वडगाव मावळ: हजारोंच्या संख्येने लोटलेल्या जनसागराच्या साक्षीने, ढोल ताशांच्या दणदणाटात काढलेल्या भव्य मिरवणुकीने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
वडगाव मावळ येथील तहसीलदार कचेरीत मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडे आमदार सुनील शेळके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख हेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करताना आमदार शेळके यांच्या बरोबर माऊली दाभाडे, गणेश खांडगे, दिपक हुलावळे, बाबुलाल नालबंद उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, कार्ला येथील एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष दिपक हुलावळे, भाजपा नेते देविदास कडू, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, संदीप आंद्रे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
¶¶अभूतपूर्व मिरवणूक
मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या आमदार शेळके समर्थकांनी वडगाव बाजारपेठेचा संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता. तरुण कार्यकर्त्यांबरोबरच महिला व ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘सुनील अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘बच्चा बच्चा कहता है, सुनील आण्णा सच्चा है’, या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. ‘सुनील अण्णा शेळके एक नंबर’ यासारख्या गाण्याच्या ठेक्यावर तरुणाईचा जल्लोष सुरू होता.
रस्ते, पाणी, वीज या पलीकडे जाऊन आपण मावळचा विकास केला. गावागावापर्यंत निधी पोहोचवून विकास कामे केली. त्यांनी निधीचा पै-पैचा हिशेब मी जनतेला दिला आहे. शासकीय निधी बरोबरच दानशूर व्यक्तींकडूनही विकासासाठी पैसा आणला आणि तो विकासावर खर्च केला. आमदार होऊन आपण पैसा नाही तर जिवाभावाची माणसे कमवली, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
¶¶प्रत्येकाला मोफत वैद्यकीय उपचार
पुढील पाच वर्षांमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, यासाठी आपण योजना तयार केली आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज आधी योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. त्यासाठी मला पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, अशी विनंती त्यांनी उपस्थित जनसमुदायास केली.

error: Content is protected !!