बदलत्या परिस्थितीत सेवाकार्याची व्याप्ती वाढली
पिंपरी:
“आजच्या बदलत्या परिस्थितीत सेवाकार्याची व्याप्ती वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वात जुना अशी ख्याती असलेल्या लायन्स क्लब ऑफ पूना निगडी या सेवाभावी संस्थेची कार्यक्षमता गौरवास्पद आहे!” असे गौरवोद्गार एम. जे. एफ. लायन बी. एल. जोशी यांनी बॅकयार्ड पाम, रावेत येथे काढले.

लायन्स क्लब ऑफ पूना निगडी, डिस्ट्रिक्ट ३२३४ – डी २ या सेवाभावी संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात बी. एल. जोशी यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला सेवाकार्याची शपथ दिली. सन २०२३-२४ या कालावधीसाठी खालील कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.

मीनांजली मोहिते (अध्यक्ष), जयश्री मांडे (सचिव), सीमा बांदेकर (खजिनदार), सलीम शिकलगार (जनसंपर्क अधिकारी) याशिवाय मनीषा गायकवाड, संतोष बांदेकर, रश्मी नायर, दिलीप गायकवाड, दिलीपसिंह मोहिते, हर्ष नायर, रामकृष्ण मंत्री, प्रशांत कुलकर्णी, चंद्रशेखर पवार, अशोक येवले, संजय निंबाळकर, जयंत मांडे, सुदाम मोरे, प्रवीण शेलार, मारुती मुसमाडे, मंजिरी कुलकर्णी, सुवर्णा मोरे, दुर्गाशंकर बेहेरा, भाग्यश्री पवार, वृषाली सुरवाडे, आर. एस. कुमार, जनार्दन गावडे, माणिक पंजाबी, राजीव कुटे यांचा नूतन कार्यकारिणीत समावेश आहे.

मावळते अध्यक्ष देवीदास ढमे यांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत केले; तसेच आपल्या अहवाल वाचनातून लायन्स क्लब ऑफ पूना निगडीने गतवर्षी १०१ उपक्रमांतर्गत समाजातील १००२१ गरजू व्यक्तींना आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक साहाय्य केल्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली.

फुलांची पखरण करीत नूतन कार्यकारिणीचे हृद्य स्वागत करण्यात आले. नूतन अध्यक्ष मीनांजली मोहिते यांनी ‘सावित्रीच्या लेकी’ या गरीब-गरजू विद्यार्थिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेला आर्थिक निधी सुपूर्द करून आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. आपल्या मनोगतातून त्यांनी, “०७ जून १९८६ या स्थापना दिनापासून गतिमान कार्य करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ पूना निगडी ही स्वतःचे कार्यालय असलेली पिंपरी – चिंचवड शहरातील सर्वात जुनी आणि सर्वात कार्यक्षम संस्था आहे.

या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली या गोष्टीचा आनंद आहे. मात्र, या संस्थेच्या नावलौकिकास साजेसे कार्य संपूर्ण कार्यकारिणीच्या सहकार्याने करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा माझा प्रयत्न राहील!” अशा भावना व्यक्त केल्या. शिल्पी कुमार यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!