संकल्पसिध्दीचे गुपित-विश्वप्रार्थना
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
ज्ञानयोग, भक्तीयोग,कर्मयोग,ध्यानयोग व हठयोग हे सर्व प्रकारचे योग विश्वप्रार्थनेत अंतर्भूत आहेत,म्हणूनच विश्वप्रार्थना सर्वांना सर्वार्थाने उपयुक्त ठरलेली आहे.विश्वप्रार्थनेत ज्ञानयोग आहे. याचे कारण मानसशास्त्र,परामानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा सुरेख संगम जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानात झालेला आहे आणि ही विश्वप्रार्थना जीवनविद्येचे सार आहे.
विश्वप्रार्थनेत कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही.’विश्वप्रार्थना करा’ असे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा विश्वप्रार्थना का करायची,कशी करायची,किती करायची,केव्हा करायची, कोठे करायची आणि विश्वप्रार्थना करण्याने साधकाला सर्वार्थाने लाभ कसा होतो व का होतो,वगैरे ज्ञान साधकाला आम्ही देत असतो.त्याचप्रमाणे हे ज्ञान आम्ही आमच्या पुस्तकांतून वाचकांना सादर केलेले आहे.
ज्ञान म्हणजे काय हे विशद करताना श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात,ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ।
पहावे आपणासी आपण।
या नांव ज्ञान ।।
श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
पै आपुलेनि भेदेवीण |
जाणिजे जे माझे एकपण ।
तयाचे नांव शरण मज येणेगा ।।
त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात,
देव पहावया गेलो। तेथे देवचि होऊनी ठेलो।। तुका म्हणे धन्य झालो । आजी विठ्ठला भेटलो ।।
तुका करी जागा नको चाचपू वाऊगा। आहेसी त अंगा। अंगी डोळे उघडी ।।
परमार्थात ज्ञानयोगाला महत्त्वाचे स्थान आहे इतकेच नव्हे तर ज्याला आपण भक्ती असे म्हणतो त्या भक्तीचा उदयसुद्धा ज्ञानातून होत असतो.त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात.सर्वसाधारणपणे लोक ज्याला भक्ती असे म्हणतात ती भक्ती नसून उपासना असते आणि या उपासनेत कर्मकांडच जास्त असते.म्हणून ज्ञानाला पर्याय नाही हे साधकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी संतांना शरण जाणे जरूरीचे आहे.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
ते ज्ञान पै बरवे । जरी मनी आथी आणावे । तरी संतां या भजावे । सर्वस्वेसी ।।
सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरस्मरणाचा व विश्वप्रार्थनेचा अभ्यास करता-करता साधक वृत्तीरहित होतो आणि ज्या ईश्वराची आपण प्रार्थना करतो तो ईश्वर आणि मी दोन नसून एकच आहे,याची त्याला प्रचीति येते. म्हणूनच विश्वप्रार्थनेत ज्ञानयोग अंतर्भूत आहे.
विश्वप्रार्थनेत भक्तीयोग आहे.श्री समर्थ रामदास स्वामीनी भक्तीची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे. ते सांगतात,’जो विभक्त नोहे तो भक्त’ याचा भावार्थ असा की देवाशी जो युक्त तो भक्त आणि जो देवाशी युक्त नाही तो अभक्त. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
जे जे भेटे भूत। ते ते जाणिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।।
विश्वप्रार्थना करण्याचा नित्य अभ्यास केल्याने साधक एका बाजूने अंतर्मुख होत होत हृदयस्थ ईश्वराशी एकरूप होतो आणि दुसऱ्या बाजूने सर्वांसाठी हितचिंतन करता-करता साधक सर्वांमध्ये वास करणाऱ्या सर्वेश्वराशी एकरूप होऊन सर्वव्यापी होतो.अशाप्रकारे साधक देवाचा अंतर्बाह्य भक्त होऊन राहतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे म्हणजे,
अणू रेणू थोकडा । तुका आकाशा एवढा ।।
त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर
किंबहुना चराचर। आपणची जाहला ।।
थोडक्यात प्रार्थनेत ईश्वर स्मरणाला खूपच महत्त्व आहे.नामस्मरण म्हणजे ईश्वर स्मरण करणे हे भक्तीयोगाचे प्रमुख अंग आहे.ईश्वर स्मरण केल्याने साधक परमेश्वराशी जोडला जातो व तो त्याचा भक्त होऊन रहातो. तात्पर्य विश्वप्रार्थना सतत करण्याने साधक देवाच्या स्मरणात राहतो, देवाशी जवळीक साधली जाते आणि विश्वप्रार्थना म्हणता म्हणता साधक देवाशी एकरूप होतो. अशा प्रकारे विश्वप्रार्थनेत भक्तीयोग अंतर्भूत आहे.
