ज्ञानेशांचा संदेश
सार्थ हरिपाठ
अभंग ८ वा

🙏भगवन्नाम हे एक तत्त्व आहे, ते साक्षात् परब्रह्म आहे. *एकतत्त्व नाम साधिती साधन।* *द्वैताचे बंधन न बाधिजे।।*

नामासंबंधीची अशी निष्ठा ठेवून जो नामस्मरणाची साधना करतो त्याला द्वैताचे बंधन बाधत नाही. द्वैत जीवाला बाधते. वास्तविक, द्वैत हे अद्वैताचे क्रीडांगण असून अद्वैत हे द्वैताचे विश्रामधाम आहे. अद्वैताच्या पायावरच द्वैताचे मंगल मंदिर उभारलेले आहे. द्वैत हे अद्वैताचा आकार आहे.

ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात म्हणतात-
द्वैत दशेचे अंगण। अद्वैत वोळगे आपण।
भेदूं तंव तंव दूण। अभेदासी।।”

पण हा बोध नामस्मरणाच्या एकनिष्ठ साधनेवाचून साधकाच्या ठिकाणी उमटत नाही. नामाच्या उपासनेने “चित्ताचे चैतन्य” होऊन विश्व म्हणजे प्रभुचा चिद्विलास असा बोध साधकाला होतो.

या बोधाने जीवाला द्वैताचे बंधन तर नाहीच रहात पण उलट द्वैताच्या द्वारे तो अद्वैताचा भोग घेत राहतो. हा भोग घेण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे नामामृताचे सेवन.

✅सामान्य माणसाला या दिव्य नामामृताची कल्पनाच नसते, मग त्यासाठी प्रयत्न करणे दूरच राहिले. तो बिचारा आधी गोड परंतु परिणामी कडू अशा विषयसुखाच्याच मागे जन्मभर धडपडत राहतो. संतांना मात्र मनापासून वाटत असते की या नामामृताचा लाभ सर्वांना प्राप्त होऊन त्यांचे जीवन अंतर्बाह्य सुखी व्हावे. *नामामृत गोडी वैष्णवां लाधली।* *योगियां साधली जीवन कळा।।*

नामाच्या द्वारे ज्याची वृत्ती विष्णुरूप झाली, अशा वैष्णवालाच या नामामृताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते. मोठ्या कष्टाने योग्याला जीवनकला सहस्रदल कमळांतील अमृत मिळते; पण नामधारकाला मात्र नामामृत सहज प्राप्त होते. हे नामामृत योग्याच्या जीवनकलेपेक्षा श्रेष्ठ असते. योग्याला मिळणारे अमृत त्याचा देह अनेक वर्षे टिकवून धरू शकते. फारच झाले तर तो देहाने अमर होईल. पण नामामृताने नामधारकाला ”देहाच्या अंगाने” प्रेमरस सेवन करता येतो, तर ”जीवाच्या अंगाने” त्याला अमरत्वाचा बोध होतो. असे हे नाम संत किंवा भगवंत कृपेविना प्राप्त होत नाही.
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला।
उद्धवा लाधला कृष्णदाता।।

प्रल्हादाला हे भगवन्नाम नारदमुनींच्या कृपेने, तर उद्धवाला तेच श्रीकृष्ण कृपेने लाभले. ज्ञानदेव महाराज म्हणतात, या भगवन्नामाचे माहात्म्य जाणणारे या जगात फार थोडे लोक आहेत. *ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ।* *सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे।।*

संतांवाचून इतरांना नामाचा महिमा आकळत नाही. म्हणूनच हे नाम साधनेच्या दृष्टीने जरी सुलभ असले व फळ देण्याच्या दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वत्र दुर्मिळ झालेले आहे. अशा या नामाने सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे म्हणून

ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *-- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1036

error: Content is protected !!