स्मरणयोगात सर्व योगांचा कसा संगम झालेला आहे हे आपण थोडक्यात पहाण्याचा प्रयत्न करू. प्रथम आपण ज्ञानयोगाबद्दल विचार करू.परोक्ष ज्ञानाच्या आधाराने प्रगती साधता साधता, आत्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान संपादन करणे याला ज्ञानयोग असे म्हणतात.या ज्ञानयोगात ‘परोक्ष ज्ञान’ म्हणजे ग्रंथांतून किंवा कोणाकडून तरी मिळणारे नुसते शाब्दिक ज्ञान नव्हे.

हे परोक्ष ज्ञान केवळ सद्गुरूंकडूनच प्राप्त करून घ्यावयाचे असते.या परोक्ष ज्ञानाची पातळी इतकी उंच असते की परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान या दोहोंमधले अंतर फारच अल्प रहाते.नंतर सद्गुरू जी साधना शिकवितात, ल्या साधनेने हे वरील अल्प अंतर पार करता येते.स्मरण योगात हा ज्ञानयोग असाच सामावलेला आहे. स्मरण योगात सद्गुरूंचे स्थान महत्त्वाचे असते म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात-

संतासी शरण गेलीया वाचुनी। एकाजनार्दनी न कळे नाम।।

स्मरण योगात सद्गुरू सत् साधकाला प्रथम आत्मस्वरूपाची प्रत्यक्ष ओळख करून देतात.या ओळखीतून साधकाचे ‘ईश्वर स्मरण’ सुरू होते.आवडीने व प्रेमाने असे स्मरण करता करता साधक स्वस्वरूपाकार होऊन याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो.आता आपण राजयोगाबद्दल विचार करू.’मन स्थिर करणे’ हा राजयोगाचा प्राण होय. वरीलप्रमाणे ईश्वर स्मरण करीत असता साधकाचे मन स्थिर होऊन ते स्वस्वरूपाचे ठिकाणी रममाण होते.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

ज्ञानदेवा रम्य रमले समाधान। हरीचे चिंतन सर्वकाळ ।।

अशा रीतीने स्मरण योगात राजयोग सिद्ध होतो.’प्राण नियमित करून’ केवळ ‘कुंभक साधणे’ हा हटयोगाचा आत्मा होय ईश्वर स्मरण करीत असता स्वस्वरूपाचे ठिकाणी मन रंगून गेल्यामुळे साधकाचे मन स्थिर होत होत त्याचे प्राणही स्थिर होऊन साधकाला ‘सहज कुंभक’ सहज साध्य होतो.म्हणूनच या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात.

यम नियम प्राणायाम साधे जपता रामनाम ।।

अशा रीतीने स्मरण योगात हटयोग साध्य होतो.आता आपण कर्मयोगाबद्दल विचार करू.खरा कर्मयोग नेमका कशात आहे याचे ज्ञान भल्या भल्या विद्वान लोकांना सुद्धा नसते, मग इतरांबद्दल बोलणेच नको. कर्म करीत रहाणे म्हणजे कर्मयोग,असा बऱ्याच अडाणी लोकांचा समज आहे,तर कर्माच्या फळावर लक्ष न ठेवता किवा आसक्ती न धरता कर्म करणे म्हणजे कर्मयोग असा तथाकथित विद्वानांचा समज आहे.

परंतु हे दोन्ही समज चुकीचे आहेत. नुसते काम करीत रहाणे म्हणजे कर्मयोग हे जर खरे असते,तर गाढव,बैल,उंट,रेडे हे सर्वात श्रेष्ठ कर्मयोगी ठरले असते.त्याचप्रमाणे कर्मफळावर लक्ष ठेवल्याशिवाय किंवा कर्मफळाबद्दल हवेपणा न बाळगता कर्म करता येणे प्रायः शक्य नाही.मुक्कामाचे लक्ष्य लक्षात न घेता प्रवास करणे शक्य नसते त्याप्रमाणे फळावर लक्ष न ठेवता कर्म करणे सामान्यपणे शक्य होत नाही.मग खरा कर्मयोग नेमका कशात आहे? या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांचे खालील वचन लक्षात घेणे आवश्यक आहे.

