बारामती:
मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्रित येण्याची उर्वरित आशा मावळली.यामुळे बारामतीकरांमध्ये अस्वस्थता अधिक वाढल्याचे चित्र आहे.

माळेगावच्या गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बारामतीतल्या सहयोगमध्ये अजित पवार यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे भविष्यात ‘गोविंदबाग’ विरोधात ‘सहयोग’ आमने-सामने येणार असल्याचे चिन्ह आहे.तर यंदाच्या दिवाळी गोविंदबाग आणि सहयोग मध्ये स्वतंत्रपणाने साजरी होते की काय याकडे सर्वाचे लक्ष आहे.

मुंबई झालेल्या अजित पवार यांच्या बैठकीला शरद पवार बैठकीच्या तुलनेने अधिक संख्येने आमदारांची उपस्थिती पाहावयास मिळाली. त्यामुळे अजित पवारांचे पक्ष संघटनेवरील वर्चस्व स्पष्ट झाले आहे. बारामती शहर आणि तालुक्यातून अजितदादांच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते भल्या पहाटे रवाना झाले. त्यासाठी मध्यरात्री दाेन वाजल्यापासूनच अनेकांना जाग आली. पहाटे तीन वाजल्यापासून सर्व वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे चित्र होते.

बारामतीत राजकीय अथवा अराजकीय कार्यक्रमात पवार कुटुंबीय नेहमी एकमेकांविषयी आदर व्यक्त करतात, कौतुकांचा स्तुतीसुमनांचा वर्षाव करतात. मात्र, आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाषणे ऐकताना बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. एकमेकांवर शाब्दीक बाण सोडणारे पवार कुटुंबीय आज सर्वांनी प्रथमच अनुभवले.

पक्षसंघटना आणि पक्षचिन्हावरूनच सुरुवातीचा वाद होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार यांनी पक्ष आणि पक्षचिन्ह जाऊन देणार नसल्याचे खुले आव्हान अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे हा वाद आजपासूनच पेटल्याचे संकेत आहेत. बारामतीत याचे उमटणारे पडसाद मोठी राजकीय दरी निर्माण करणारे ठरणार आहेत.

राज्यातील सत्तानाट्यानंतर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच सर्वाधिक बारामतीकरांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील केवळ अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याचे दिसून येते. याउलट चित्र शरद पवारांबाबत आहे. आजपर्यंत शरद पवारांबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या माहेरघरातच पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांसह कार्यकारी अध्यक्षांना संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!