खर्ची पडलेली पुण्याई पुन्हा कशी भरुन काढता येईल
माणूस जीवनात जेव्हा सुखसोई उपभोगीत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी माणूस पैसे कमवितो व खर्च करतो. खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी तो पुन्हा पैसे कमवितो. अगदी त्याचप्रमाणे माणूस शुभ कर्मांच्या द्वारे जे पुण्य दिव्य बँकेत जमा करतो,त्या पुण्याईच्या बळावर तो एका बाजूने सुखी जीवन जगतो व दुसऱ्या बाजूने ते पुण्य खर्ची टाकून त्याचे अंतर्मन संकट प्रसंगी किंवा बिकट परिस्थितीत विलक्षण प्रकाराने त्याला सहाय्य करीत असते.
संपादित केलेले पुण्य अशा रीतीने खर्ची पडत राहिल्याने व ते पुन्हां भरून काढण्याचे कांहीही प्रयत्न न केल्यामुळे काही काळानंतर सर्व पुण्य खर्ची पडून माणूस पुण्याच्या नांवाने दिवाळे काढण्याची दाट शक्यता असते.जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूने माणूस सुखी जीवनाला आचवतो व दुसऱ्या बाजूने संकट प्रसंगी त्याला सहाय्य करण्यास अंतर्मन असमर्थ ठरते.म्हणून खर्ची पडलेले पुण्य पुन्हा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसाने सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र या सत्याची बहुसंख्य लोकांना जाणीव तर नसतेच पण उलट त्यांच्या वाट्याला आलेल्या सुखी व यशस्वी जीवनामुळे त्यांच्या ठिकाणी जबरदस्त मद व अहंकार निर्माण होऊन ते त्या मस्तीत इतरांना त्रास देतात,त्यांना तुच्छ लेखतात, त्यांचा छळ करतात व प्रसंगी त्यांचा अपमान व तिरस्कारही करतात. अहंकार फार मोठ्या प्रमाणात पुण्य खातो याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते.थोडक्यात अशी माणसे उन्मत्त,उर्मट व उद्धट बनतात.त्यामुळे एका बाजूने त्यांच्या पुण्याईचा पूर्ण क्षय होऊ लागतो व दुसऱ्या बाजूने त्यांच्या खाती पापांचा संचय होऊ लागतो.
परिणामी ही माणसे पुण्याईच्या नांवाने अक्षरशः दिवाळे काढून बसतात.अशा परिस्थितीत या माणसांना जीवनांत विलक्षण उलटे अनुभव येऊ लागतात. पूर्व पुण्याईची ठेव जोपर्यंत त्या दिव्य बँकेत होती तोपर्यंत ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’ असा त्यांचा अनुभव असायचा किंवा ‘त्यांनी मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने व्हावे’ असा प्रत्यय यायचा.परंतु पूर्व पुण्याईचा क्षय झाल्यावर या उन्मत्त, उर्मट व उद्धट वर्तनाच्या लोकांना ” लाथ मारीन तेथे डोळ्यातून पाणी काढावे” असा उलट अनुभव येऊ लागतो.
किंवा त्यांनी सोन्याला जरी हात लावला तरी त्या सोन्याची माती व्हावी असा उलटा प्रत्यय येऊ लागतो. म्हणून अशा माणसांनी घटत चाललेली पुण्याई पुनः भरुन काढणे आवश्यक आहे. खर्ची पडलेली पुण्याई पुन्हा भरून काढण्यासाठी खालील तीन सुलभ मार्ग उपलब्ध आहेत त्याचा आता थोडक्यात विचार करू.
पहिला मार्ग म्हणजे ‘तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू द्या’ हा होय. शुभ कर्मे करुन इतरांचे भले करण्यासाठी माणसाजवळ खूप द्रव्य पाहिजे किंवा भरीव ज्ञान पाहिजे किंवा हाती सत्ता पाहिजे किंवा इतरांना शारीरिक मदत करण्यासाठी ठणठणीत शरीर प्रकृती व वेळ हवा.सामान्य माणसाजवळ खूप द्रव्य, भरीव ज्ञान,सत्ता किंवा ठणठणीत शरीर प्रकृतीसुद्धां नसते.
म्हणून सामान्य माणसांना सत्कर्मे करणे कठीण आहे.म्हणून अशा माणसांना पुण्य संचय करण्याचा सुलभ मार्ग जीवनविद्या सांगते.
*तुम्ही इतरांचे हित केले नाही तरी चालेल परंतु त्यांचा घात तरी करु नका.*
*तुम्ही इतरांचे भले केले नाही तरी चालेल परंतु त्यांचे वाटोळे तरी करु नका.*
*तुम्ही इतरांना मदत केली नाही तरी चालेल परंतु त्यांच्या मार्गात अडचणी तरी आणू नका.*
*तुम्ही इतरांना सुख दिले नाही तरी चालेल परंतु त्यांना दुःख तरी देऊ नका.*
*तुम्ही इतरांची स्तुती केली नाही तरी चालेल परंतु त्यांची निंदा तरी करु नका.*
*तुम्ही इतरांच्या मुखात अन्नाचा घास घातला नाही तरी चालेल परंतु त्यांच्या तोंडातील घास तरी काढून घेऊ नका.*
*तुम्ही अन्य धर्मांच्या लोकांवर प्रेम केले नाही तरी चालेल परंतु त्यांचा द्वेष तरी करु नका.*
*माणसांनी एवढेच जरी केले तरी त्यांनी देवाची फार मोठी सेवा केल्याचे श्रेय त्यांना मिळेल.हा मार्ग अत्यंत सरळ,सहज,सुरेख,सोपा असून,जगातील कोणताही माणूस हा मार्ग धरुन सहज स्वतःचे व जगाचे कल्याण करु शकेल.अगणित पुण्य संपादन करण्याचा दुसरा सुलभ मार्ग म्हणजे ‘सर्वांचे भले व्हावे,सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांना आरोग्य,ऐश्वर्य,शांती, सुख,आनंदाचा लाभ व्हावा’ असे मनापासून इच्छिणे व त्याप्रमाणे ईश्वराची नित्य प्रार्थना करणे हा होय.
*
जितक्या पोट तिडकीने तळहातावर तळहात घासून “तुझे तळपट होवो” असा शाप जसा माणूस देतो, तितक्याच तीव्रतेने “दुसऱ्यांचे भले होवो दुसऱ्यांचे कल्याण होवो,ते सुखात,आनंदात राहोत.” अशी त्याने ईश्वराची प्रार्थना केली तर भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता त्या माणसावर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपेची बरसात करतील. अशी प्रार्थना करण्यासाठी ना कष्ट ना खर्च.असे असून सुद्धां हा मार्ग अत्यंत प्रभावी आहे.
मनापासून वरील प्रार्थना केल्याने अंतर्मनातील इष्ट शक्ती (forces of the sub-conscious mind) जागृत होऊन प्रार्थना करणाऱ्यांचे सर्वांगाने कल्याण साधण्यासाठी त्या शक्ती कार्यप्रवृत्त होतात. हा मार्ग अगदी साधा आहे पण दिव्य बँकेत पुण्य जमा होण्यासाठी रामबाण आहे हे मात्र निश्चित.अगणित पुण्य संपादन करण्याचा तिसरा राजमार्ग म्हणजे फावल्या वेळी म्हणजे मन रिकामे असते तेव्हा (when you are mentally free) ईश्वरचिंतन म्हणजेच दिव्य स्वरुपाचे चिंतन करणे हा होय. पुण्य संपादन करण्याचा हा सोपा मार्ग असून तो बिनखर्चाचा व बिनकष्टाचा आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै.