भक्तिगीतांच्या भक्तिरंगात श्रोते दंग
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव, चिंचवड
पिंपरी :
श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय प्रकटदिन उत्सवात शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ रोजी गणेशमहाराज गोंधळी यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भक्तिगीतांच्या मैफलीने निर्माण झालेल्या भक्तिरंगात श्रोते अक्षरशः दंग झालेत.

मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, कोषाध्यक्ष गणपती फुलारी, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, हेमा दिवाकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. पंडित व्यंकटेशकुमार यांचे शिष्य गणेशमहाराज गोंधळी यांनी ‘रामकृष्ण हरी…’ या सांगीतिक नामघोषाच्या दमदार सादरीकरणाने आपल्या मैफलीचा प्रारंभ केला. ‘रूप पाहता लोचनी…

(ज्ञानेश्वरमाउली), ‘सद्गुरू वाचोनी सापडेना सोय…’ (जगद्गुरू तुकाराम), ‘किती प्रेमळ सद्गुरू माय…’
(पंतमहाराज बाळेकुंद्री), ‘दत्त माझा दीननाथ…’ (संत एकनाथ), ‘नाचू गाऊ आनंदे…’ (पारंपरिक), ‘विश्वाचा विश्राम रे, स्वामी समर्थ माझा राम रे!’ (कृष्ण भट बांदकर), ‘गुरुबीन कौन बतावे बाट…’ (कबीर), ‘गुरुकृपेविन नाही आत्मज्ञान…’ (स्वरूपानंद)’ अशा भक्तिरचनांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. तुकोबांचा ‘हेचि दान देगा देवा…’ हा अभंग त्यांनी भैरवीच्या आर्त सुरांत गात रसिकांना अंतर्मुख केले.

समारोपाच्या ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!’ या भजनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त साथ दिली. गणेशमहाराज गोंधळी यांना धनंजय कुटले (तबला), विशाल मोरे (पखवाज), नरेंद्र वालेकर (व्हायोलिन), सुनील म्हस्कर, ओम म्हस्कर, आणि बालकलाकार मोक्ष गोंधळी (तालवाद्य) यांनी सुरेल साथसंगत केली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले.

त्यापूर्वी, प्रकटदिन उत्सवात पहाटे ठीक ४:३० वाजता श्रींचा सुगंधी द्रव्यांनी अभिषेक आणि पूजा करण्यात आली. सकाळी ७:३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर स्वामी स्वाहाकार यज्ञास प्रारंभ झाला. ८:३० वाजता सामुदायिक गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्यात परिसरातील भाविकांनी सहभाग घेतला. दुपारी १२:०० वाजता आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला; तर सायंकाळी ५:३० वाजता श्रींची आरती करण्यात आली. महेश राजोपाध्ये यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.

error: Content is protected !!