देशाला विचारकेंद्रित लोकशाहीची गरज: प्रा. मिलिंद जोशी
पिंपरी:
“आपल्या देशाने निधर्मी लोकशाही स्वीकारली आहे; परंतु या गोष्टीचे समाजकारणी आणि राजकारणी यांना विस्मरण झाले आहे. त्यामुळे देशाला विचारकेंद्रित लोकशाहीची गरज आहे!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे व्यक्त केले.
बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांना जीवनगौरव पुरस्कार आणि ॲड. प्रमोद आडकर यांना धम्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले; तसेच ॲड. जयदेव गायकवाड, उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. संभाजी मलघे, डॉ. सुलक्षणा शिलवंत आणि चंद्रकांत कांबळे यांना धम्मपद पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सचिन ईटकर यांनी, “वैचारिक बैठक असलेल्या व्यक्तींना राजकारणात संधी मिळायला हवी!” अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, “धर्माधर्मातील विसंवादाच्या भिंती दूर सारून त्यापलीकडे शुद्ध मानव धर्माचा संवाद होऊ शकतो अन् तो आवश्यक आहे!” ॲड. जयदेव गायकवाड यांनी, “गौतम बुद्ध यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे प्रज्ञावंत होते!” असे मत व्यक्त केले.
“रमाई महोत्सवाच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय आहे!” अशी भावना ॲड. प्रमोद आडकर यांनी व्यक्त केली; तर “सामाजिक मूल्यांवर आधारित भविष्यातील वाटचाल अपरिहार्य आहे!” असे मत उद्धव कानडे यांनी मांडले. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.