“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २३ वा”
दुसरा मार्ग, ….
पांच म्हणजे पंचाग्निसाधकाचा किंवा त्यासारखे तपाचे मार्ग. हा मार्ग इतका खडतर आहे की, साधक शेवटपर्यंत त्यात टिकूच शकत नाही.
तिसरा मार्ग म्हणजे, ….
तीन देहांचा विचाराने निरास करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग. केवळ दृढ विचाराने तीन देहांचा निरास करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. विचाराने तीन देहांचा साधकाने निरास करणे म्हणजे, मी स्थूल देह किंवा सूक्ष्म देह अगर कारण देह नसून त्यांचा साक्षी केवळ आत्मा आहे-ब्रह्म आहे, असा दृढ निश्चय करणे, परंतु विचार व आचार यांत दोन ध्रुवाइतके अंतर आहे. साधकाने मी देह नसून ब्रह्म आहे, असा कितीही विचार केला तरी प्रत्यक्ष आचाराचा प्रश्न येतो त्या वेळेला विचार विचाराच्याच ठिकाणी रहातो व मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्या साधकाच्या पदरात ब्रह्मघोटाळा मात्र पडतो!
म्हणूनच …. स्वत:ला ज्ञानी समजणारे लोक, मी देह नाही, देहाशी माझा संबंध नाही, देहाकडून घडणाऱ्या कर्माला मी नसून प्रकृती जबाबदार आहे असे म्हणत स्त्री मोहाला, संपत्ती मोहाला, विषय मोहाला बळी पडलेले आढळतात.
चौथा मार्ग दशकांचा मेळा :
पांच कर्मेंद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये यांचा मेळा म्हणजे इंद्रियदमनाचा मार्ग. विषयासक्त असलेल्या इंद्रियांचे बळेच दमन करण्यात काय मरणप्राय दुःख आहे, याची कल्पनाही सर्वसाधारण मनुष्याला येणे कठीण आहे.
पांचवा मार्ग म्हणजे, ….
अजपाजप उलट प्राणाचा।
उलट सुलट प्राणाची गती होत असतां किंवा श्वासोच्छ्वास चालू असतां सोऽहं असा जो नाद निघतो त्यावर अनुसंधान ठेवणे, याला “अजपाजप” म्हणतात. परंतु यात मनाचा दृढ निर्धार असल्याशिवाय साधकाला यश मिळत नाही.
तात्पर्य, भगवत्प्राप्तीचे म्हणजेच ”आपले एकपण न मोडता अनेक होण्याची, एकतत्त्व जो हरी त्याची कळा किंवा कला म्हणजे लीला” दाखविणारी, तिचा साक्षात्कार घडवून आणणारी जी अनेक साधने आहेत, जे मार्ग आहेत, ते सर्व साधकाला अत्यंत कष्ट देणारे आहेत व इतके कष्ट करूनही ते जर यथासांग घडले नाहीत तर साधकाला यश मिळत नाही.
परंतु “नाममार्ग” तसा नाही. या मार्गात कष्ट नाहीत व शिवाय नामजप कसाही, कोठेही व केव्हांही जरी केला तरी तो फळतो. म्हणून नाम हा राजमार्ग आहे.
राजमार्ग नामरूप। तेणे पाविजे चिद्रूप।।
ज्ञानेश्वर महाराजही सांगतात, नाममार्ग हा सर्व मार्गात श्रेष्ठ-वरिष्ठ आहे.
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ।
तेथे कांही कष्ट न लागती।
शेवटच्या चरणात ते सांगतात —
ज्ञानदेवा जिणें नामेविण व्यर्थ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला।
या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी नामाविषयीचा त्यांचा जिव्हाळा व्यक्त केला आहे. ते सांगतात की, भगवन्नामाचे सर्वांगीण महत्त्व व महात्म्य ओळखल्यानंतर नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे, असा आपला निश्चय झाला व म्हणून रामकृष्ण नामाचा, भगवन्नामाचा राजमार्ग किंवा पंथराज आपण स्वीकारला. इतरांनाही ते तोच उपदेश करतात.
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1076*
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन