“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १७ वा”
ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात-
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे।।
➡️ स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची कीर्ती-महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणे, हेच महातप आहे व या तपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो, म्हणजे त्याला स्वत:च्या अमरत्वाचा बोध होतो व देहाचा त्याग केल्यानंतर तो वैकुंठलोकाला जाऊन तेथे चिरकाल वास करतो.
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार।
चतुर्भुज नर होऊनी ठेले।।
नामधारकाचे माता, पिता, बंधू इत्यादी चतुर्भुज होऊन राहतात. याचा वाच्यार्थ उघडच आहे; पण त्याचा भावार्थ थोडक्यात पाहूं, —
माता, पिता, बंधू, सगोत्री इत्यादी सर्व मंडळींना एका शब्दात आणायचे झाले तर तो शब्द म्हणजे ”नातलग”,
✅ नातलग मंडळींत एकमेकांसंबंधी आदर, आपलेपणा व प्रेम गृहित धरलेले असते. म्हणून या ठिकाणी नामधारकाचे नातलग तेच की जे नामधारकावर प्रेम करतात, त्याचा आदर करतात व त्याच्यासंबंधी आपलेपणा बाळगतात. याच अर्थाच्या अपेक्षेत संत सेना महाराज ज्ञानदेवांना उद्देशून म्हणतात- *ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता।* *तोडील भवव्यथा ज्ञानदेव।।* *ज्ञानदेव माझे सोयरे धायरे।* *जिवलग निर्धार ज्ञानदेव।।*
ही सर्व मंडळी नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात. याचे कारण असे की, नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते व एकदां नामाची गोडी लागली की, तेच गोड नाम त्या सर्वांचे जीवन गोड करते. त्या सर्वांना चतुर्भुज म्हणजे हरिरूप करते.
म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात —
संतचरणरज लागतां सहज।
वासनेचे बीज जळुनि जाय।।
मग रामनामी उपजे आवडी।
सुख घडोघडी वाढो लागे।।
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे।
हृदयीं प्रगटे रामरूप।।
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले।
निवृत्तीने दिधले माझे हाती।।
गूढ पण गम्य असे ज्ञान मला निवृत्तिनाथांच्या कृपेने प्राप्त झाले. याचा अर्थ असा की, भगवन्नाम हे दिव्य आहे व त्या दिव्य नामाने साधकाला दिव्य दृष्टी, दिव्य आनंद व दिव्य प्रेम प्राप्त होते.
🙏 असे ज्ञान व त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला माझे सद्गुरु निवृत्तिनाथ यांच्या कृपेने प्राप्त झाला. नामाचे हे दिव्यत्व ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1058*
- आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांसाठी मोठी रोजगारनिर्मिती करणार : बापूसाहेब भेगडे
- मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी संत नामदेवमहाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
- मावळ मनसेचा बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा
- धनगर बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी सुनील शेळके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार – बापूसाहेब भेगडे
- जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ – सुनिल शेळके