नाम माझे गुरु.

गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय,हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवत्राम हा उत्कृष्ट गुरू आहे असा अनुभव येऊ लागतो.

कळे ना कळे त्या धर्म। ऐका सांगतो रे वर्म।
माझ्या विठोबाचे नाम। अट्टाहासे उच्चारा।।
तो या दाखविल वाटा। जया पाहिजे त्या नीटा।
कृपावंत मोठा। पाहिजे तो कळवळा।।

रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता कंदिलाच्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच राहतो,त्याप्रमाणे भगवन्नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढील मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो.

न कळे ते कळो येईल उगले। नामे या विठ्ठले एकाचीया।।
न दिसे ते दिसो येईल उगले। नामे या विठ्ठले एकाचीया।।

किंबहुना स्वत:भगवंतच नामरूपाने साधकाच्या अंत:करणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतो.
*नामाच्या सतत उच्चाराने मन-चित्त-बुद्धीवर साठलेला विचार-विकार-विकल्पाचा मळ आपोआप नाहीसा होऊ लागतो आणि विवेक-वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचा रथ सिद्धीच्या दिशेने वेगाने दौड करू लागतो.नामाच्या सतत अभ्यासाने वृत्ती अंतर्मुख होते,मन स्थिर होते,चित्त शांत होते व बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो.गुरूरूपाने नाम जीवनात फार मोठे काम करते,हे गुह्य न समजल्यामुळे सामान्य माणसांकडून भगवन्नामाची उपेक्षाच होऊन राहिलेली आहे.

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ। सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे।।

….~सद्गुरु श्री वामनराव पै.

error: Content is protected !!