निष्ठा….अर्थपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली (भाग – १ )
निष्ठा!— अनेक अवस्थांपैकी ही मनाची अतिउत्तम अत्यंत आवश्यक अशी अवस्था आहे!
मित्रांनो–या निष्ठे विषयी मी जसा जसा विचार करायला लागलो तशी तशी तिची व्याप्ती आणि तिची अनेक रूप माझ्या डोळ्यासमोर यायला लागलीत!
निष्ठा आपल्या गुरूंविषयी, आपल्या कुटुंबाविषयी त्यात आई-वडील , बहिण-भाऊ, पती-पत्नी सर्व नाती यांचा समावेश आहेच!
सामाजिक निष्ठा राष्ट्रीय निष्ठा ,व्यवसायिक निष्ठा ही निष्ठेची अनेक रूपे आहेत! आणि तिच्या माध्यमातून आपल्या हातून निश्चितच कृती घडते!
निष्ठेचे मूळं ,तिचा उगम, तिचा पाया हे सर्व सर्व म्हणजे प्रेम आहे!
आपल्या मनात वसत असलेली त्या –त्या व्यक्तीविषयी श्रद्धा आहे आणि म्हणूनच प्रेमापोटी ,श्रद्धेपोटी निष्ठेची जोपासना, तिची काळजी प्रत्येक जण आपल्या यथाशक्ती प्रमाणे घेत असतो!
किंबहुना ती जोपासण्यासाठी तो कर्तव्याच्या भावनेतून इतका प्रेरित होतो की- त्याच्या कृतीपेक्षाही- त्याच्या क्षमतेपेक्षाही तो जास्त कार्यरत होतो ! त्याच्या हातून कल्पनेच्या पलीकडे एखादे ध्येय तो गाठू शकतो.
त्यामुळे निष्ठेची पूर्तता करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो आणि हळूहळू आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो!
कौटुंबिक निष्ठा– मला माझ्या कुटुंबाची सेवा करायची आहे, माझ्या आई-वडिलांची सेवा करायची आहे ,माझ्या पत्नीशी एकनिष्ठ राहायचं आहे, मुलांचे करिअर घडवायचं आहे. आता अत्यंत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्याचे चटके मी सोसतो आहे. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला उत्तम व्यवसाय निवडायचा आहे.
ही प्रेरणा मला कुटुंबाच्या निष्ठेपोटीच त्याच्या मनात जन्म घेते आणि मग तो भारावून जाऊन दिवसातले अठरा तास जीवापाड मेहनत करतो, कष्ट करतो!
त्याचा परिणाम असा होतो की त्यातूनच काही डॉक्टर होतात, इंजिनिअर होतात, मामलेदार होतात ,कलेक्टर होतात आणि आपल्या क्षमतेपेक्षा ही उत्तम काम करून सर्व परिस्थितीत यशस्वी होऊन चिखलातील कमळे बनून समाजात आपला आदर्श निर्माण करतात.
सौदागर लक्ष्मण आडकर हा असाच गरिबीचे चटके खात खात उत्तम गुणांनी सी.ए .झालेला चिंचवड मधील यशस्वी तरुण!
त्याचे वडील पोटासाठी कुटुंबासह पुण्यात आले, मोलमजुरी करत असत, आई बिगारी काम करायची ,छोटा सौदागर शाळा सांभाळून उरलेल्या वेळात कधी हॉटेलात कधी फटाक्याच्या दुकानात काम करायचा .
सुट्टीच्या दिवशी बाजारात भाजीचीे ,केळ्यांची गाडी खाली करणे ,लग्नाच्या पंगतीत वाढपी म्हणून काम करून ,शाळा झाल्यावर दुपारच्या किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून पैसा मिळवायचा आणि सी.ए. व्हायचेच.
ऑफिस बॉय पाहिजे ही जाहिरात वाचून तो मुलाखतीला गेला 12 वी नंतर पुढे काय करणार आहेस ?
असे मुलाखत घेणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी विचारले.
सी.ए .होणार आहे असे उत्तर आत्मविश्वासाने पण नम्रतेने सौदागरने दिले .
बारावीला किती टक्के गुण मिळतील त्यावर , 80 टक्के गुण मिळतील असे म्हणाला संचालक चांगलेच प्रभावित झाले व त्यांनी 80 टक्के गुण मिळाल्यास मी तुला सीएच्या प्रवेशासाठी पैसे देईल असे आश्वासन दिले .
रिझल्ट लागल्यावर 80 टक्के गुण मिळाल्यामुळे संचालकानीं सीएची फी भरण्यासाठी त्याच्या वडिलांकडे फीची रक्कम दिली. तसेच पाचशे रुपये व पहिल्या वर्षाची पुस्तके ही भेट दिली.
मनापासून मेहनत करून सौदागर उत्तम यश मिळवून सी.ए झाला .चांगले उद्दिष्ट साधण्यासाठी कष्टाची तयारी ठेवली प्रामाणिकपणे वागून लायकी सिद्ध केली, तर कोणीतरी पाठीशी उभे राहते व योग्य मार्ग निश्चितच निघतो .
बांधकामासाठी दगड घडविणारे पाथरवट म्हणजेच बेलदार .दगडाला आकार देता देता संधी मिळेल तेव्हा शाळेत जायचे व शाळेत शिक्षण घ्यायचे, असे शंकर मोहिते या होतकरू मुलाचे शिक्षण चालू होते .
मळके फाटके कपडे, गणवेशाचा पत्ता नाही, तुटक्या चपला अशी परिस्थिती त्यामुळे गुरुजी ओरडतील व मुले चेष्टा करतील या भीतीने शाळा टाळण्याकडे शंकरचा कल असे!
पण अंगभूत हुशारीमुळे तो चांगले गुण मिळवून नववी पास झाला! मात्र शाबासकी ऐवजी कॉपी करुन चांगले गुण मिळवले असे ऐकावे लागले!
(शब्दांकन- ला.डाॅ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
( पुढील भाग उद्याच्या अंकात)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस