जाणीव- अदृश्य शक्तीची…निष्काम कर्मयोगीच्या प्रार्थनेची…
मित्रांनो,
“सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा!” जर या उद्देशाने माणूस ज्यावेळी स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी परमेश्वराजवळ काहीतरी मनापासून मागतो त्यावेळी तो ते ऐकल्या शिवाय राहत नाही.
अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आपण काहीही न करता केवळ आणि केवळ प्रार्थना करून यशाची अपेक्षा करावी!अशीच एक आठ वर्षाच्या मुलानेही मला वेगळीच अनुभूती दिली! शारदा आश्रमाच्या निवासी आश्रम शाळेतून उलट्या-जुलाब झाल्यामुळे या मुलाला आमच्या हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजता दाखल करण्यात आल!
मित्रांनो,
हा मुलगा त्या शाळेच्या वस्तीतून स्वतःच्या पायाने चालत आला! त्याला सलाईन सुरू करून आवश्यक असलेली औषध देऊन मी बरोबर दोन वाजता जेवायला वर गेलो! त्या दोन तासातील औषध उपचारामुळे त्याला थोडं बरं वाटू लागलं होतं! पण अचानक चारच्या ड्युटीवर आलेल्या सिस्टर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत मला बोलवायला आल्यात! कारण परिस्थितीच तशी होती.
दोन वाजेपर्यंत चांगला असलेला तो अनाथाश्रमातील मुलगा- एकदम निपचित पडला होता! त्याच्यात कोणतीही हालचाल तिला दिसली नाही म्हणून मला सिस्टर बोलण्यासाठीच आल्या होत्या!मी त्या मुलाजवळ गेल्यानंतर मला त्याला बघताक्षणीच त्याच्या गंभीर आजाराची कल्पना आली! कार्डियाक मसाज आणि लाइफ सेविंग इंजेक्शन देऊन ताबडतोब ॲम्बुलन्स मधून त्याला मी लोकमान्य हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.
तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली जाईपर्यंत तरी तो जगला पाहिजे– टिकला पाहिजे या दृष्टीने माझ्या परीने मी शर्तीचे प्रयत्न चालूच ठेवले होते! लोकमान्य हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवल्यानंतर बाल रोगतज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो सातत्याने जवळजवळ तीन दिवस मृत्यूशी झगडत होता!त्याकाळात मी त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होतो! करण त्याच्यासाठी प्रार्थने शिवाय त्यावेळी माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं!
मित्रांनो– तीन दिवसानंतर मात्र चमत्कार झाला! कारण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली व तो मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आला!मित्रांनो– वरील दोन घटनां वाचल्यानंतर आपल्याला त्यात काही विशेष वाटणार नाही! पण मी मात्र त्यात बऱ्याच गोष्टी शिकलो त्या म्हणजे प्रत्येक डॉक्टरने शेवटपर्यंत आपल्याला जे ज्ञान आहे! अनुभव आहे आणि ते परमेश्वराने दिलेलं आहे म्हणून केवळ हातपाय गाळून न बसता जी साधने उपलब्ध असतील त्याच्या माध्यमातून त्याचा विनाविलंब वापर करणे!
हे प्रत्येक डॉक्टरच प्रथम कर्तव्य ठरतं! नंतरच प्रार्थनेचा सहभाग सुरू होतो!मित्रांनो- मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे की जर त्याला यश मिळालं तर त्याचं श्रेय तो स्वतःकडे घेतो! आणि— अपयश मिळालं तर मात्र देवाला आणि त्याच्या दैवाला दोष देत राहतो! वास्तविक गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे– कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन! म्हणजेच- निष्काम वृत्तीने सतत कर्तव्यदक्ष प्रत्येक डॉक्टर राहिला तर त्याला आत्मिक समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद निश्चितच मिळणार आहे!
आणि अशावेळी त्याच्यामागे खरी ती अदृश्य शक्ती सुद्धा भक्कमपणे उभी राहते!मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात असं म्हटलं आहे की- धन्याचा तो माल_ मी तर हमाल– भार वाही!—! याचाच अर्थ असा की कर्ता-करविता तो आहे मी मात्र निमित्तमात्र आहे! मित्रांनो- हा विचार जर मनात रुजला तर निश्चितच मला आलेली अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही! ती आपल्याला प्राप्त हो!
( शब्दांकन -ला.डॉ. शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)