“विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब
पिंपरी: ‘विठ्ठल नामाचा हो टाहो…’, ‘हरी भक्तीचा भुकेला…’, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘गोड तुझे रूप.. गोड तुझे नाम…’, अशा भक्तिगीतांमध्ये आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील भाविकांना साक्षात पांडुरंगाच्या भक्तीची अनुभूती अनुभवायला मिळाली.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विठ्ठल ठायी ठायी’ अर्थात ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ या विठ्ठलगीतांच्या मैफलीत श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पिंपरी – चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, मनोज देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंड, सचिव सागर पाटील, प्रदीप पाटील, ज्योती कानेटकर, चंद्रशेखर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठलगीतांची अनुभूती घेण्यासाठी प्राधिकरणातील श्रोत्यांनी नाट्यगृह तुडूंब भरले होते.
सर्वत्र आषाढसरी कोसळत असताना ज्ञानेश्वरमाउली, जगद्गुरू संत तुकोबा, संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई या संतांच्या मांदियाळीपासून ते जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम, योगेश्वर अभ्यंकर या कवींच्या प्रासादिक रचनांना संगीतकारांनी स्वरसाज चढवून आणि लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, किशोरी अमोणकर, सुरेश वाडकर अशा दिग्गज गायकांनी गाऊन अजरामर केलेल्या भक्तिरचनांच्या वर्षावात भाविक चिंब झाले.
डॉ. शशिकला शिरगोपीकर, गौतम मुर्डेश्वर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे- ढवळे, सीमा शिरगोपीकर या गायक कलाकारांनी अतिशय तन्मयतेने गायलेल्या लोकप्रिय भक्तिगीतांनी भाविक श्रोत्यांचे वन्स मोअर मिळविले. त्याचवेळी व्यासपीठावर मृणाल भोंगाळे यांनी आपल्या मूर्त-अमूर्त शैलीतील चित्रकलेतून विठ्ठलाची विविध रूपं साकारून मैफलीची रंगत वाढविली; तर गौरी फडके, राधिका देशपांडे, मंजिरी भाके, शशी यादव, पूर्वा साळुंखे, दर्शनी ठाकूर, गीता कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी, वैदेही शिंदे, जान्हवी मर्ढेकर, आमरुनी पाटील यांच्या पारंपरिक वेशभूषेतील नृत्याविष्काराने आणि अरुण गवई (तबला), विनीत तिकोनकर (पखवाज), अनय गाडगीळ (की बोर्ड), धनंजय साळुंखे (तालवाद्य) यांनी नेटकी साथसंगत करीत मैफलीला श्रवणीय केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, नुपूर नृत्यालय आणि नृत्यांजली कथ्थक क्लास या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. स्नेहल दामले यांनी आपल्या रसाळ निवेदनाने श्रोत्यांची विशेष दाद मिळविली.