विश्वप्रार्थनेत कर्मयोग आहे.नित्य विश्वप्रार्थना करणे ही सामान्य गोष्ट नाही.कोणीही उठावे आणि विश्वप्रार्थना म्हणावी असे घडू शकत नाही.येथे अट्टाहासाने प्रयत्न करणे आवश्यक असते. दुसरा मुद्दा असा की,साधक विश्वप्रार्थना म्हणतो ते सर्वांचे भले व्हावे,कल्याण व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन.येथे ‘माझे भले व्हावे,माझे कल्याण व्हावे’ अशी साधकाची संकुचित भावना नसते. कर्मयोग विशद करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद हे दोन बंध कर्माचे की।
याचा भावार्थ असा की,’मी कर्ता’ हा अहंकार आणि फळ मलाच मिळाले पाहिजे’ हा आग्रह या दोन गोष्टी गळून पडतात तेव्हाच कर्मयोग साध्य होतो.विश्वप्रार्थना करता करता प्रार्थनेत प्रार्थिल्याप्रमाणे साधक स्वतःचा विचार न करता तो सर्वांच्या कल्याणाचा विचार करीत असतो, परिणामी साधकाचे मीपण कमी-कमी होऊन त्याला सर्वात वास करणाऱ्या सर्वेश्वराचे सर्वार्थाने चिंतन घडू लागते.
विश्वप्रार्थनेच्या द्वारे ईश्वर चिंतन नित्य घडत राहिल्याने साधकाची ‘मी कर्ता’ ही कल्पना गळून पडते,’ईश्वर कर्ता’ हा भाव बळावत जातो,परिणामी कर्मफळाचा आग्रह उरतच नाही. थोडक्यात,कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद,हे कर्माचे दोन बंध आपोआप गळून पडतात. अशा तऱ्हेने विश्वप्रार्थनेत कर्मयोग अंतर्भूत आहे.
विश्वप्रार्थनेत ध्यानयोग आहे.याचे कारण नित्य विश्वप्रार्थना करता करता साधकाच्या मनात येणारे अनिष्ट व अनावश्यक विचार कमी-कमी होऊ लागतात,त्याचे मन विश्वप्रार्थना करण्यात रमू लागते,त्याला विश्वप्रार्थना करण्यात प्रेम वाटू लागते आणि त्याच्या मनाची चंचलता नष्ट होऊन त्याचे मन विश्वप्रार्थनेत स्थिर होते.अशा तऱ्हेने विश्वप्रार्थनेत ध्यानयोग अंतर्भूत आहे.
विश्वप्रार्थनेत हठयोगसुद्धा आहे.हठयोगाचे प्रमुख अंग म्हणजे प्राणायाम असून ‘कुंभक’ हा प्राणायामाचा प्राण आहे.मन आणि प्राण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.मनाचा परिणाम विश्वप्रार्थनेत प्राणाचा परिणाम मनावर होतो.माणसाला जेव्हा भीती वाटते किंवा अस्वस्थता वाटते तेव्हा त्याचा श्वासोच्छ्वास जलद चालतो,त्याच्या उलट माणसाचे मन शांत व स्वस्थ असते तेव्हा त्याचा श्वासोच्छवास मंद चाललेला असतो.
मन आणि प्राण यांचा परस्पर संबंध घनिष्ट असल्यामुळे विचार आणि श्वास नित्य एकमेकावर परिणाम करीत असतात.विश्वप्रार्थना नित्य म्हटल्याने श्वासोच्छ्वासावर परिणाम होऊन श्वास नियंत्रित होऊ लागतो,साधकाचे मन प्रार्थनेत तल्लीन होऊ लागते परिणामी त्याचे मन स्थिर होऊन त्याला मन:शांती लाभते.याचा सुपरिणाम प्राणावर होऊन साधकाचा श्वासोच्छवास मंद-मंद होत त्याला सहज कुंभक साध्य होतो.या संदर्भात तुकाराम महाराजांचे वचन चिंतनीय आहे.
यम नियम प्राणायाम|
साधे जपता रामनाम ।।
अशा रीतीने विश्वप्रार्थनेत हठयोग अंतर्भूत आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै