समुद्र अखिल मानव जातीसाठी एकच आहे त्याप्रमाणे, हा धर्म म्हणजे जीवन धर्म.*

 *”माणसांतील माणुसकी जागृत करणे हाच खरा धर्म, तेच आहे खरे*
*शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.*

 *समाजाचे माणसावर असलेले ऋण लक्षात घेऊन माणसांनी माणसांबरोबर*
*माणसासारखे वागणे हाच माणसांचा ‘स्वधर्म’ आहे.*

 *जो धर्म इतर धर्मियांवर अन्याय व अत्याचार करण्यास शिकवितो किंवा प्रोत्साहन देतो, तो धर्म हा खरा धर्म नसून साक्षात् अधर्म होय.*

 *Body without life is useless, religion without wisdom is worthless and life without wisdom is hopeless.*

 *”तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू द्या” या धारणेला खरा धर्म असे*
*म्हणतात.*

 *”धर्माच्या नांवाखाली माणसांनी रक्तपात घडवून आणणे’ ही मानवजातीला*
*कलंक फासणारी गोष्ट आहे.*

 *कुठल्याही कारणास्तव धर्मवेड्या धर्मांध लोकांचे अनिष्ट उपद्व्याप खपवून घेणे राष्ट्राला धोकादायक आहे.*

 *राष्ट्रधर्म हाच देशाचा एकमेव धर्म असून बाकीचे सर्व प्रचलित धर्म हे धर्म नसून संप्रदाय होत.*

 *जगातील सर्व धर्माचे सर्व लोक देव-धर्माच्या नांवाखाली खूप काही करीत असतात, पण प्रत्यक्षात मात्र ते जे काही करतात, त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्मही नसतो.*

 *परमेश्वर, धर्म व परमार्थ या संबंधी लोकांच्या कल्पना अगदी उथळ व निर्बुद्ध असतात.*

 *”दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होणे व इतरांच्या सुखाने सुखी होणे” हा खरा*
*धर्म असून विश्वशांतीचा खरा मार्ग तोच आहे.*

  *सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय हेच मुळात नीट समजत नाही व त्यामुळेच निधर्मी राज्याला अधर्मी राज्याचे स्वरूप प्राप्त झाले नाही तरच नवल.*

  *समाजकंटकांचे संपूर्ण निर्दळण, हाच धर्म, तीच दया व अहिंसा तीच.*

 *वैदिक धर्मात संध्येला जे महत्त्व तेच भागवत धर्मात हरिपाठाला आहे.*

 *माणसाने निर्माण केलेल्या परमेश्वराच्या पाषाणाच्या मूर्तिपूजेत गुंतून न राहता, ‘विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात् परमेश्वरानेच निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ति आहे’, या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरी मूर्तिपूजा व खरा धर्म असून त्यात मानव जातीचे कल्याण तर आहेच, शिवाय मानव जातीच्या सर्व समस्या सहज सोडविण्याचे सामर्थ्य सुद्धा त्यातच आहे.*

 *अखिल मानव जातीसाठी धर्म एकच आहे व तो म्हणजे जीवन धर्म असून प्रचलित असलेले सर्व धर्म हे प्रत्यक्षात धर्म नसून संप्रदाय होत.*

 *”आपला धर्मच श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ठ’ असे ज्यांना वाटते, ते एका बाजूने अधर्म करण्याचे महापाप करतात व दुसऱ्या बाजूने ते त्यांचे धर्माबद्दलचे अफाट अज्ञान प्रदर्शित करीत असतात.*

 *”माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे” हेच आहे देवाचे भजन-पूजन,तीच आहे देवाची भक्ती उपासना आणि तोच आहे खरा धर्म.*

*’माणसातील माणुसकी जागृत करणे’ हाच आहे खरा धर्म,तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील प्रभावी उपाय.*

 *प्रचलित सर्व धर्माचे एक गाठोडे तयार करून ते समुद्रात बुडविले तरी मानवजातीचे काडीचेही नुकसान होणार नाही, उलट ती आज आहे त्यापेक्षा सहस्त्रपटीने अधिक सुख,शांती, समाधान प्राप्त करून घेईल.*

 *”धर्मासाठी मानव नसून मानवासाठी धर्म आहे’ हे सत्यच माणसांना कळेनासे झाले,ही मोठी खेदाची गोष्ट होय.*

 *खरा धर्म एकच असतो,पण भावनांचा आविष्कार करण्याच्या पद्धती व रितीरिवाज वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या अपेक्षेत एकाच धर्माला निरनिराळी नांवे पडली गेली व जगात विविध धर्म बोकाळले गेले.*

 *धर्माचा प्रसार करणे याचा खरा अर्थ माणसांची नीती व उन्नती घडवून आणून त्यांच्यातील माणुसकी जागृत करणाऱ्या धर्माच्या उच्च तत्त्वांचा प्रचार करणे हा होय, त्यासाठी ‘धर्मांतर’ हा प्रकार अर्थशून्य आहे.*

 *माणुसकी साकार करण्यासाठीच धर्माचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे त्या व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकार की,ज्यामुळे माणसांतील पशुत्त्व साकार होऊन मानवी जीवन असह्य व दुःखाचे होते ते केवळ अधर्म होत.*

 *तोच धर्म खरा जो निसर्गाच्या त्रिकालाबाधित सिद्धांताशी सुसंगत आहे व जे धर्म निसर्गाच्या त्रिकालाबाधित सिद्धांताशी विसंगत आहेत,ते धर्म या नांवाला पात्रच असू शकत नाहीत.*

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!