खरी भक्ती
भक्ती मार्गाबद्दल जनमानसात विलक्षण भोळसट व खुळचट कल्पना असलेल्या दिसून येतात. ‘भोळा भाव’ हा भक्तीमार्गाचा प्राण समजला जातो.परंतु भोळा भाव म्हणजे नेमका काय प्रकार असतो याबद्दल सामान्य लोकांत प्रचंड अज्ञान असते.
‘भोळा भाव’ म्हणजे भोळसट किंवा बावळट अंधश्रद्धा नव्हे.परंतु या सत्याची जाणीव न झाल्यामुळे भोळा भाव किंवा भोळी भक्ती या नावाखाली सामान्य लोक भोळसटपणे काहीतरी कर्मकांड करीत रहातात.’भोळा भाव’ याचा भावार्थ ‘शुद्ध भाव’ असा आहे.शुद्ध भावाने देव प्रसन्न होतो,लोक समजतात तसे भोळसट भावाने किंवा भोळसट भक्तीने नव्हे.भक्ती हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे भक्तीचे दोन प्रकार आहेत.ज्ञानपूर्व भक्तीला उपासना असे म्हणतात तर ज्ञानोत्तर भक्तीला स्वरूपरती असे म्हणतात.*
उप म्हणजे जवळ व आसन म्हणजे बैठक,देवाच्या जवळ आपले आसन असणे म्हणजे खरी उपासना होय.*
*खरी उपासना साधण्यासाठी प्रथम देवाचे दर्शन होणे आवश्यक आहे.*
*’देवाला पहात पहात’ देवाचे सतत नाम घेणे म्हणजे उपासना. देवाधर्माच्या नांवाखाली कर्मठपणे काहीतरी मठ्ठपणे करीत बसणे म्हणजे उपासना नव्हे.*
*उर्ध्वमुखाने देवाला पीत रहाणे म्हणजे भक्ती.*
*”मी नाहीच केवळ विठ्ठल आहे” ह्या भावाला चिकटून रहाणे या नांव भक्ती.*
*नाम आणि भाव हे प्रभुचे दोन चरण असून हे चरण अंतःकरणात घट्ट धरून ठेवणे म्हणजे भक्ती.*
*’आकार पहाताच स्वरूपाकार होणे ‘ ही भक्तीची कमाल आहे.*
*स्वस्वरूपाच्या आनंद डोहात सतत डुबत रहाणे म्हणजे भक्ती.*
*देवाबद्दल आसक्ती ती भक्ती व विषयाबद्दलची भक्ती ती जागावी आसक्ती.*
*’भूतमात्रात भरून राहिलेल्या भगवंताला डोळे भरून पाहणे’ हा भक्तीचा सर्वात श्रेष्ठ प्रकार होय.*
*ज्ञानरूप जीवाने स्वतःला आनंद-स्वरूपात विरवून घेणे याला मुक्ती म्हणतात,तर आनंदस्वरूप जीवाच्या ज्ञानरूपात व्यक्त होणे याला भक्ती म्हणतात.*
*स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृती हीच देवाची आरती होय.*
*जे केवळ प्रपंचासाठी जगतात ते तर्कट होतात व जे केवळ तथाकथित परमार्थासाठी जगतात ते कर्मठ होतात.परंतु केवळ जीवनासाठीच जे प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात ते मात्र प्रेमळ बनतात.*
*जो भगवंताशी नित्य युक्त तो जाणावा भगवंताचा सत्य भक्त.*
*भीती हा धर्माचा पाया आहे तर अध्यात्माचा पाया आहे भक्ती.*
*भगवंताची सगुण उपासना म्हणजे भगवंताच्या सहा गुणांची जोपासना.*
*सामर्थ्य,समृद्धी व सौजन्य या त्रयींची जोपासना हीच दत्तात्रयाची म्हणजे देवाची खरी उपासना होय.*
*विषयप्रीती सहजसाध्य,परंतु देवभक्ती प्रयत्नसाध्य आहे.*
*देवाच्या भक्तीत जीवाचा अहंकार हा देवाचा ओंकार आहे, तर देहाच्या भक्तीत देवाचा ओंकार हा जीवाचा अहंकार आहे.*
*शक्ती,मती,युक्ती आणि व्यक्ती या चार प्रकारांनी भगवंत भक्तांचा सांभाळ करतो.*
*प्रभुला शरण जाणे म्हणजे आवडीने त्याचे नाम घेणे.*
*देवाचे ध्यान म्हणजे देवाचा ध्यास.*
*हरीचा ध्यास ज्यांना ते हरिदास,बाकीचे सर्व लक्ष्मीदास.*
*हरिपाठ म्हणजे प्रेमामृताचा पाट.*
*ज्यांना हरिचा ध्यास त्यांचा हरी होतो दास.*
*निर्बुद्धपणे कर्मकांड करीत बसण्याने ईश्वर प्रसन्न होत नाही. त्याला सु-मन दिल्याने तो प्रसन्न होऊन त्याच्याकडून भक्ताला ‘उन्मन’ हा प्रसाद प्राप्त होतो.*
*निर्गुण उपासनेत जी मौज आहे ती सगुण उपासनेत नाही, याची जाणी लोकांना नसावी,ही मोठी खेदाची गोष्ट होय.*
*बहिर्मनांतील युक्ती व अंतर्मनातील शक्ती यांची युती म्हणजे भक्ती होय व व भक्तीतून जी साकार होते ती परमशांती होय, असा आहे हा शांती-सुखाच राजमार्ग.*
सद्गुरू श्री वामनराव पै
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!