दहशतवादी शक्तीच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ द्यावे!: ॲड. सतीश गोरडे
पिंपरी:
“दहशतवादी शक्तीच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ द्यावे!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे यांनी ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल  येथे  केले. ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ॲड. सतीश गोरडे बोलत होते.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, उद्योजक दर्शन बंब,  ग्लोबलचे संस्थापक –  अध्यक्ष डॉ. ललितकुमार धोका, संचालिका डॉ. स्वप्नाली धोका, मुख्याध्यापिका विद्युत सहोर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वर्षा डांगे यांनी, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशातील विविध क्रांतिवीरांच्या योगदानाला उजाळा दिला आहे!” असे मत व्यक्त केले. डॉ. स्वप्नाली धोका यांनी स्वागत केले.

ॲड. सतीश गोरडे यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिवीर चापेकर बंधूंचा इतिहास विद्यार्थ्यांना कथन केला. “आपल्याला सर्वांना सीमेवर जाऊन शत्रूशी लढण्याची संधी मिळणे शक्य नाही; परंतु दहशतवादी कारवाया करणाऱ्या व्यक्तींविषयी दक्ष राहून त्या विरोधात पोलीस आणि इतर यंत्रणांना आपण शक्य असेल ती मदत केली पाहिजे!” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत देशभक्तिपर कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. १८५७ चे समर, १९४७ चा स्वातंत्र्यसंग्राम आणि कारगिल युद्ध यामध्ये सहभागी झालेले विविध योद्धे त्यांच्या जीवनातील जाज्वल्य प्रसंग अन् विचार यांच्यासह सादर करून विद्यार्थ्यांनी उस्फूर्त दाद मिळवली. “चिठ्ठी आयी हैं…” या गीतावर सीमेवरील जवानांच्या जीवनातील विविध भावभावनांचे साभिनय सादरीकरण सर्वांना सद्गदित करून गेले. या गीताला सर्व उपस्थितांनी समूह गायनसाथ दिली.

शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. लिन्सी बिनॉय आणि पूनम शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. गोपाली डे यांनी आभार मानले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!