“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २४ वा”
अभंगाचा भावार्थ :
*➡️ जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत, त्यांचा अंतिम हेतू साधकाचे ठिकाणी “सर्वांघटी राम” या शुद्ध भावाचा आविर्भाव होण्यासाठीच आहे.
*➡️ म्हणून उपासना चालू असतां हा शुद्धभाव बुद्धीतून सोडू नकोस, या भावाचा विसर पडू देऊ नकोस व त्याच्या सत्यत्वासंबंधी अंत:करणात कांही संदेह असेल तर त्याचा त्याग करून त्या शुद्ध भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा, प्रभुचा टाहो फोडून नित्य धांवा कर.
*➡️ त्याची अत्यंत कळकळीने नित्य प्रार्थना कर. त्यासाठी जात, वित्त, गोत्र, कुळ, शील वगैरे विषयी तू चिंता न करतां शुद्ध भावाने युक्त होऊन प्रभुचे त्वरित भजन कर.
*➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवंत माझ्या ध्यानी-मनी सतत असल्यामुळे वैकुंठाने-भगवंताने भूलोकी येऊन वस्ती केली.
🌻थोडक्यात स्पष्टीकरण :
जप तप कर्म क्रिया नेमधर्म।
सर्वांघटी राम भाव शुद्ध।।
उपासना करणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. कोणी जप करतो तर कोणी तप करतो. कोणी कर्मनिष्ठ असतो तर कोणी धर्मनिष्ठ असतो. कोणी योग करतो तर कोणी याग करतो. कोणी पूजा करतो तर कोणी अर्चा करतो. कोणी पारायण करतो तर कोणी सत्यनारायण करतो.
नाना प्रकारच्या उपासना करणाऱ्या या लोकांना उपासनेचे मुख्य वर्म कशात आहे हेच समजत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, कष्ट पदरात पडतात, पण फळ मात्र मिळत नाही. एका बाजूला उपासना करायची व दुसऱ्या बाजूला इतरांशी तंटे-बखेडे करायचे, हेवा-दावा करायचा, त्यांचा द्वेष-मत्सर करावयाचा व संधी सापडली तर दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःची तुंबडी भरावयाची, असेच प्रकार सर्वत्र आढळतात.
ही खरी उपासना नव्हे व अशी उपासना करणे म्हणजे एका बाजूने मेहनत करून धागा गुंडाळायचा व दुसऱ्या बाजूने गुंडाळलेला धागा आपणच सोडून टाकायचा, तशातलाच हा प्रकार होय.
तात्पर्य, उपासनेचे वर्म समजून उपासना केली पाहिजे. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व उपासनेचे वर्म सांगितले आहे. योग-याग, जप-तप, कर्म-धर्म वगैरे नाना प्रकारच्या उपासना या कशासाठी करायच्या?
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, “सर्वांघटी राम” या शुद्ध भावाचा अंत:करणात आविर्भाव होण्यासाठीच होय. ईश्वर साक्षात्कार हेच उपासनेचे फळ होय.
प्रत्यक्ष भगवंतच जगरूपाने, विविध वेषाने, अनंत प्रकाराने आकाराला आलेला आहे असे प्रत्यक्ष दर्शन होणे, अनुभव येणे यालाच “ईश्वर साक्षात्कार” असे म्हणतात.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।
हा भक्तियोग निश्चित। जाण माझा।।
वास्तविक ”भूती भगवंत” हे सत्य आहे; परंतु त्या सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत तसे तू समज, मान, भावना कर, असाच संत उपदेश करतात.
”भूती भगवंत” हा भावच वास्तविक प्रत्येक धर्माचा पाया आहे, असावयास पाहिजे परंतु प्रत्यक्षात हा पाया जर भुसभुशीत असेल तर धर्माला धर्ममंदिर हे नांव प्राप्त होण्याऐवजी “धर्ममदिरेचे धाम” असेच नामाभिधान द्यावे लागेल.
“भूती भगवंत’ या भावाची जोपासना हीच खरी देवाची उपासना आहे व धर्माचे वर्म तेच आहे. अशी शिकवण प्रामाणिकपणे बालपणापासून दिली जात नाही, तोपर्यंत समाजाला सुख व समाधान मिळेल अशी नुसती आशा करणेही व्यर्थ आहे, मग प्रत्यक्षात ते मिळण्याची गोष्टच बोलावयास नको.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1077
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम