अनिर्बंध नागरीकरण ही वकिलांसाठी संधी:  ॲड. डॉ. उदय वारुंजीकर
पिंपरी:
“पिंपरी – चिंचवड शहरातील अनिर्बंध नागरीकरण ही वकिलांसाठी संधी आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ बार कौन्सिल ॲाफ महाराष्ट ॲण्ड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी पिंपरी, नेहरूनगर न्यायालय सभागृह येथे केले.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेत ‘वकिली व्यवसायातील संधी’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफताना ॲड. डॉ. उदय वारुंजीकर बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मदनलाल छाजेड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेंद्र शर्मा, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे यांची व्यासपीठावर तसेच माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुदाम साने यांच्यासह असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सहकारी वकील बंधू आणि भगिनी यांची सभागृहात उपस्थिती होती.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत ॲड. डॉ. उदय वारुंजीकर पुढे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवड शहराची अतिशय झपाट्याने वाढ झाली आहे. सातत्याने होणारी खाजगी बांधकामे, पीएमआरडीए आणि पूर्वीच्या म्हाडाच्या कक्षातील नागरीकरण, शहराच्या दोन्ही दिशेला असलेले कॅन्टोन्मेंट बोर्ड, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग, शिक्षणसंस्थांचे जाळे, अनेक रुग्णालये अशा सोयी सुविधांमुळे नागरीकरण बेसुमारपणे वाढले आहे.

साहजिकच सुमारे ७५०० अनाधिकृत बांधकामे, गुंठेवारी कायदा, विविध कायदेशीर प्रकरणांमधील नुकसान भरपाई अशा असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वकिलांनी फक्त न्यायालयात येणाऱ्या खटल्यांचाच विचार करून व्यवसाय करण्यात अर्थ नाही. याउलट पारंपरिक व्यवसायाची मानसिकता सोडून ज्या समस्या न्यायालयापर्यंत येत नाहीत त्यांचा शोध घेऊन तिथे पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जातपडताळणीची सुमारे एक लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. असंख्य नागरिकांना अशा विविध प्रकरणांमध्ये कायदेशीर साहाय्याची गरज भासते, अशावेळी काही खाजगी संस्था ‘आम्ही कायदेशीर प्रकरणे सोडवू!’ अशी जाहिरात करीत असतात.

वास्तविक या संस्था पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे दोन हजार वकिलांचा हक्क हिरावून घेत आहेत. त्यामुळे विधी व्यावसायिकांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून आपल्या आसपास असलेल्या असंख्य संधींचे व्यवसायात रूपांतर केले पाहिजे!” असे आवाहन त्यांनी वेगवेगळी उदाहरणे उद्धृत करून केले. ॲड. सुरेंद्र शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वेश्वर काळजे आणि ॲड. सौरभ जगताप यांनी आभार मानले.

error: Content is protected !!