संसार हा बुद्धिबळाचा पट:  डॉ. संजय उपाध्ये

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – प्रथम पुष्प

पिंपरी: 

“संसार हा बुद्धिबळाचा पट असतो. सुसंवादाने अवतीभवती असलेल्या नातेवाईकांचा तर्‍हेवाईकपणा सांभाळून जगता आले तरच मन:शांती लाभते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे केले. 

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ अंतर्गत ‘मन करा रे प्रसन्न’ प्रवचनमालिकेतील ‘नातेवाईक, तर्‍हेवाईक आणि मन:शांती’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना उपाध्ये बोलत होते. माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मधू जोशी, गतिराम भोईर, राजेंद्र घावटे, सुहास पोफळे, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधावडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “आई, वडील, बहीण, भाऊ ही जन्मजात; नवराबायको, शेजारीपाजारी ही संपादित; तर गुरुशिष्य हे शाश्वत नाते असते. काका, मामा, आत्या, मावशी या नात्यांसाठी दांपत्याने किमान दोन अपत्ये जन्माला घालायला हवीत; परंतु एकच अपत्य आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या काळात ही गोष्ट दुरापास्त होऊ लागली आहे. 

हल्ली घरातील संवादाची भाषाच तर्‍हेवाईकपणा निर्माण करते. विशेषत: पती – पती या नात्यात सुसंवाद असायलाच हवा. त्यासाठी अहंकार टाळून अन् परिस्थितीनुरूप वागून नातेवाईकांची मने जिंका. ज्या दिवशी घरातील कलह कौटुंबिक पातळीवर सोडविले जातील; त्याच दिवशी भारत आनंदी देशांच्या क्रमवारीत अग्रक्रमावर जाईल!” भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वरमाउली, जगद्गुरू तुकोबाराय, स्वामी विवेकानंद, कवयित्री बहिणाबाई, सुरेश भट, पु. ल. देशपांडे यांचे संदर्भ उद्धृत करीत अनौपचारिक पण मिस्कील शैलीतून उपाध्ये यांनी श्रोत्यांशी संवाद साधत ‘सुख’ या कवितेने व्याख्यानाचा समारोप केला. व्याख्यानापूर्वी, ऋचा पाटील या युवतीने कथ्थक नृत्य सादर केले.

उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींना पंचामृत अभिषेक आणि पूजा, उत्सव कलश स्थापना, श्रींची आरती, मंडप पूजन, स्वामी स्वाहाकार, श्री गुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण प्रारंभ, महानैवेद्य आणि आरती तसेच सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

error: Content is protected !!