भाजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा स्मारकाचे अनावरण

कार्ला:

लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या पायथ्याशी व पुरातन अशा भाजे लेणीच्या पायथ्याशी  वसलेल्या भाजे गावामध्ये लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १६ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील सर्वाधिक उंची असलेला हा एकमेव पुतळा  आहे. मागील दोन वर्षापासून सदरचा पुतळा बसवण्यासाठी चौथरा बनवण्याचे काम व सोबतच पुतळा बनविण्याचे काम देखील सुरू होते.साधारण १८ फूट उंचीचा चौथरा येथे बनवण्यात आला असून त्यावर महाराजांचा १६  फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला आहे.

लोक सहभागातून हे काम करण्यात आले असून भाजे गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे. सोबतच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीने देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. 

पुतळ्याला चारही दिशेने राजमुद्रा बसवण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चारवाजता पारंपारिक वेशभूषेत व पारंपारिक वाद्यांच्यागजरामध्ये मळवली ते भाजे दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

यामध्ये ढोल लेझीम पथक, ऊंट, घोडे, डीजे, विद्युत रोषणाई सह शिवकालीन मर्दानी खेळांचा सहभाग होता.पारंपरिक रथ व बैलगाड्यांसह पारंपारिक वेशभूषेत ग्रामस्थांबरोबर परिसरामधील नागरिकही या सोहळ्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. यात महिला व लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. 

या सोहळ्याच्या निमित्ताने भाजे गावातील वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्याघोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या अनावरण सोहळ्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.काही सांस्कृतिक कार्यक्रम व महाराजांचे पोवाडे या ठिकाणी सादर करण्यात आले. आकर्षक अशीफटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!