तरुणांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटन, उद्योग आदींचा अंतर्भाव असलेला वचननामा प्रकाशित 
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील शहरांचा नियोजनबद्ध विकास, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध, तरुणांना हमखास रोजगार, रस्ते व पायाभूत सुविधांचे जाळे, शैक्षणिक संस्थांना पाठबळ देणे,  नागरी सुविधांचा विकास, शेती विकास व शेतीपूरक उद्योगातून रोजगार निर्मिती, हरीत चळवळीला प्राधान्य, क्रीडा व सांस्कृतीक ओळख निर्माण करणे, पिण्याचे शुद्ध पाणी व शेतीला पाणी उपलब्ध करून देणे, पर्यटनस्थळे विकास, सोमाटणे टोलनाका प्रश्न मार्गी लावणे, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असलेला वचननामा जाहीर केला असून, गेल्या पाच वर्षात मावळच्या खोळबलेल्या विकासाला गती देणार असल्याचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी वचननाम्यातून सांगितले.
            बापूसाहेब भेगडे यांच्या वचननामा प्रकाशनप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, काँग्रेस नेते चंद्रकांत सातकर, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेने तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, ॲड .रवींद्रनाथ दाभाडे, गुलाबराव म्हाळसकर,निवृत्तीभाऊ शेटे, सुकनशेठ बाफना, चंद्रशेखर भोसले उपस्थित होते.
शहरे व ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास :
           या वचननाम्यात तळेगाव दाभाडे, लोणावळा, देहूगाव, देहूरोड व वडगाव या शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, तळेगाव दाभाडे शहर लोडशेडिंग मुक्त व डस्टबिनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मावळ तालुक्यातील रस्त्यांची सध्या दुरावस्था आहे. ही दुरावस्था दूर करण्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यास प्राधान्य, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी या सुविधामध्ये सुसूत्रता आणणार आहे. सांस्कृतीक तळेगावात सुसज्ज अशा नाट्यगृहाची उभारणी, सोमाटणे टोल नाका प्रश्न मार्गी लावणार आहे.
तरुणाईला रोजगार देण्यास कटिबद्ध  :
          मावळमध्ये गेल्या पाच वर्षात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ती दूर करण्यासाठी अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास बांधील आहोत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणार, नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज सोबत करार करून विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध करून देणार आहे. दुर्गम, आदिवासी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सक्षम करणार आहे.
शेतकरी, महिलांना सक्षम करणार :
            नियोजित कृषी विद्यापीठाची ३५ एकर जागेमध्ये उभारणी, शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण, शासकीय योजनांचा निधी मावळ तालुक्यातील नागरिकांपर्यत पोहोचविणार, महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत काम उभे करणार, दारिद्यरेषेखालील लोकांना मुख्य प्रवाहात आणणार, तळेगाव दाभाडे बाजार समितीच्या जागेत शेतीमालाला योग्य हमीभाव व बाजारभाव मिळवून देणारे भव्य मार्केट उभारणार, इंद्रायणी तांदळाला हमीभाव देण्यास बांधील आहोत.
सरदार दाभाडे घराण्याचा सचित्र इतिहास जगासमोर आणणार :
संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या सरदार दाभाडे घराण्याचा सचित्र इतिहास जगासमोर आणणार आहे. तसेच स्व. किशोर आवारे यांनी कष्टकरी व्यवसायिकांसाठी सुरू केलेल्या भाजी मंडईला अधिक व्यापक स्वरूप देणार आहे.
मावळला पर्यटन तालुका म्हणून विकसित करणार :
मावळला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी निधी उभारणार असून, ऐतिहासिक गड, किल्ले, लेण्यांचे संवर्धन, लोणावळा येथील स्कायवॉक प्रकल्प व कार्ला येथील रोपवे प्रकल्प कार्यान्वित करणार आहोत. तसेच कार्ला येथे MTDC चे भव्य गेस्ट हाऊस उभारणार आहे.
सिंचन सुविधा देणार : 
          नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना पवना व इंद्रायणी नदीपात्रांचे प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार, नद्यांवर बंधारे व नदी खोलीकरणातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध देणार आहे.

error: Content is protected !!