कर्तृत्वाचा मद । आणि कर्मफळाचा आस्वाद । हे दोन बंध। कर्माचे की ।।

याचा भावार्थ असा की, ‘मी कर्ता हा अहंकार आणि त्या कर्मातून जे फळ निर्माण होईल ते मलाच मिळाले पाहिजे हा आग्रह’, हे कर्माचे दोन बंध असून त्याप्रमाणे केलेले कर्म,हा कर्मयोग नसून कर्मभोग असतो. याच्या उलट ‘कर्ता ईश्वर व कर्मातून निर्माण होणारे फळ हे ईश्वराचेच’ या दिव्य भावाच्या धारणेतून केलेले कर्म, कर्मयोग सिद्ध करते.थोडक्यात, स्वस्वरूपाच्या विसरात माणूस जे कर्म करील त्यातून निर्माण होईल तो केवळ कर्मभोग,त्याच्या उलट स्वस्वरूपाच्या आठवात केलेले कर्म,कर्मयोगच सिद्ध करील. या संदर्भात श्रीसमर्थ रामदास स्वामींचे खालील वचन चिंतनीय आहे.

मी कर्ता ऐसे म्हणसी । तेणे तू कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणता पावसी। यश कीर्ती प्रताप । ।

स्मरणयोगात नेमके हेच तत्त्व सामावलेले आहे.सद्गुरूंकडून सत्साधकाला दिव्य बोध व दिव्य साधना मिळाल्यावर त्याला नित्य अभ्यासाने व चिंतनाने,दिव्य स्वरूपाची जाणीव प्रकर्षाने होऊ लागते.या दिव्य स्वरूपाच्या स्मरणात साधकाला ‘मी म्हणून कोणी नाहीच केवळ ईश्वरच आहे’ अशा प्रकारची दिव्य स्मृती प्राप्त होते,म्हणजेच त्याला त्याच्या स्वस्वरूपाची जागृती येते. या भावात,म्हणजे ईश्वर स्मरणात केलेले कर्म,कर्मयोग सिद्ध करते कारण ‘कर्ता ईश्वर आणि भोक्ता ही ईश्वर’ अशी साधकाची अनुभूती असते.

अशा रीतीने स्मरण योगात कर्मयोग सामावलेला आहे.आता बुद्धीयोगासंबंधी विचार करू.बुद्धीयोगातील प्रक्रिया अशी आहे; कर्मेद्रिये ज्ञानेंद्रियात विसावतात,ज्ञानेंद्रिये मनात विरतात व मन बुद्धीत लीन होते. अशा अवस्थेत आलेली बुद्धी देवाला सन्मुख होते.त्या अवस्थेत म्हणजे देवाला सन्मुख अवस्थेत बुद्धी स्थिर झाली की तिचे रूपांतर ऋतुंभरा प्रज्ञेत होऊन ती देवाच्या कक्षेत येते.लोहचुंबकाच्या कक्षेत लोखंड आले की ते लोखंड लोहचुंबकाला जाऊन चिकटते, त्याप्रमाणे बुद्धी देवाच्या कक्षेत आली की ती देवाला जाऊन चिकटते.यालाच बुद्धीयोग असे म्हणतात.

बुद्धीयोगातील वरील सर्व प्रक्रिया सद्गुरूंकडून शिकून घेतलेल्या ईश्वर स्मरणात सहज साधली जाते.बुद्धीयोगात जे कष्टाने साध्य होते तेच स्मरण योगात सहज लीलेने प्राप्त होते, हे स्मरण योगाचे वैशिष्ट्य होय. अशा रीतीने स्मरण योगात ‘बुद्धीयोग’ सामावलेला आहे.आता आपण भक्तीयोग म्हणजे काय ते पाहू. भक्ती किंवा भक्त कशाला म्हणतात याचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामींनी खालील अचूक शब्दात केलेले आहे.

जो विभक्त नव्हे तो भक्त ।

याचा अर्थ असा की,जो स्वतः ला ईश्वरापासून आपण वेगळे आहोत असे समजतो तो अभक्त याच्या उलट जो ईश्वराशी तद्रुप होऊन राहतो तो भक्त ईश्वर स्मरणात आत्मस्वरूपाची ओळख झाल्यावर ईश्वर चिंतन करता करता साधकाचा ‘मी’ गळून पडतो आणि त्याचे केवळ ईश्वर स्वरूप शिल्लक रहाते.या अवस्थेला ‘भक्ती’ असे म्हणतात. या संदर्भात तुकाराम महाराजांचे खालील वचन चिंतनीय आहे.

पिकलिया शेंदे कडूपण गेले । तैसे आम्हा केले पांडुरंगे ।। आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग ।।

अशा रीतीने स्मरण योगात भक्तीयोग समाविष्ट आहे

थोडक्यात,सद्गुरू प्रणीत स्मरण योगात सर्व योगांचा समावेश झालेला आहे,हे सत्य नित्य लक्षात ठेवून साधकांनी अशा सर्वांगसुंदर योगाची कास धरणे इष्ट होय.

सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!