तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अवजड व मध्यम वाहनांना तूर्त सहा तास प्रवेशबंदी

आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर वाहतूक पोलीस ‘ॲक्शन मोड’वर

तळेगाव दाभाडे: 

  तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्त्यावर अवजड व मध्यम वाहनांना  रविवार  पासून सकाळी आठ ते  अकरा आणि  संध्याकाळी पाच ते आठ या वर्दळीच्या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या संदर्भातील आदेश जारी केला. 

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना लेखी निवेदन पाठवून तसेच भ्रमणध्वनीवर चर्चा करून तळेगाव-चाकण रस्त्यावर दिवसाच्या बारा तासांसाठी अवजड वाहनांना बंदी करण्याची आग्रही मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना सूचना केल्या. त्यानुसार वाहतूक शाखेच्या वतीने तातडीने त्यासंदर्भातील आदेश काढण्यात आला आहे. 

तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी तळेगाव, चाकण व रांजणगाव या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. या रस्त्यावर तसेच प्रमुख चौकांमध्ये हलकी, मध्यम व अवजड वाहने तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून किरकोळ व प्राणांतिक अपघात होऊन जीवितहानी होत असते.‌ 

या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित व गतिमान व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार या रस्त्यावर सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत जड व मध्यम वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. वाहन चालकांनी या कालावधीमध्ये या रस्त्यावर जड व मध्यम वाहने घेऊन येऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे.  

 *अवजड वाहनांना 12 तास प्रवेश बंदीसाठी आग्रही – शेळके*

तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्त्यावर दिवसाचे 12 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदीबाबत आपण आग्रही आहोत, या भूमिकेचा आमदार सुनील शेळके यांनी पुनरुच्चार केला. अवजड वाहनांना बंदी केल्यामुळे उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार उद्योजक करतात. त्यामुळे उद्योजकांचे नुकसान होणार नाही व वाहतूक कोंडीची समस्या ही सुटेल असा तोडगा काढण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळावा, अशी विनंती वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. दिवसभर अवजड वाहने थांबण्यासाठी ठिकठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करावी लागेल. 

शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यात समन्वय साधावा लागेल. तोपर्यंत सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास हे प्रतिबंध लागू राहतील, असे शेळके यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!