राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाला प्रथम पुरस्कार जाहीर
पिंपरी :
लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी तर्फे साहित्यातील विविध विभागात दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी लेखक, कवी राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संकलित केलेल्या ग्रंथाची राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी पत्राद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांचे पाच काव्यसंग्रह आणि एक ललितसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र तसेच बृहन्महाराष्ट्रातील १०० मान्यवरांच्या शांताबाईंशी संबंधित १०० आठवणी आणि १०० कविता यांचा समावेश असलेला ‘बकुळगंध’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. अकॅडमीच्या वतीने प्रथम पुरस्कारासाठी सदरहू ग्रंथ निवडण्यात आला असून रविवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी लातूर येथे ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!