पिंपरी : “‘आठवणीतील भाई’ हे आत्मचरित्रपर लेखन म्हणजे पिंपरी – चिंचवड परिसरातील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक स्थित्यंतराचा वस्तुनिष्ठ आलेख आहे!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ढोरेनगर, जुनी सांगवी येथे काढले. अशोक सोनवणे उर्फ भाई लिखित ‘आठवणीतील भाई – एक संघर्षमय जीवनप्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले अध्यक्षस्थानी होते; तर सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप सूर्यवंशी, लेवा पाटीदार संघाचे अध्यक्ष भागवत झोपे, ज्येष्ठ नागरिक संघ, सांगवीचे अध्यक्ष अशोक भोसले, लेखक अशोक सोनवणे यांची व्यासपीठावर आणि माजी महापौर उषा ढोरे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवडचा परिसर आणि अशोक उर्फ भाई सोनवणे यांचा प्रवास हातात हात घालून झाला असावा इतके प्रत्ययकारी हे लेखन आहे. बालपणापासून त्यांना अनेक मान्यवरांचे सान्निध्य लाभले. सुमारे साठ वर्षांहून अधिक काळ विविध संकटांना अन् संघर्षाला सामोरे जाऊन जीवन व्यतीत करतानाच्या आठवणी त्यांनी तटस्थपणे पुस्तकात लिहिल्या आहेत.
अल्पकालीन राजकीय कारकीर्द असूनही समाजाविषयी सहृदयता मनात असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा त्यांनी उमटवला आहे. या पुस्तकातून एका अष्टपैलू, कुटुंबवत्सल अन् संवेदनशील लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची अनुभूती येते!”
याप्रसंगी आपल्या मनोगतातून अशोक सोनवणे यांनी, “अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा माझ्यावर सखोल प्रभाव आहे. स्फुटलेखनाची आवड होती. पत्रकारितेची पदवी प्राप्त केली होती; परंतु सक्रिय राजकारणात असल्याने लेखन मागे पडले. भिन्न क्षेत्रातील बरे – वाईट अनुभव आता निवृत्तीच्या काळात पुस्तकरूपाने मांडले आहेत!” अशी भावना व्यक्त केली.
श्रीकांत चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मणिभाई देसाई यांनी बालपणी बहाल केलेले ‘भाई’ हे संबोधन अशोक सोनवणे यांनी आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरवले. अतिशय प्रतिकूल काळात त्यांनी निष्ठेने समाजकारण अन् राजकारण केले. बहुजनांच्या संघर्षाचा इतिहास शब्दबद्ध करणे गरजेचे असताना ‘आठवणीतील भाई : एक संघर्षमय जीवनप्रवास’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित होत आहे, या घटनेची दखल इतिहासात निश्चितच घेतली जाईल!” असा विश्वास व्यक्त केला.
अपर्णा सोनवणे, हिरेन सोनवणे, तुषार चौधरी आणि सोनवणे परिवार यांनी संयोजन केले. संजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आभार मानले.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन