वडगाव मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार सुनील शेळके हे उद्या (रविवारी) सकाळी दहा वाजता वडगाव मावळ येथे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच लाडक्या बहिणी तसेच लहान मुलांपासून वडीलधाऱ्या प्रचारदूतांच्या माध्यमातून आमदार शेळके मतदारांच्या घराघरापर्यंत पोहचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील विकासकामांचा २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढत आमदार शेळके यांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
विकास कामांबरोबरच एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र काम करीत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाल्याने, त्यांचा अडीअडचणीत धावून गेल्यामुळे मावळच्या जनतेशी त्यांचे जीवाभावाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली दमदाटी व दहशत यांना भीक न घालता शेळके समर्थकांनी जीव ओतून स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. ‘तुमच्या केसालाही धक्का लागला तर मी सर्वस्व पणाला लावीन’, असा शब्द आमदार शेळके यांनी दिल्यामुळे कार्यकर्ते अधिकच जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्येच सुनील शेळके यांना उमेदवारी द्यायला हवी होती, अशी तालुक्यातील बहुतांश भाजप कार्यकर्ते व निष्ठावान मतदारांची मनोमन इच्छा होती. मात्र काही नेत्यांच्या कारस्थानांमुळे भाजपने उमेदवारी नाकारल्याने इच्छा असूनही निष्ठावंत मतदार शेळके यांना मतदान करू शकले नव्हते. यावेळी आमदार शेळके हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे पक्षादेशानुसार त्यांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत मतदारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार शेळके यांना यावेळी विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
मावळच्या जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी गाफील न राहता रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याची नोंद करण्यासाठी महायुतीकडून अत्यंत नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे.