नामस्मरणामध्ये “येईल तैसा बोल रामकृष्ण हरी” हे जरी खर असल तरी वस्तुस्थिती अशी आहे की सुरूवातीला पहिलं पाऊल म्हणून ठीक आहे.*पण पुढे तुम्हाला त्याची प्रगती करायला पाहिजे आणि ती प्रगती कुठपर्यंत व्हायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे .
एके ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात,
सद्गुरू वाचोनि नाम नये हाता।
साधने साधिता कोटी जाणा।
संतांसी शरण गेलीया वाचोनि।
एका जनार्दनी न कळे नाम।।
“येईल तैसा बोल रामकृष्ण हरी”*ही पहीली स्टेप झाली , पहिलं पाऊल,
आता शेवटचं पाऊल काय आहे ?
संतांशी शरण गेलीया वाचुनि।
एका जनार्दनी न कळे नाम।।
सद्गुरूंच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला नाम म्हणजे काही कळनार नाही. नाम म्हणजे त्याच रूप काय, स्वरूप काय, आपल्याला वाटतं तितकं ते नाम सोपं नाही* आणि म्हणून असं हे नाम संतांकडूनच शिकायला पाहिजे, सद्गुरूंकडूनच शिकायला पाहिजे .
कबीराने सांगितले की रामनाम सगळेच घेतात .
“सब कोई कहे। ठग, ठाकूर और चोर।।
जिस नामसे प्रल्हाद और ध्रृव तरे।
वो नाम कुछ और”।।
प्रल्हाद , ध्रृव आणि मोठमोठे संत ज्या नामाने तरले “ते नाम कुछ और आहे”.तुम्ही समजता तसे ते नाम नाही . “ते और नाम आहे”आपण जे नामस्मरण करतो आणि संतांना जे नामस्मरण अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये दोन टोकाचं अंतर आहे.
आज जगामध्ये नाममंत्र किंवा एखादा बीजमंत्र दिला जातो, तो आपण फक्त जपायचा . मग साक्षात्कार कधी होईल तेव्हां होईल ते सांगणारे सांगत नाहीत . साक्षात्कार होईल म्हणजे काय होईल, तेही सांगत नाहीत . अशा तऱ्हेने सगळं “गुलदस्त्यात” असा प्रकार चाललेला असतो . हे संतांना अभिप्रेत नाही. नामस्मरण म्हणजे, नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे “अनुसंधान”. स्वरूपाचं अनुसंधान करणं याला नामस्मरण म्हणतात,
आपल्याला जर स्वरूपाची ओळख नसेल तर आपण स्वरूपाचं अनुसंधान करणार कसं ?
सगळ्या संतांनी आपल्याला अनुसंधानावर आणून सोडलेलं आहे.आपण जर बारकाईने विचार केला तर असं दिसेल कि, सगळ्या संतांनी अनुसंधान करा म्हणून सांगितलेलं आहे . तेव्हा अनुसंधान हे स्वरूपाचं करायचं असत.देव देव ज्याला म्हणतात, …..
तो देव म्हणजे मूर्ती नव्हे , किंवा एखादी व्यक्तीपण नव्हे. तर ……
देव म्हणजे आपल सच्चिदानंद स्वरूप आणि या सच्चिदानंद स्वरूपाचं आपण चिंतन करायचं असतं, स्मरण करायचं असतं, अनुसंधान करायचं असत, अवधान घ्यायचं असतं आणि त्या ठिकाणी सावधान रहायचं असतं.
पण ….
हे करण्यासाठी तुम्हाला जर स्वरूपाची ओळख नसेल तर तुम्ही हे करणार कसं ?
मी नेहमी एक उदाहरण देतो . ज्याने आंबा पाहिलेला नाही, खाल्लेला नाही त्याच्या डोळ्यासमोर आंबा हा शब्द येईल पण फळ येणार नाही. हे एकदा लक्षात आलं की मी काय म्हणतो ते कळेल. देवाचं आपण राम किंवा विठ्ठल असं स्मरण केलं की आपल्याला विठ्ठल स्मरण झालं पाहिजे.
म्हणजे आपल्याला स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. आपल्या स्वरूपाचं अवधान झालं पाहिजे, असं झालं तर ते नामस्मरण.
नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे अनुसंधान ही गोष्ट एकदा लक्षात ठेवली की, नामस्मरण संताना अभिप्रेत कुठलं आहे हे तुमच्या लक्षात येईल.
सद्गुरू श्री वामनराव पै
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम